शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

सहेला रे...

By admin | Updated: April 4, 2017 23:47 IST

किशोरी एक जीव आहे, तिला जरा-मरण आहे. किशोरी जन्माला आली

‘‘रागाला जरा-मरण नाही. किशोरी एक जीव आहे, तिला जरा-मरण आहे. किशोरी जन्माला आली, वाढली, मृत्यू पावली तरी यमन आहेच - तिच्या जन्मापूर्वी होता, तिच्या जीवनकाळात आहे, आणि तिच्या मृत्यूनंतरही तो असणारच आहे. जे चिरंतन, जे अजर-अमर ते पाहा !! कलाकार काय आज आहे, उद्या नाही!’’ - असं पोटतिडकीनं सांगणारा किशोरी नामक आठवा सूर संगीत विश्वात उमटला आणि रंगगृहाचं गर्भगृह कधी झालं हे कळलंच नाही. रंगमंदिर भारून टाकणारा तो सूर सच्चा होता. सर्वार्थानं सात्त्विकही. कधी तो लखलखत्या झुंबरासारखा भासला तर कधी देव्हाऱ्यातल्या सांजवातीसारखा स्निग्ध आणि प्रसन्न. कधी सोनचाफ्यासारखा दरवळला, तर कधी पारिजातकासारखा अलगद टपटपला. कधी चैत्रातल्या उन्हासारखा स्वच्छंदपणे उब देत अंगाखांद्यावर बागडला, कधी श्रावणसरींसारखा झिमझिमला... कधी पौषातल्या गारव्यासारखा झोंबला. बघता बघता त्या सच्च्या विशुद्ध सुरांपुढे लौकिक जग मिथ्या वाटू लागलं. सारं काही निरर्थक ठरलं. मुख्य म्हणजे कानांत प्राण ओतून हे अद्भुत सूर मनात साठवू पाहणाऱ्यांना अभिजात संगीताचा अर्थ उमगला. जोडीनं भारतीय तत्त्वज्ञानाचं सारही उलगडलं.बाकी बाब म्हणायचे ना, मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो.. जीवन त्यांना कळले हो !... किशोरी आमोणकर या व्यक्तीचा ‘स्व’ कधी गळला नाही हे खरं, पण त्यांच्यातली सूरसाधक मात्र अहंभावाचं विसर्जन करून कधी न गवसणाऱ्या साध्यासाठी नतमस्तक होऊन साधनेच्या डोहात जी उतरली, ती खोलखोलच जात राहिली. किशोरी आमोणकर या गायिकेच्या हट्टाग्रहाचे किस्से-कहाण्या कानी पडणाऱ्या, प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या रसिकांना त्यांच्याच मैफलीतल्या संगीताने अहंचा अंगरखा उतरवणाऱ्या अनुभूतीचा साक्षात्कार एरवी कसा दिला असता? वेदान्ताचं सार सुरांतून उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य लाभलेली ही बहुधा एकमेव गायिका. म्हणूनच साक्षात सरस्वती. उभ्या भारतवर्षासाठी गानसरस्वती...किशोरीताईंच्या ‘भेटी’ अविस्मरणीयच. अर्थ इकडचा असो वा तिकडचा! स्थल-काल बदलले, पण अनुभूती अगदी तशीच. बावनकशी. शंभर नंबरी. म्हणून तर या गानसरस्वतीच्या सतत बदलत्या, चंचल स्वभावविशेषांची, लहरींची चर्चा झाली. कुजबूजही झाली. पण आविष्काराच्या पारलैौकिकत्वाच्या जातकुळीबद्दल बोलायला कुणी कधीच धजावलं नाही. बड्या कलावंतांना गायकांना आकर्षण वाटावं, प्रसंगी हेवा वाटावा असं हे गाणं. सर्वस्वी अलौकिक. ‘- पण मग त्या असं का वागतात?’ - हे कोडं खरंतर एव्हाना किशोरीतार्इंच्या हयातीतच उलगडण्याची संवेदनशीलता काहींच्या ठायी होती. त्यांनी सदैव या किस्से-कहाण्या कानाआड आणि मनाआडही केल्या. परिपूर्णतेचा ध्यास, सुरांवरची श्रद्धा आणि अविचल निष्ठा हा त्यांच्या मनस्वी लहरीपणाचा पाया होता, हे खरंच! आस्तिक माणसाची देवावरची श्रद्धा आणि या गायिकेची सुरांवरची श्रद्धा यांचा पोत वेगळा नव्हता. सच्च्या, निर्भेळ सुरांवरची ही श्रद्धा श्रोत्यांकडे संक्रमित करण्याच्या किमयेनं गानसरस्वतीची गायकी अलौकिक बनली. सहस्रचंद्रदर्शनाची दीर्घ वाटचाल करणाऱ्या या जीवनानं मानसन्मानाचे असंख्य क्षण अनुभवले. रसिकांनी जीव उधळून केलेलं प्रेम अनुभवलं. त्यांच्या कपाटात पुरस्कारांची तर केवढी गर्दी.. पण किशोरीतार्इंची ओळख होती ती एकच ! - या सगळ्यातून दशांगुळे उरलेलं त्यांचं गाणं ! मोगूबाई कुर्डीकरांसारख्या कडक शिस्तीच्या गुरूच्या पोटी जन्म घेणाऱ्या या बाईनं गायकीच्या पुरुषार्थाची चौकट स्वकर्तृत्वानं रुंद केली. मनाला येईल तेव्हा मोडलीही. नक्कल करण्याच्या पलीकडचे अद्भुत मापदंड निर्माण