Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 23:34 IST2025-10-07T23:33:23+5:302025-10-07T23:34:57+5:30
Bigg Boss Kannada: बिग बॉस कन्नडा या कार्यक्रमाला कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोठा दणका दिला आहे. बिग बॉस कन्नडा या कार्यक्रमाचं चित्रिकरण सुरू असलेल्या स्टुडियो परिसराला तत्काळ बंद करण्याचे आदेश कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.

Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण
बिग बॉस कन्नडा या कार्यक्रमाला कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोठा दणका दिला आहे. बिग बॉस कन्नडा या कार्यक्रमाचं चित्रिकरण सुरू असलेल्या स्टुडियो परिसराला तत्काळ बंद करण्याचे आदेश कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर परिसराला सील करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना बंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेडला देण्यात आली आहे. या आदेशानंतर किच्चा सुदीप याच्या या कार्यक्रमातून सर्व स्पर्धकांना बाहेर काढलं जाईल. तसेच सध्या बिग बॉसच्या या घराचा दरवाजा सील करतानाचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.
कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी एक नोटिस प्रसिद्ध करत वेल्स स्टुडियोज अँड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडला या ठिकाणचं सर्व कामकाज थांबवण्याची सूचना दिली आहे. या परिसराचा वापर मोठ्या प्रमाणावर मनोरंजन आणि स्टुडियोच्या संचालनासाठी केला जातो. मात्र त्यासाठी पाणी प्रदूषण आणि हवा प्रदूषणाबाबतच्या नियमांनुसार आवश्यक ती परवानगी घेण्यात आलेली नाही.
येथे झालेलं नियमांच उल्लंघन विचारात घेऊन तुम्हाला हा कार्यक्रम तत्काळ प्रभवाने बंद करण्याचे आणि निर्धारित अवधीमध्ये स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत, असे या संदर्भात पाठवण्यात आलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे. तसेच या आदेशाचं पालन न केल्यास संबंधिक पर्यावरण कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल.