- सुधीर महाजनदुष्काळ मराठवाड्यासाठी नवा नाही. इतिहासात डोकावले तर हा हवामान बदल ‘ग्लोबल वार्मिंग’चा परिणाम असावा, असेही वाटत नाही, एवढे त्यात सातत्य आहे.लातूरला रेल्वेने पाणी आणणे ही घटना इतिहासात १९७२ च्या दुष्काळात ‘मिलो’ ज्वारी खाण्यासारखी ठरणार. म्हणजे २०१५-१६ चा दुष्काळ ‘रेल्वे पाण्याचा’ दुष्काळ म्हणून ओळखला जाईल. सध्या सर्वत्र चर्चा दुष्काळाचीच आहे. भविष्यात त्याची तीव्रता कमी असावी यासाठी कोणी उपाय योजते का, ते माहीत नाही आणि ते करायला आपण काही अमेरिका नाही. पुढच्या वर्षी ‘एल निनो’चा धोका अमेरिकेला असणार असा अंदाज असल्याने त्यांनी आताच पिकांचे नियोजन केले. आपण वर्षानुवर्षे टँकर आणि चारा छावण्या उभारून पाठ थोपटून घेतो. दुष्काळ हा काही आपल्या मराठवाड्यासाठी नवा नाही. तो तर पाचवीला पुजलेला. म्हणजे पाच वर्षांतून एक वर्ष दुष्काळाचे हमखास. म्हणजे तसा तो सवयीचा झाला. नव्हे आपल्या डी.एन.ए.मध्येच तो असला पाहिजे. गेल्या ७००-८०० वर्षांच्या इतिहासात डोकावले तर याची खात्री पटते. इ.स. १३२२ मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी करून यादवांचे राज्य संपुष्टात आणले. त्यावर्षी मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची मारामार होती आणि अखेर अलाउद्दीन खिलजीला अन्नधान्याची कोठारे उघडून द्यावी लागली होती. पुढे १३४१ ते ४७ या काळात महंमद तुघलकाचा कारभार. त्याने राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. ही पाच-सहा वर्षे मराठवाड्याची जनता दुष्काळ आणि युद्धाचा मार सहन करीत होती. ही दुष्काळी स्थिती पुढे हसन गंगू बहमनीच्या सत्तांतरापर्यंत चालू होती. दुष्काळाचा सर्वात मोठा तडाखा बसला होता तो १३९६ ते १४०७ तब्बल अकरा वर्षे दख्खनमध्ये दुष्काळाने थैमान घातले होते. यात मराठवाड्याची निम्मी लोकसंख्या कमी झाली. लोक अन्न-पाण्याविना तडफडून मृत्यू पावले. इतिहासात हा ‘दुर्गा देवीचा दुष्काळ’ म्हणून प्रसिद्ध आहे.मोगलांच्या कारकिर्दीत १६२८-३२ हा काळ दुष्काळाचा होता. हा शहाजहानचा काळ. यावेळी दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी चार जणांची एक समिती नेमली होती. बुरहाणपूर हे दख्खनच्या सुभेदारीचे ठिकाण होते. दुष्काळी मदतीसाठी शहाजहान राजाने आजमखान या सरदाराची निवड केली आणि तब्बल २० आठवडे प्रत्येक सोमवारी सरकारी खजिन्यातून पाच हजार रुपये मदत वाटप केली जात असे. संपूर्ण दख्खन सुभ्यात दुष्काळी कामे सुरू केली होती. पुढे १६८५-१६९१ हा सम्राट औरंगजेबाच्या दख्खनमधील स्वारीचा काळ. यावेळी शिवाजी राजांचे नुकतेच निधन झाले होते. त्यात दुष्काळाचा फटका बसला. पावसाअभावी ज्वारी, बाजरीची पेरणी होऊ शकली नव्हती. दुष्काळ व साथीच्या आजारामुळे निम्मे लोक मृत्यू पावले होते. पुढे १७०३ ते १७०६ या काळात दुष्काळ पडला. ही वेळ मराठ्यांनी मोगलांवर केलेल्या स्वाऱ्यांची होती. दुष्काळग्रस्तांसाठी मोगलांनी उत्तरेतून पाठविलेले धान्य मराठ्यांनी अजिंठ्याच्या घाटात लुटले. औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा दुष्काळ कायम होता. पुढे १७१३-१५ या काळात दुष्काळ पडला, त्यावेळी दुष्काळग्रस्त, विधवा यांना अन्नधान्य व औषधांची मदत केली गेली. १७४९ च्या दुष्काळात औरंगाबादेत ज्वारीचा भाव ८० रुपये पल्ला होता, तर १७८७ च्या दुष्काळात १ रुपयाला ९ शेर ज्वारी मिळत होती. पुढे १८०२-०३, १८२४-२६, १८४७, १८५५, १८७७ ही दुष्काळाची वर्षे. १८७७ मध्ये कन्नड आणि वैजापूर या दोन तालुक्यांत बिकट स्थिती होती. १८७५ मध्ये निजाम सरकारने मौलवी मेहंदी अली यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सादर केलेला दुष्काळी अहवाल हा महत्त्वाचे दस्तावेज समजला जातो. पुढची १०० वर्षे दुष्काळाची आपल्याकडे व्यवस्थित नोंद आहे. कारण इंग्रजांनी हा सर्व दस्तावेज तयार केला आणि जतन केला. या इतिहासाचे स्मरण यासाठी की दुष्काळ हा नवा नाही आणि त्यात खंडही पडला नाही. पूर्वीही दुष्काळग्रस्तांना मदत केली जात होती. दुष्काळी कामे सुरू केली जात. म्हणजे या गोष्टींमध्येही नवीन काहीच नाही. आजही तेच होत आहे. दुष्काळाचे फटके बसूनही आपण शहाणे होत नाही. पिढ्यान्पिढ्या हीच वृत्ती कायम आहे. आपले संकल्प, निर्धार पावसात वाहून जातात, हेच वास्तव.