विजयराज बोधनकर - आजकाल नापास होण्याचं प्रमाण बरचसं घटलं आणि पास होण्याचं प्रमाण वाढलं. फक्त पास होणं महत्त्वाचं नसून किती टक्के मार्क पडले हे महत्त्वाचं समजणारा काळ. काळ माणसाला बदडतो-बदलतो आणि घडवतो व बिघडवतो. पण निसर्ग हा तठस्थ उभा आहे. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. निसर्गाचं रहाटगाडगं पूर्वीपासून आत्तापर्यंत समप्रमाणात तसंच चालू आहे. निसर्गाचा निर्माता ना कधी कळला ना कधी कळण्याची शक्यता आहे. पण निसर्गाची •भाषा ज्याना कळली त्यांचं नाव रविन्द्रनाथ टागोर. त्यांनी शांती निकेतन सारख्या निसर्गरम्य विद्यालयाची निर्मिती केली. तिथे टक्क्यांची •भाषा नव्हती. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गाने कुठल्या न कुठल्या कलाकौशल्याचं बीज देऊन पाठविलं, याचा अंदाज घेऊन विद्यार्थ्याला तसं प्रोत्साहीत करण्यात यायचं. शांती निकेतनची नेमकी विचारधारा कुठली होती? तर मुळातच आंतरिक कौशल्य असलेला विद्यार्थी लवकर सिद्धतेच्या रांगेत येऊन बसतो. त्याला शिकवावंच लागत नाही. त्याला उपजत ज्ञान असतं. फक्त त्याला मार्गदर्शन हवं असतं. मग विषय कुठलाही असो, तिथे स्पर्धा अजिबात नसते. तिथे मन-बुद्धीच्या क्षमतेचं प्रगटीकरण असतं. हीच विचारधारा तिथे होती. हे सारं समजायला संवेदनशील मन हवं. लादलेल्या अभ्यासक्रमातून शाळेचा आणि क्लासेसचा •भाव नक्कीच वधारतो. पण मुलांच्या मनात असलेल्या निसर्गदत्त गुणांचा जिवंतपणीच हा समाज खून करतो. क्लासेसवाल्यांच्या जाहिरातींना फसणारे पालक हे स्पर्धेच्या बाजारातले पहिले दुख: आहे. मुलांना ९५% टक्क्यांच्या वर मार्क पडले की आईबाप चिमूटभर समाजात प्र्रसिद्धीस येतात. मुलं पैशाने सुखी आणि धनवंत बनावीत अशा नादावलेल्या स्वप्नात मुलांच्या आंतरीक कौशल्याचा कुणी विचारच करीत नाही. पुस्तकातलं ज्ञान पाठ करून त्याची उत्तरे लिहून काढणे म्हणजे ज्ञानवंत का? तर जो स्वयंसिद्धतेने काहीतरी निर्माण करून दाखवितो तो खरा बुद्धीमान ठरतो. मुलांना जे बनायचं ते बनू देणारे पालक मुलांना आनंदाच्या मार्गावरून जाऊ देतात आणि इतर सर्व नोटांच्या रस्त्यावरून जायला लावतात. पैसा पैसा करत शेवटी दुु:खाला कारणीभूत ठरतात. पैशाने सर्व सुखे, आनंद विकत घेता येत नाही, पण मनाच्या सुखातून फक्त आनंदाच्याच रस्त्यावरून चालता येऊ शकतं आणि सिद्धतेसाठी फक्त समाधानाचीच गरज असते... जे समाधान आपण आज हरवून बसलो आहोत. कारण सारेच प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत.
सिद्धी विरुद्ध प्रसिद्धी
By admin | Updated: June 12, 2015 23:44 IST