'अशोक मा.मा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! मुख्य अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली-"सर्वात जास्त दुःख..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:11 IST2026-01-10T18:07:08+5:302026-01-10T18:11:41+5:30
"सर्वात जास्त दुःख याचं वाटतंय, की...", 'अशोक मा.मा' फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट, आज प्रदर्शित होणार शेवटचा भाग

'अशोक मा.मा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! मुख्य अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली-"सर्वात जास्त दुःख..."
Ashok Mama Serial: मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून अशोक सराफ (Ashok Saraf) यांना ओळखलं जातं. पडद्यावर नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा सर्वच भूमिका साकारून त्यांनी सिनेरसिकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली. वेगवेगळे चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून त्यांनी काम केलं आहे. मात्र, मागील काही काळ ते छोट्या पडद्यापासून दूर होते. गेल्या वर्षभरापासून ते अशोक मा.मा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आता याच मालिकेसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. प्रेक्षकांची ही आवडती मालिका निरोप घेणार आहे. यासंदर्भात मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेली अशोक मा.मा ही मालिका ऑफ एअर होणार आहे. २५ नोव्हेंबर २०२४ ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आज १० जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. कडक शिस्तीचे तितकेच मृदुभाषी असणारे अशोर माजगावकर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. जवळपास वर्षभरानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेत अशोक सराफ यांच्यासह अभिनेत्री रसिका वाखारकर तसेच निवेदित सराफ, चैत्राली गुप्ते, नेहा शितोळे असे कलाकार झळकले. आता ही मालिका संपताच अभिनेत्री रसिका वाखारकर भावुक झाली आहे.
सोशल मीडियावर रसिकाने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तसेच अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे. दरम्यान, या पोस्टमध्ये तिने लिहलंय,"आणि इथे आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी पोहोचलो आहोत.कृतज्ञता, जुन्या आठवणी आणि एखादा प्रवास संपल्यावर जड अंतकरण:जसं होतं, तसा हा दिवस होता. पण सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं वाटतंय की, मला त्या व्यक्तीला दररोज भेटता येणार नाही. तो माणूस जो सेटवर आमच्या आजूबाजूला असल्यामुळेच आमचे दिवस आनंदात जायचा."
त्यानंतर रसिका अशोक सराफ यांच्याबद्दल म्हणाली, "सेटवरील शेवटच्या दिवशी मी त्यांच्या खोलीत गेले.त्यांचा दयाळूपणा,आपुलकी आणि त्यांना केवळ पाहून मी जे काही शिकले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.त्यावेळी तिथेच असलेल्या एका कागदाच्या तुकड्याकडे माझं लक्ष गेलं. मी त्यांची चाहती असल्यामुळे मी त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागितला.त्यांनीही त्यावर सही केली आणि ते हसले. त्यावेळी मी सेटवरून निघणार इतक्यात ते काहीतरी म्हणाले, जे माझ्यासाठी कौतुकापेक्षा खूप जास्त होतं. ते मला म्हणाले-थांब... तुझ्या ऑटोग्राफचं काय? तो क्षण माझ्या आठवणीच्या कप्प्यात कायम राहिल. हे आहेत अशोक सराफ सर."
पोस्टच्या शेवटी रसिकाने म्हटलंय, "ते केवळ एक महान कलाकारच नाहीत,तर एक चांगले माणूसही आहेत.जे आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाशी, मग तो कनिष्ठ असो वा वरिष्ठ, त्याच आपुलकीने आणि आदराने वागतात.काही लोक केवळ त्यांच्या कामातूनच नव्हे, तर त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही तुम्हाला प्रेरणा देतात.या अनुभवाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे." अशा आशयाची पोस्ट रसिकाने लिहिली आहे.