राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जी काही मते मांडली आणि जी काही टीकाटिपणी केली, त्यामुळे उपस्थित नेते व कार्यकर्ते यांचे प्रबोधन झाले, केवळ मनोरंजन झाले की प्रसारमाध्यमांना 'हेडलाइन न्यूज' मिळून गेली, हा चर्चेचा विषय ठरू शकतो; पण पक्षाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या या भाषणामुळे 'पवार यांना हवे आहे तरी काय?' हा जो कायमस्वरूपी प्रश्न सार्वत्रिकरीत्या गेली चार दशके पडत आला आहे, तो तसाच अनुत्तरित राहिला आहे. अशी परिस्थिती उद्भवण्याचे खरे कारण आहे, ते पवार यांची महत्त्वाकांक्षा. प्रत्येक राजकारण्याला महत्त्वाकांक्षा ही असतेच. तशी असायला हरकत नाही. नव्हे, ती असायलाच हवी; पण या महत्त्वाकांक्षेला वास्तवाचा पाया हवा आणि हे वास्तव ओळखून आपल्या महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्याची मानसिक शिस्तही हवी. पवार हे स्वत:ला चव्हाण यांचे शिष्य मानतात. चव्हाण यांना वास्तवाची अशी जाणीव कायम असायची. याचा अर्थ चव्हाण राजकीय डावपेचात वाक्बगार नव्हते किंवा हवे तेव्हा आक्र मक बनण्याची तयारी ते दाखवीत नव्हते, असाही होत नाही; अन्यथा महाराष्ट्रातील राजकारणात वारंवार वापरला गेलेला 'बेरजेचे राजकारण' हा शब्दप्रयोग अस्तित्वातच आला नसता. शिवाय 'चव्हाण ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, त्याचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपते', असेही मानले जायला लागले नसते. मात्र, लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान बनण्याची संधी आली, तेव्हा चव्हाण यांनी आक्र मकता न स्वीकारता महत्त्वाकांक्षेपेक्षा वास्तवाला महत्त्व दिले. काँग्रेस पक्षाचे एकूण स्वरूप, त्या पक्षावर असलेला नेहरूंचा प्रभाव हे घटक लक्षात घेता, आपण उद्या पंतप्रधान जरी झालो, तरी हे आसन किती स्थिर राहील, याचा चव्हाण यांना अंदाज असावा. म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधी यांची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला असावा. उलट राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम न घालण्याची मूळ प्रवृत्ती आणि त्यापायी कोणत्याही स्तराला जाण्याची वृत्ती इंदिरा गांधी यांच्या स्वभावातच असल्याने त्यांनी चव्हाण यांना 'कात्रजचा घाट' दाखवला. इंदिरा गांधी यांच्या नेमक्या याच स्वभावामुळे पुढे देशात काय राजकीय उलथापालथी झाल्या आणि त्याचे परिणाम आजही काँग्रेस पक्षाला कसे व किती भोगावे लागत आहेत, हा नजीकच्या काळातील ताजा इतिहास आहे. नेमक्या याच 'कात्रजचा घाट' दाखविण्याच्या इंदिरा गांधी यांच्या स्वभावामुळे पवार यांच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसत गेली आणि ही कोंडी फोडण्यासाठीही पवार यांनी वापरली, ती हीच 'कात्रजचा घाट' दाखविण्याची पराकोटीच्या विधिनिषेधशून्यतेवर आधारलेली कार्यपद्धती. 'पुलोद'च्या प्रयोगापासून ते 'सोनियांच्या परकीयपणा'वरून पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करणे, पुढे काँग्रेसशी हातमिळवणी करून १९९९ ते २0१४ महाराष्ट्रात पक्षाला सत्तेत ठेवणे आणि २00४ ते २0१४ केंद्रात मंत्रिपद मिळवणे, अशा विविध टप्प्यांतून पवार यांच्या राजकीय कारकीर्दीत जे चढ-उतार झाले आहेत, त्यामागे ही 'कात्रजचा घाट' दाखविण्याची प्रवृत्तीच मुळात कारणीभूत आहे. साहजिकच 'पवार' आणि 'विश्वासार्हता' यांचा ताळमेळ कधीच बसलेला नाही. या अशा चढ-उताराचे खरे कारण आहे, ते वास्तव लक्षात न घेता विधिनिषेधशून्यतेची र्मयादा गाठणार्या चलाखीच्या जोरावर राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्याचा प्रयत्न हेच. पवार यांना काँग्रेसचे कोंदण असले, तरच ते राज्याच्या आणि म्हणून देशाच्या राजकारणात प्रभावी ठरू शकतात. पवार व काँग्रेस वेगळे झाले, तर दोघेही कमकुवत होतात, हे महाराष्ट्रातील राजकीय वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या १७ वर्षांतील राजकीय बळ 'पुलोद'नंतर पवार यांनी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस'पेक्षा लक्षणीयरीत्या वाढलेले नाही. पवार यांचे राजकीय बळ हे एवढेच आहे. ते काँग्रेसने जोडून घेतले, तर महाराष्ट्रात दोन्ही पक्ष सत्तेच्या राजकारणात प्रबळ बनू शकतात. यासाठी काँग्रेसने पवार यांचे महत्त्व मान्य करायला हवे, तसेच पवार यांनीही आपल्या राजकीय बळाच्या र्मयादा ओळखायला हव्यात; पण दोन्ही बाजू तसे करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत; अन्यथा २0१४ च्या निवडणुकीच्या आधी आघाडी फुटलीच नसती आणि निकाल लागत असतानाच 'गरज भासल्यास भाजपला मदत करण्याचे' पवार यांनी जाहीर केलेच नसते. आपला पक्ष एक खांबी आहे आणि 'राष्ट्रवादी' नाव असले, तरी त्याचे खरे स्वरूप 'प्रादेशिक'च आहे, हेही ते जाणतात. या पार्श्वभूमीवर आपण राजकीय बळाचा जो संचय केला आहे, त्याचा भविष्यात काय व कसा उपयोग करता येईल, याची आखणी पवार यांच्यासारख्या राजकीय नेत्याने करणे अपेक्षित असते. त्या दृष्टीने बघता पक्षाच्या १७ व्या वर्धापनदिनी पवार यांनी केलेल्या भाषणातील अर्थहीनता लक्षात यावी. साहजिकच इतकी प्रगल्भ प्रशासकीय जाण, महाराष्ट्राचे समाजकारण व अर्थकारण यांचे सखोल भान, प्रचंड जनसंपर्क, असे गुण पवारांकडे आहेत.
पवारांना हवंय तरी काय?
By admin | Updated: June 13, 2016 06:50 IST