शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा ‘गोड’ व्यापार नफ्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 23:42 IST

देशात सत्तांतर होऊ द्या, सरकारच्या धोरणात काही फरक पडत नाही. आपल्याला हवे तसे सरकारचे धोरण तयार करून घेण्याची जादू काही वर्गाला जमली आहे.

देशात सत्तांतर होऊ द्या, सरकारच्या धोरणात काही फरक पडत नाही. आपल्याला हवे तसे सरकारचे धोरण तयार करून घेण्याची जादू काही वर्गाला जमली आहे. साखरेच्या उद्योग आणि व्यापाराविषयी असेच म्हणावे लागेल. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर तर साखरेच्या धोरणाचा खेळखंडोबा चालू आहे. गेल्या सात महिन्यांत चार वेळा साखर उद्योगाविषयीचे धोरण बदलले गेले. त्याचा परिणाम साखरेचे दर स्थिर राहण्यावर झाला आहे. याचा सर्वाधिक फटका साखर उद्योगातील सर्वांत तळातील घटक म्हणजे शेतकऱ्यांना बसत आहे.

या उलट साखर खाणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळत नाही, तर साखरेचा वापर करून शीतपेयापासून मिठाई तयार करणाऱ्या उद्योगांना याचा सर्वाधिक फायदा होत आहे.गेल्या वर्षी साखर उत्पादन अधिक झाले तेव्हा साखरेचे भाव प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांपर्यंत घसरले होते. त्याचा सर्वाधिक तोटा साखर कारखान्यांना बसला. पर्यायाने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देणे अशक्य होत गेले. परिणामी साखरेची निर्यात वाढावी आणि साखरेचे भाव वाढावेत म्हणून निर्यात अनुदान देण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले. एकूण साखर उत्पादनापैकी बारा टक्के साखर निर्यात करावी आणि त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रति क्ंिवटल ४५ रुपयांचे थेट अनुदान द्यावे असे ठरविले गेले.

दरम्यानच्या काळात साखरेचे भाव वाढताच निर्यात धोरणात बदल करण्यात आला. साखरेचा किमान कोटा निर्यात करणाऱ्यांना अनुदान अद्याप मिळालेले नाही. साखरेचा पुरवठा मर्यादित असताना भाव थोडे वाढताच आता साखरेच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, केवळ चार दिवसात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी साखरेचे भाव गडगडले आहेत. मात्र, किरकोळ विक्रीचा भाव अद्यापही ४० ते ४३ रुपये प्रति किलो असाच आहे.

वास्तविक साखरेच्या एकूणच वापरापैकी किंवा उपभोगापैकी केवळ ३० टक्केच साखर ग्राहकांकडून वापरली जाते. उर्वरित ७० टक्के साखर विविध उद्योग- व्यापारात वापरली जाते. साखरेचे दर वाढल्याचा फटका ग्राहकांना कमी आणि साहजिकच उद्योगांना अधिक बसणार आहे. त्यांची काळजी घेण्यासाठीच सरकारने आता साखरेचे भाव पाडण्याचे धोरण स्वीकारले आहे.साखरेचा किरकोळ विक्रीचा भाव ४० ते ४५ रुपये असेल तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किमान २५०० ते ३००० रुपये प्रति टनास भाव देणे शक्य होणार आहे.

तेवढा भाव दिला तरच ऊसकरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील. प्रति क्विंटल ३००० ते ३५०० रुपये भाव कारखान्यांना मिळाला तरच हा भाव शेतकऱ्यांना देणे शक्य आहे. ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाचा खर्च गृहीत धरून साखरेचे भाव स्थिर ठेवण्याचा विचार व्हायला हवा. गत वर्षी याच काळात साखरेचे भाव १९०० ते २००० प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. तेव्हा साखरेचे भाव वाढवून मिळावेत यासाठी सरकार स्वत:हून काही निर्णय घेत नव्हते. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना वारंवार विनंत्या कराव्या लागल्या. तेव्हा अतिरिक्त साखरेचा कोटा निश्चित करून साखरेला निर्यात अनुदान देण्याचे धोरण घेण्यात आले.

आताचे साखर साठ्यावर निर्बंध आणण्याचे धोरण साखर कारखानदारीला फटका देणारे आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गत वर्षीच्या साखर हंगामाच्या प्रारंभी जे धोरण स्वीकारले, त्याच्या परिणामी या वर्षी साखरेचे भाव वाढले. किमान आधारभूत किंमत उत्पादकांना देणे शक्य होऊ लागले. आता सरकारने साखरेचा साठा २४ टक्क्यांपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, साखर मोठ्या प्रमाणात बाजारात येऊन भाव कोसळतील व त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसेल. त्यामुळे साखरेच्या भावाशी खेळणारे सरकार कोणाचे हित पाहाते हे ओळखण्याची गरज आहे.- वसंत भोसले