ज्या दिवशी आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकली त्या दिवशी मी पाकिस्तानी नाटककार शहीद नदीम यांच्या ‘दारा’ या नाटकाने प्रभावित झालो होतो. औरंगजेब आणि दारा शुकोह यांच्यात दिल्लीच्या सत्तेसाठी जो संघर्ष सुरू होता तो भारतातील सर्व विद्यार्थ्यांना ठाऊक आहे. पण हे नाटक केवळ त्या सत्तासंघर्षापुरते मर्यादित नाही, तर त्याकाळी जो भारत होता, जो भारत झाला आणि कदाचित जो भारत होऊ शकला असता, याचेही वर्णन या नाटकात करण्यात आले आहे. हे नाटक आजच्या वास्तवाची चर्चा करते आणि आजच्या दु:खी पाकिस्तानला आणि पंतप्रधान मोदी यांनाही सल्ला देते. दिल्लीच्या मतदारांनी गेल्या आठवड्यात राज्यकर्त्यांना जी पीछेहाट सोसायला लावली, तशी पीछेहाट कशी टाळता येते हेही हे नाटक सांगते.मानवी इतिहासात अनेक परिवर्तनाचे क्षण येतात. भारताच्या इतिहासात असा परिवर्तनाचा क्षण मोगल सम्राट शहाजहान यांचा सत्तेचा दावेदार असलेल्या मोठा मुलगा दारा शुकोह याच्या हत्त्येनंतर आला. त्या घटनेपासून भारतीयांना एकच प्रश्न पडला होता तो असा की जर दारा शुकोह याचा लहान भाऊ औरंगजेब याच्या जागी दारा सिंहासनावर बसला असता तर आपला इतिहास काय झाला असता? औरंगजेब हा असहिष्णू आणि मूलतत्त्ववादी होता. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीची बीजे दाराच्या हत्त्येनंतरच रुजली होती. फाळणीची जबाबदारी तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड माऊन्टबॅटन यांना पार पाडावी लागली होती.‘दारा’ हे नाटक केवळ आपल्या भूतकाळाविषयी नाही. अन्य ऐतिहासिक नाटकांप्रमाणेच हेही नाटक आजच्या काळाचे दर्शन घडविते. हे नाटक लंडनच्या नॅशनल थिएटरमध्ये जेव्हा दाखविण्यात आले, तेव्हा लंडनमधील प्रेक्षकांनी हे नाटक सिरियातील सध्याच्या मुस्लीम अतिरेकवादाशी मिळते जुळते असल्याचे म्हटले. मला मात्र मोहन भागवत आणि त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारताला हिंदू राष्ट्रात परिवर्तित करण्याची भूमिका आठवली. नरेंद्र मोदींना दारा शुकोहप्रमाणे भारत हे सगळ्या भारतीयांचे राष्ट्र आहे असे मानून सत्ता गाजवायची आहे, तर मोहन भागवत यांना मात्र भारताचे स्वरूप दुर्दैवी पाकिस्तानप्रमाणे करायचे आहे.दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आपने जी त्सुनामी आणली त्याचा अनेकांना बोध होत नाही. वास्तविक भारताच्या तकलादू लोकशाहीची ती जीत आहे. खरा प्रश्न भारताचे राजकारणी त्याचा अर्थ कसा लावतील हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयाचा चुकीचा अर्थ लावू नये. हा त्यांच्या विकासाच्या अजेंडाच्या विरोधातील कौल नाही. उलट त्यातून संघपरिवाराचे विभाजनवादी राजकारण या विजयाने नाकारले आहे. दारा शुकोह (१६१५-१६५९) हा वेगळा आणि मोगल सम्राटांच्या अन्य वारसदाराहून विभिन्न असा राजपुत्र होता. मोगल सत्तेचा आरंभ १५२६ साली व शेवट १८५७ मध्ये झाला. दारामध्ये हुमायून आणि अकबर या दोन मोगल सम्राटांचे गुण एकवटले होते. हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या अनुयायांना एकत्र करून शांतता प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. तो सुफी विचारवंत होता. परमेश्वराचा शोध घेणे हे सगळ्यांसाठी