करून ठेवले. शास्त्रीय संगीतातील घराण्याच्या चौकटीबाहेरचा विचार केला. रससिद्धान्ताला जन्म दिला. त्याचं संगोपनही केलं. तसं पाहिलं तर शास्त्रीय संगीताच्या प्रांतात प्रतिभासंपन्न गवय्ये कमी नाहीत. मग किशोरीतार्इंचं वेगळेपण होतं तरी कशात? - त्यांच्या गायकीत असलेला मांगल्याचा ठहराव हीच ती अलौकिक बाब. सुरांच्या मांगल्याचं हे नवं घराणं सुरू करणाऱ्या किशोरीतार्इंना या प्रवासात लाभलेली रवींद्र आमोणकरांची साथ अव्याहत समेवरच राहिली. ‘तू सुरांचा संसार सांभाळ, बाकी सगळं मी बघतो’ अशा पद्धतीने त्यांनी लावलेल्या अमूल्य साथीचा षड्ज अचल राहिला. एखाद्या आयुष्यात पारलौकिकतेचं सातत्य तरी किती असावं ? सतरा-अठराव्या वर्षी पौगंडावस्थेच्या अल्याड-पल्याड आवाजाने दगा दिला. दोन एक वर्ष गायकीविना गेली. पण कष्टप्रद साधनेच्या बळावर किशोरीतार्इंनी तो आवाजही परत मिळवला. त्यात साधनेने अशी जादू भरली, त्याचंही मिथक झालं. सुरांच्या साथीनं झालेल्या वाटचालीत संगीताचे अनेक प्रकार या गानसरस्वतीला साद घालत होते. त्यातल्या काही धोपट मार्गांवर चार-सहा पावलं त्यांनीही टाकली. पण वहिवाटीपेक्षा अनवट मार्गाशी सख्य असलेल्या किशोरीतार्इंनी फर्माईशी गाणं कधी केलं नाही. मी गाईन तेच ऐकावं लागेल, हा त्यांचा हट्ट त्यांच्या गुणवत्तेमुळे श्रोत्यांनी आनंदानं मानला. गायकीतले त्यांचे प्रयोग स्वान्त:सुखाय नव्हते. त्या प्रयोगातून जन्मलेल्या आविष्कारांनी रसिकांच्या मनावर कायमचं गारुड केलं. अस्सल शास्त्रीय संगीत असूनही त्यांच्या ‘सहेला रे’ची मोहिनी एरवी रागसंगीतापासून दूर राहणाऱ्या जनसामान्यांवर अजून आहे आणि राहील! माणसाच्या मानसिकतेत भूप काय बदल करू शकतो याचाच तो प्रत्यय होता. तो भूप काही मिनिटांचा नव्हे, आयुष्याचा होता. भूप म्हटलं की दर्दी माणसाला ‘सहेला रे’ आठवतं. म्हणून तर सौमित्रच्या कवितेतही त्याचं प्रतिबिंब उमटलं. एकीकडे चित्रपट संगीत या प्रतिभेला साद घालत होतं. ‘गीत गाया पत्थरो’नेच्या पार्श्वसंगीतातील किशोरीतार्इंच्या सहभागामुळे खडकावरला अंकुर म्हणजे काय याची प्रचिती आली. वेगळेपणामुळे त्यांनी दिलेलं ‘दृष्टी’चं संगीतही गाजलं.वैश्विक आवाका असलेले किशोरीतार्इंचे सूर मराठी मनाचा तर अखंड ठाव घेत राहिले. जाईन विचारीत रानफुला भेटेल तिथे गं सजण मलायासारखं भावगीत असो की ‘हे श्यामसुंदरा’ सारखी बंदिश असो, प्रत्यय आला तो अलौकिक प्रतिभेचाच. पण या वाटेवर ही गानसरस्वती रेंगाळली नाही. रमली तर बिल्कुल नाही. ख्याल गायकीच्या शिखरावर मुक्काम ठोकणाऱ्या त्यांच्या प्रतिभेनं भावगीत, चित्रसंगीत लीलया पेललं. रसिकांचं विश्व अधिक समृद्ध केलं. पण त्यात त्या रमल्या नाहीत. त्यालाही कारण होतं. त्यांच्या लेखी सूर म्हणजे देवाला वाहिलेली फुलं. त्यांचं निर्माल्य होऊ द्यायचं नाही, हा त्यांचा अट्टाहास. कदाचित म्हणून असेल, झगमगत्या दुनियेची तोरणं झळकवण्यात प्रवीण असलेल्या रिअ‍ॅलिटीवाल्या मंडळींना त्यांच्या दारात जाण्याचंही धाडस कधी झालं नाही.शास्त्रीय संगीताची दीर्घ परंपरा लाभलेल्या आपल्या देशानं एकाच वेळी दोन कलावंत शिखरस्थ झालेले पाहिले. भीमसेन जोशी आणि किशोरीताई. दोघांनीही घराण्याचा लौकिक वाढवला. संतवाणी, मीरेची भजनं, भावगीतं असे प्रकार त्यांच्या सुरांनी आणखी मंगल झाले. त्यांच्या पावित्र्यात भर पडली. मराठी मनालाच नव्हे, तर जगभरातल्या श्रोत्यांवर त्या सुरांनी मोहिनी टाकली. तोडीची आर्तता किती उच्च कोटीची असते, हे किशोरीतार्इंच्या विशुद्ध सुरांनी दाखवून दिलं. सहेला रे आ मिल जासप्त सुरन की बेला सुनाएअब के मिलेबिछुडा न जा......उत्तररात्रीनंतरच्या रामप्रहरी उमटलेल्या या सुरांमधील आर्तता हे नुसतं गाणं थोडंच आहे? तो तर संवाद आहे, थेट ईश्वराशी साधलेला. तेच तर या गानसरस्वतीचं आयुष्य होतं. लक्ष्मीनं पायीची दासी व्हावं असं...