‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे संतवचन सर्वज्ञात आहे. पण त्याची प्रचिती त्यांनाच येते, जी माणसे ते संतवचन प्रत्यक्षात तसे जगण्याचा प्रयत्न करतात. पेरलेच नाही तर उगवेल कसे? यासाठी आधी कोणीतरी पेरायची तयारी करायला हवी. याचा अर्थ याआधी कुणी पेरलेच नाही असा होत नाही. आख्खे आयुष्य पणाला लावून आणि हाडाची काडे करून ओल्या मातीत सृजनाचा नवा आविष्कार पाहण्यासाठी बळीराजा नावाचा एक सोशिक, भोळा-भाबडा प्राणी याच मातीत राबराब राबतोय, जगाच्या अन्नाची सोय करतोय आणि एक वेळ आज अशी आली आहे की, तो दाताच आता काही ठिकाणी एकवेळच्या अन्नाला मौताज झाला आहे. ही परिस्थिती का उद्भवली, हे दुखणे कायमचे नष्ट होण्यासाठी काय करायला हवे याविषयी कोणीच काही बोलायला तयार नाही. केवळ संपुटामागून संपुटांचे वाटप करूनही हा प्रश्न निकाली निघू शकत नाही. कारण एकदा मंजूर झालेल्या संपुटांचे नंतर काय होते ते साऱ्यांनाच ठाऊक असते. त्यामुळे संपुटांच्या वाटपानंतरही आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. किरकोळ रकमेपायी शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागू नयेत यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोन अभिनेते एकत्र येतात, ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना करतात आणि गावोगावी जाऊन आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रारंभी पदरमोड करून मदतीचे धनादेश देतात. या मदतीतूनही हा प्रश्न निकाली निघणार नाही हे नानालाही ठाऊक आहे, पण त्यांची फाटकी परिस्थिती सांधण्यासाठी काहीसा हातभार तरी लावेल या भावनेने नानाने उचललेले पाऊल सर्वच स्तरावर कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरले आहे. ‘आपण समाजाचे सतत काही ना काही देणे लागतो. आपल्याला देवाने दोन हात दिलेले आहेत त्याचे कारण आपल्याला ते दोन हात पुरेसे आहेत. त्या दोन हातामध्ये जेवढे मावेल तेवढे आपल्याला पुरेसे आहे. ते दोन हात भरल्यानंतर ते मातीत पडण्याआधी लोकांना देऊन टाका तुम्ही, नाहीतर ते जाणारच आहे...’ असा विचार नानाने एका कार्यक्रमातून मांडला होता. त्या विचारांची अंमलबजावणी ‘नाम’च्या माध्यमातून करून ‘बोले तैसा चाले’ची प्रचिती नानाने दिली आहे. जे पुढाऱ्यांना जमले नाही ते काम नाना करतोय. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून मदतीचा हातही मिळतोय. आता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करण्याचा आणि आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पशुपालन व शिवणकामाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा संकल्प ‘नाम’ने केला आहे. ‘नाम’च्या कामाला सलामचा करायला हवा. अशा चांगल्या विचारांची पेरणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘नाम’ तुझे सलाम
By admin | Updated: February 8, 2016 03:36 IST