"कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि..."; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:09 IST2025-12-13T16:01:28+5:302025-12-13T16:09:21+5:30

अक्षय खन्ना 'धुरंधर'च्या सेटवर कसा वागायचा? ऑनस्कीन भावाने केला मोठा खुलासा. वाचून तुम्हालही आश्चर्य वाटेल

akshaye khanna behaviour on set of dhurandhar movie danish pandor | "कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि..."; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा?

"कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि..."; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा?

सध्या 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या 'रेहमान डकैत' या व्यक्तिरेखेची आणि विशेषतः त्याच्या ‘FA9LA’ गाण्यावरील धमाकेदार एंट्री डान्सची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. चित्रपटातील त्याच्या दमदार भूमिकेने त्याची पुन्हा एकदा चर्चा होतेय. याच पार्श्वभूमीवर, 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाच्या धाकटा भाऊ उजैरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दानिश पंडोने एका मुलाखतीमध्ये सेटवर अक्षय खन्ना कसा असतो, याबाबतचे काही खास किस्से शेअर केले आहेत.

दानिश पंडोरने सांगितले की, त्याची आणि अक्षय खन्नाची पहिली भेट 'छावा' चित्रपटाच्या वेळी झाली होती, पण तेव्हा दानिश त्याच्या संपूर्ण गेट-अपमध्ये असल्याने अक्षय खन्ना त्याला ओळखू शकला नाही.

'धुरंधर'च्या स्क्रीप्ट रिडिंगसाठी जेव्हा सर्व प्रमुख कलाकार एकत्र जमले होते, तेव्हा दिग्दर्शक आदित्य धरने दानिशची आणि अक्षय खन्नाची एकमेकांशी ओळख करून दिली. या भेटीबद्दल दानिश सांगतो, “अक्षय खन्ना जी कला सादर करतात ती अफलातून आहे. ते खूप शांत स्वभावाचे आहेत. 'छावा'च्या वेळी जास्त संवाद झाला नव्हता, पण 'धुरंधर'च्या वाचनाच्या वेळी आदित्य सरांनी त्यांना माझी ओळख करून दिली. 'छावा'मध्ये माझ्या दाढीमुळे ते मला ओळखू शकले नव्हते. 'छावा'नंतर त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजलो."

दानिश पुढे म्हणाला, "सेटवर अक्षय खन्ना अत्यंत वेळेवर येतात. ते लोकांशी आदराने वागतात, शांतपणे चार मिनिटे गप्पा मारतात आणि त्यानंतर ते थेट आपल्या भूमिकेत शिरतात आणि आपले सर्वोत्तम प्रयत्न कॅमेरासमोर देतात. शॉट संपल्यानंतर, ते एका कोपऱ्यात स्वतःमध्ये मग्न होऊन बसतात, कोणाशीही जास्त गप्पा मारत नाहीत. ते त्यांच्या 'झोन'मध्ये असतात. तुम्ही त्यांच्याकडे गेलात, तर ते थोडं बोलतील आणि पुन्हा तसेच शांतपणे बसतील. मी या गोष्टी बारकाईने पाहिल्या आहेत."

Web Title: akshaye khanna behaviour on set of dhurandhar movie danish pandor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.