अभिनेता अनुपम खेर यांच्या प्रस्तावित पाकिस्तान यात्रेच्या कथेला अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित वळणे मिळत मिळत अखेर या कथेचा क्लायमॅक्स खुद्द खेर यांनी स्वत:च लिहून आपली पाक यात्रा गुंडाळून टाकल्याचे जाहीर केले आहे. मुळातच भारत-पाक दरम्यानचे संबंध फारसे मधुर नसले तरी ते मधुर व्हावेत म्हणून उभय बाजूचे लोक वरकरणी तरी तशी इच्छा बोलून दाखवित असतात पण हे बोलणे कृतीत कसे उतरत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणून खेर यांना पाकिस्तानने दिलेल्या नकाराकडे बघता येईल. कराची येथील नियोजित ग्रंथ मेळाव्यासाठी भारतातील ज्या अठरा लोकाना संबंधित आयोजकांनी निमंत्रण दिले होते त्यात खेर यांचाही समावेश होता. त्यातील खेर वगळता बाकीच्यांना पाकी सरकारने ‘प्रवास परवाना’ (व्हिसा नव्हे) जारी केला. त्याचवेळी खेर यांना तो मागूनही मिळणार नाही म्हणून त्यांना तसा अर्जच करायला सांगू नका असे दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासाने म्हणे आयोजकांना कळविले. त्यावर आपल्याला पाकिस्तानने प्रवेश नाकारला आणि नाकारण्याची ही तिसरी वेळ आहे असे जाहीर करुन खेर यांनी त्याचे भांडवल करण्यास सुरुवात केली. तसे करताना आपण काश्मीरी पंडित आहोत, मोदी समर्थक आहोत, वाढत्या असहिष्णूतेसंबंधी बोलणाऱ्यांना आपण विरोध केला वगैरे वगैरे कारणे सांगून त्यापायीच आपल्याला पाकने व्हिसा नाकारला असावा असे अनुमान त्यांनी काढले. वास्तविक पाहाता ज्या कारणांपायी व्हिसा नाकारला गेला असे त्यांना वाटत होते त्यातील कशाचाही थेट पाकिस्तानशी काही संबंध नव्हता. अलीकडेच भारत सरकारने पद्मभूषण जाहीर करुन ज्यांचा गौरव केला आणि अभिनय क्षेत्रात ज्यांची कामगिरी खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे अशा अनुपम खेर यांच्यासाठी पाकिस्तानने आपले दरवाजे बंद करण्याचे वृत्त प्रसारित होताच खळबळ माजणे स्वाभाविकच होते. तशी ती माजलीदेखील. त्यानंतर मात्र पाकिस्तानचे दिल्लीतील राजदूत अब्दुल बासीत यांनी म्हणे जातीने खेर यांना दूरध्वनी केला आणि नंतर ट्विटदेखील केले आणि खेर यांचे पाकिस्तानात स्वागत करण्याचे व त्यासाठी त्यांना व्हिसा देण्याचे निमंत्रण दिले. तेच आता खेर यांनी नाकारले आहे. काश्मीर समस्या सुटेल तेव्हां सुटेल पण तोवर दोन्ही देशांदरम्यानचे किमान सांस्कृतिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने तरी प्रयत्न केले गेले पाहिजेत या भूमिकेला शिवसेनेसारख्या संघटनेने हरताळ फासणे वेगळे पण अनुपम खेर प्रकरणात हरताळ फासण्याचे काम खुद्द त्या देशाच्या दिल्लीतील दूतावासानेच केल्याचे या प्रकरणात दिसून आल्याने पाकी गझल गायक गुलाम अलि यांना दिल्या गेलेल्या वागणुकीचा बदला म्हणून खेर यांना तशाच प्रकारची अवमानकारक वागणूक दिली गेली असल्यास दोन्ही देशांमधील संबंध किती नासले गेलेले आहेत याचे दर्शन पुन्हा एकदा घडून आले, इतकेच
नकार होकार नकार
By admin | Updated: February 4, 2016 03:19 IST