समान असते असे त्याचे मत होते. वैदिक आणि इस्लामिक तत्त्वज्ञान एकत्र करण्यासाठी त्याने आपले आयुष्य वेचले. कुराणातील किताब अल मकनुन (लपलेले पुस्तक) म्हणजे, वास्तवात उपनिषदच आहे असे त्याचे मत होते. ते जाणून घेण्यासाठी त्याने संस्कृतचा अभ्यास केला. इतकेच नव्हे तर उपनिषदे, भगवद्गीता आणि योग वसिष्ठाचा त्याने पर्शियन भाषेत अनुवाद केला. त्यासाठी त्याने बनारसच्या पंडितांची मदत घेतली. अकबर आणि कबीर यांच्या पावलावर पाऊल ठेवीत त्यानी हर राय या शीख गुरुला प्रोत्साहन दिले. त्यामुळे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या शिलान्यासासाठी त्याला बोलावले होते. भारतातील विविध संस्कृतींच्या संगमाचे तो एक चांगले उदाहरणच होता.१६५७ मध्ये सम्राट शहाजहान आजारी पडला तेव्हा आपला मोठा भाऊ दाराच्या विरोधात औरंगजेबाने उठाव केला. तो स्वत: कर्मठ होता. त्याने इस्लामी मुल्ला-मौलवींची बैठक बोलावली. त्यात आपल्या समर्थकांचा भरणा केला. बैठकीने दारास दोषी ठरवले व ३० आॅगस्ट १६५९ रोजी त्याला ठार करण्यात आले. तो जर जिवंत राहिला असता तर भारताचा सत्तासंघर्ष कदाचित वेगळा राहिला असता. काही इतिहासकारांच्या मते दारा आणि सुफी संत सरमद यांची हत्त्या केल्यामुळे औरंगजेबाला शाप मिळाल्याने मोगल साम्राज्य नष्ट झाले!दाराच्या मृत्यूनंतर औरंगजेब सत्तेत आला. त्याने बिगरमुस्लीम भारतात शरियतचे नियम लागू करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानात आपल्या भावाला, पुतण्याला आणि मुलांनाही ठार करणाऱ्या औरंगजेबाला मुस्लीम हिरो समजण्यात येते, तर दाराचा उल्लेख तळटीप म्हणून करण्यात येतो.काही दिवसात भारताचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. आपच्या दिल्लीच्या विजयातून मोदींनी कोणता बोध घेतला हे त्यात पहायला मिळेल. त्यांनी परिवर्तनाच्या आणि सुधारणांच्या मार्गावरून मागे जाण्याचे ठरविले तर ते दुर्दैव ठरेल. कारण रोजगार निर्माण करण्यासाठी आणि भारताचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुधारणांचा मार्ग स्वीकारणेच योग्य ठरणार आहे. त्यांनी हिंदुत्ववाद्यांचा आवाज बंद करून असहिष्णू औरंगजेबाच्या मार्गाने न जाता दाराच्या भारताविषयी असलेल्या कल्पनेपासून प्रेरणा घ्यायला हवी.भारताच्या पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेले दारा शुकोव्ह यांचे ग्रंथालय आजही दिल्लीच्या काश्मिरी गेटजवळील गुरु गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या जागेत पाहता येते. तेथे दारा शुकोव्ह यांनी लिहिलेला ‘मजमा-उल-बहरीन’ (दोन समुद्रांचा संगम) हा ग्रंथ पहावयास मिळतो. त्यात सुफी आणि वेदान्तातील विचारांचे साम्य शोधण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. धर्म हा सत्याचा, सौंदर्याचा, प्रेमाचा आणि न्यायाचा शोध घेण्याचा शांततामय मार्ग कसा आहे यासंबंधी या ग्रंथातील दाराच्या कल्पनांपासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकाल. जे लोक धर्माला सत्ता संपादनाचा मार्ग समजतात ते इतिहासाचे खलनायकच आहेत!गुरुचरण दास (विख्यात शिक्षणतज्ज्ञ)
मोगल सम्राटांपासून मोदींनी कोणता बोध घ्यावा?
By admin | Updated: February 21, 2015 02:14 IST