- पूजा दामलेशिक्षक म्हणजे आद्यगुरू. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही व्यक्तिमत्त्वांची जडणघडण होते. कॉलेज कॅम्पसमधील संस्कार आयुष्यभराची सोबत करणारे असतात. त्यामुळेच कॅम्पसमधील विधायक उपक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात. रुपारेल महाविद्यालयाचा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पही असाच उत्तम उदाहरण बनलेला आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तो माजी विद्यार्थ्यांनी राबवलेला आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून २० टक्के पाणीकपात होत आहे. त्यानंतर अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. खासगी जागांवरील लॉन आणि बागांसाठी पाण्याचे नियोजनदेखील जिकिरीचे बनले आहे. पण या परिस्थितीतही माटुंगा रोड येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालयात ‘हिरवाई’ बहरलेली आहे. एप्रिल-मे महिन्याच्या रखरखीत उन्हातही रुपारेलच्या कॅम्पसमधील ४०० हून अधिक झाडांना आणि तीन लॉनना पुरेसे पाणी मिळत आहे. कारण, १५ एप्रिल २००८ पासून सुरू केलेल्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्पामुळे महाविद्यालय प्रशासन पावसाळ्यापर्यंत निश्चिंत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देसाई यांनी सांगितले. रुपारेल महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘मॉब’ (मेंबरर्स आॅफ ब्रदरहुड) नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. ‘मॉब’ने २००७ मध्ये पुढाकार घेऊन रुपारेल महाविद्यालयात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची संकल्पना मांडली. ‘संयुक्त राष्ट्र संघटने’ने २००७ हे ‘पाणी वर्ष’ म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे हा प्रकल्प राबवायचा संकल्प ‘मॉब’ने सोडला. हा प्रकल्प कॅम्पसमध्ये दोन टप्प्यांत राबविला आहे. पहिल्या टप्प्यात कॅम्पसमधील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले. ज्या तळ गाठलेल्या विहिरीत पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विहिरींमधील नैसर्गिक झरे जिवंत झाले. आर्ट्स इमारतीच्या गच्चीवर साठणारे पाणी पाइपद्वारे या विहिरींमध्ये सोडले जाते. त्यानंतर या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी झाडे आणि अन्य कामांसाठी वापरण्यात येते, असे डॉ. देसाई यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात खड्डे खोदून त्यात पाणी साठवले जाते. या पद्धतीला ‘स्टोरेज टँक’ म्हणतात. या प्रकल्पाची क्षमता १ लाख ४३ हजार लीटर एवढे पाणी साठवण्याची आहे. या विहिरींमध्ये पंप बसवण्यात आले आहेत. फक्त कॅण्टीन आणि पिण्यासाठी महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जातो तर या प्रकल्पातून बाग, झाडे, लॉनसाठी आणि अन्य वापराचे पाणी वापरले जाते. सध्या मुंबईत पाणीकपात सुरू आहे. हा प्रकल्प नसता तर इतक्या झाडांना पाणी उपलब्ध करून देणे कठीण गेले असते. पण आता आम्हाला पावसाळ्यापर्यंत चिंता नाही, इतका पाणीसाठी आमच्याकडे आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.10 वर्षांपूर्वी ही संकल्पना तशी नवीनच होती. संकल्पना चांगली असल्याने महाविद्यालय प्रशासनाने यांना परवानगी दिली. या वेळी संस्थेकडे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी पैसे नव्हते. त्यामुळे एका खासगी कंपनीकडून त्यांनी या प्रकल्पासाठी पैसे घेतले. त्यानंतर जोरात काम सुरू झाले आणि अवघ्या वर्षभरात म्हणजे १५ एप्रिल २००८ मध्ये ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी -जोगळेकर आणि तत्कालीन मुंबई उपनगराचे कलेक्टर विश्वास पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. अनेक महाविद्यालयांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरला आहे.
‘रुपारेल’मध्ये अवतरली हिरवाई !
By admin | Updated: May 1, 2016 03:21 IST