काय सांगता! बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:00 IST2025-07-18T10:57:06+5:302025-07-18T11:00:22+5:30
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, जाणून घ्या याबद्दल...

काय सांगता! बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी 'या' मराठी चित्रपटात केलंय काम, वाचा किस्सा
Rajesh Khanna: दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) हे हिंदी सिनेसृष्टीतील पहिले सुपरस्टार होते. भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. 'दो रास्ते', 'आराधना', 'हाथी मेरे साथी' 'अपना देश','नमक हराम' तसेच 'बावर्ची' अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. राजेश खन्ना यांनी हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. त्याकाळी त्यांनी लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली होती. परंतु, तुम्हाला माहिती आहे का हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्याने एका मराठी चित्रपटात सुद्धा काम केलं आहे. जाणून घेऊया त्यांच्या बदल काही खास गोष्टी...
सुपरस्टार राजेश खन्ना यांनी १९८१ मध्ये आलेल्या एका मराठी चित्रपटात काम केलं होतं. त्या चित्रपटाचं नाव म्हणजे 'सुंदरा सातारकर'. 'लोकसत्ता लाईव्ह'च्या गोष्ट पडद्यामागची मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजेश खन्ना गिरगावातील ठाकूरव्दार येथे लहानाचा मोठा झाल्याने त्याला मराठी भाषा अवगत होती. 'आराधना ' प्रदर्शित होईपर्यंत ते गिरगावात राहात होते. त्यानंतर ते कार्टर रोड येथील आशीर्वाद बंगल्यात शिफ्ट झाले. पण, त्यानंतरही राजेश खन्ना यांनी मराठीशी असलेलं नातं जपलं.
राजेश खन्ना यांनी श्रीमंगेश चित्र या बँनरखाली निर्माण झालेल्या 'सुंदरा सातारकर' या मराठी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केली. विशेष म्हणजे मेहबूब स्टुडिओत त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. प्रभाकर निकळंकर दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ, उषा नाईक, रमेश भाटकर, सुहास भालेकर इत्यादी कलाकार आहेत.