शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मुला-मुलींमधील भेदभाव संपेल कधी?

By किरण अग्रवाल | Updated: December 27, 2022 11:08 IST

When will discrimination between boys and girls end? : विवाहितांच्या छळाच्या न थांबलेल्या घटना पाहता तरी काही घटकांचे वैचारिक मागासलेपण अजून दूर झालेले नसल्याचेच म्हणता यावे.

- किरण अग्रवाल 

दोन्ही मुलीच झाल्या म्हणून विवाहितेचा छळ केला गेल्याची घटना नोंदविल्याचे पाहता मुला-मुलींमधील भेदभावाच्या बुरसटलेल्या, संकुचित विचारांचे मागासलेपण अजूनही पूर्णांशाने दूर झालेले नसल्याचे स्पष्ट व्हावे. यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे

काळ बदलला, पैसा-अडका व भौतिक साधन सुविधांच्या बाबतीत प्रगतीही झाली; पण, मानसिकता बदलली का, असा प्रश्न केला तर त्याचे समाधानकारक उत्तर देता येऊ नये. वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा असताना मुलगी होते, या कारणाने व हुंड्यासाठी म्हणून विवाहितांच्या छळाच्या न थांबलेल्या घटना पाहता तरी काही घटकांचे वैचारिक मागासलेपण अजून दूर झालेले नसल्याचेच म्हणता यावे.

दोन-चार दिवसांपूर्वीच एक घटना वाचावयास मिळाली. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून, दुसरे लग्न करण्याची धमकी पती व सासरच्यांनी दिल्याप्रकरणी बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती खुर्द येथील एका भगिनीला पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली. अशा प्रकारची ही एकमेव अगर पहिलीच घटना नाही. या दोन-चार महिन्यांतच अशा पाच-सहा घटना घडून गेल्या आहेत. मुलगा पाहिजे होता; पण, मुलगी झाली म्हणून अंगावरील दागिने काढून घेत एका विवाहितेला माहेरी हाकलून दिले व येताना ५० हजार रुपये आणल्याखेरीज घरात घेणार नाही, अशी धमकी दिल्याची एक तक्रार खामगावचे सासर असलेल्या एका भगिनीने अकोल्यातील खदान पोलिसांकडे अलीकडेच दिली होती; तर मुलीच होतात, मुलगा का होत नाही म्हणून टोमणे मारत ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावणाऱ्या मूर्तिजापूरच्या सासर असलेल्या एका भगिनीने बोरगाव मंजू येथे तक्रार नोंदविली होती. अशा घटनांची आणखीही यादी देता येईल व यात हुंड्यासाठी छळाचा विचार केला, तर ती यादी खूप मोठी होईल. मुद्दा एवढाच की, बुरसटलेल्या मानसिकतेचे परिवर्तन घडून आलेले नाही, हेच यातून लक्षात घ्यायचे.

अलीकडील काळात मुला-मुलींच्या जन्मदराचे प्रमाण असंतुलित होत चालल्याचे बघावयास मिळते. अगदी खेड्यापाड्यात किंवा वाडी-वस्तीवरचे सोडा; पण, तालुक्याच्या ठिकाणी असूनही नोकरी- धंदा नसलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची ओरड वाढली आहे. कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजात ही परिस्थिती ओढावलेली दिसत आहे; पण, मग अशी स्थिती असताना ज्या मुलांना मुली व ज्या सासरच्यांना सुना मिळाल्या आहेत, त्यांच्याकडून अशा मुलींना लक्ष्मी म्हणून का वागविले जात नाही, हा यातील खरा प्रश्न आहे. लग्न होत नाही तोपर्यंत मुलींसाठी मध्यस्थाकडे हातपाय जोडणारे लोक, सून घरात आल्यानंतर असे निर्दयी, निर्मम होऊन नाही त्या कारणास्तव सुनेचा छळ करतातच कसे? कायद्याने अशांचा काय बंदोबस्त व्हायचा तो होईलच, परंतु, समाज म्हणून आपण हे कुठे थांबवू शकतो का, याचा विचार समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनीही करायला हवा.

विशेषत: मुलगा होत नाही म्हणून पत्नी व सुनेचा छळ केल्या जाणाऱ्या घटना तर खूपच अप्रागतिकतेच्या आहेत. या कारणात महिलेचा नव्हे, तर पुरुषांचाच दोष असतो, हे वैज्ञानिक सत्य आहे; तरी संबंधित भगिनीला घराबाहेर काढून दिले जाते, हे अमानवीय व बुरसटलेल्या विचारांचे द्योतक आहे. हुंड्यासाठीही अजून छळ होतच असेल, तर आपल्या पुढारलेपणाला कोणता अर्थ उरावा? भलेही या घटना अपवादात्मक प्रमाणातच घडतात; पण, संबंधित कुटुंब व समाजावर त्याचे ओरखडे उमटणे स्वाभाविक ठरते म्हणून त्याकडे गांभीर्यानेच पाहिले जायला हवे.

एकट्या अकोला जिल्ह्याचेच उदाहरण घ्या. पत्नीपेक्षा पैशाला अधिक किंमत देत पतीकडून घर व वाहनासाठी छळ केल्या गेल्याच्या सुमारे २०० तक्रारी यावर्षात आतापर्यंत विविध पोलिस स्थानकांमध्ये व भरोसा सेलकडे नोंदविल्या गेल्याचे आकडेवारी सांगते. हे प्रमाण छोटे वा कमी म्हणता येऊ नये. यातीलही दुर्दैव असे की, अशा प्रकरणांत गेल्या तीन वर्षांत सुमारे नऊ विवाहितांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली, हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. चंद्रावर जाण्याच्या व मंगळावर पाणी शोधण्याच्या बाता करणारे आपण साऱ्यांनीच याबाबत अंतर्मुख होऊन कुठे कोण कमी पडत आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

सारांशात, हुंड्यासाठी व मुलगा होत नाही म्हणून होणाऱ्या छळाच्या घटना पाहता यामागील वैचारिक बुरसटलेपण दूर करण्यासाठी कुटुंबातील शिकल्या सवरलेल्या पिढीसोबतच सामाजिक संस्थांनीही पुढे येणे गरजेचे आहे. केवळ कायद्याच्या धाकाने व शासकीय जागरणाने असे प्रश्न सुटणार नाहीत, तर कुटुंबातील- समाजातील प्रबुद्धवर्गानेही आपली भूमिका बजावायला हवी.