महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जात असले आणि सर्व संत संपूर्ण समाजाचेच मार्गदर्शक असतात ही बाब स्वयंसिद्ध असली तरी आज या साऱ्या संतांची जातवार विभागणी करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे! परंतु तितकेच नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन साऱ्या संतांची पोटजातनिहाय विभागणी करण्यातही महाराष्ट्राला यश मिळाले आहे. त्याचाच कित्ता आता देशाच्या नेत्यांच्याबाबत लोक किंवा समाज नव्हे तर खुद्द सरकारच गिरवू लागले आहे असे दिसते. ज्या न्यायाने संतसज्जन जाती-पातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारे म्हणून संपूर्ण समष्टीच्या आदरास पात्र मानले जातात त्याच न्यायाने राष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करताना ज्यांनी विशिष्ट पक्ष वा संघटनेच्या पल्याड जाऊन विचार केला त्यांनाही आदरणीय मानले जाते. परिणामी त्यांच्या योगदानाचे मोल जाणून त्यांचा उचित आदर राखणे सरकारचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु देशातील नवे सरकार या कर्तव्यास आणि खरे तर कृतज्ञतेच्या भावनेस पारखे होताना दिसत आहे. दिल्लीतील नव्या सरकारची सत्तारोहणाची वाट ज्या माध्यम क्रांतीमुळे अगदी सुलभ झाली, त्या माध्यम क्रांतीचा प्रारंभ देशात राजीव गांधी यांनी केला व त्यासाठी आज देशाच्या सत्तेत असलेल्यांकडून हिणवूनही घेतले. पण गेल्या २० आॅगस्टच्या राजीव गांधींच्या जयंतीदिनी सरकारने त्यांचे स्मरण करण्याबाबत स्वत:स सोयीस्कर विसर पाडून घेतला. काँग्रेस पक्षाने मात्र आपल्या या दिवंगत नेत्याच्या स्मृती वृत्तपत्रीय जाहिरातींच्या माध्यमातून जागविल्या. त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांचे नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व तर देशाच्याही सीमा ओलांडून पलीकडे गेले होते. त्यांच्याविषयी भले काहींच्या मनात काही वेगळे विचार असू शकतील; पण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग कोणीही नाकारू शकत नाही. तसे करणे हा केवळ करंटेपणा नव्हे तर कृतघ्नपणाच मानला जाऊ शकतो. दुर्दैवाने विद्यमान सरकारने त्यांच्याही बाबत तेच केले आहे. तसे करण्याने आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि एकप्रकारे देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान पुसून टाकू शकतो असे सरकारला वाटत असेल तर तो एक भ्रम ठरू शकतो, हे निश्चित. परिणामी इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनी केवळ काँग्रेस पक्षानेच त्यांच्या स्मृती जिवंत केल्या आहेत. सरकारच्या पातळीवर अशीच असंवेदना कायम राहत गेली आणि भविष्यात पुन्हा एकदा सत्तापालट झाला तर असे कृतघ्नसत्र सुरू राहणे कोणाच्याच हिताचे नाही.
संकुचित की कृतघ्न
By admin | Updated: November 1, 2015 23:36 IST