साहित्य संमेलन असो वा एखाद्या जातीचे संमेलन असो, त्यातून विचारमंथन व्हावे व त्या क्षेत्राला नवी दिशा मिळावी ही अपेक्षा असते. त्याच कारणाने विविध क्षेत्रांच्या संमेलनांची मोठी परंपरा निर्माण झाली. या परंपरेच्या पंक्तीत आता नव्या क्षेत्राची भर पडत आहे़ राज्यात दरवर्षी सुमारे दोन लाख मुले-मुली विविध स्पर्धांना बसतात. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मदतीची ठरणारी अनेक पुस्तके बाजारात येत आहेत. विविध साहित्य प्रकारात आता ‘स्पर्धा परीक्षा साहित्य’ हा नवा प्रकार साहित्य क्षेत्रात नावारूपास आला आहे. तीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांपुढे आपले करिअर घडविण्याचे पारंपरिक व मर्यादित पर्याय उपलब्ध असायचे. किंबहुना इंग्रजी माध्यम असणाऱ्या आणि उच्चभ्रू शहरी मुलांसाठीच स्पर्धा परीक्षा क्षेत्र असल्याचा गैरसमज त्यावेळी ग्रामीण भागात होता. त्या गैरसमजावर मात करत जे ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या मैदानात जिद्दीने उतरले, त्यापैकी काही यशस्वीही झाले. बदलत्या काळाने ग्रामीण महाराष्ट्राला स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहात आणण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. तरीही त्या प्रवाहात सामील होण्यासाठी ग्रामीण भागातील मुला-मुलींना शहरांकडे धावावे लागत आहे. स्पर्धा परीक्षांची करावी लागणारी तयारी, त्यासाठी उपलब्ध असणारी पुस्तके आणि व्यक्तिमत्त्व विकासाची सुस्पष्ट संकल्पना याची सांगड घालण्याचा कानमंत्र देणारी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. या गरजेला न्याय देण्याची धडपड अनेक गावांमध्ये सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिशा देणारे एक व्यासपीठ तयार होणे आवश्यक होते. नेमकी तीच आवश्यकता जाणून स्पर्धा परीक्षा संमेलनाचे जनक होण्याचे काम झारखंड राज्यात ऊर्जा खात्यात कार्यरत असलेले आयएएस अधिकारी रमेश घोलप आणि बार्शीकरांनी केले. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाच्या संयोजनात अजित कुंकूलोळ, रामचंद्र इकारे, संतोष ठोंबरे, प्राचार्य दीपक गुंड, बाळासाहेब डेंबरे, खंडू डोईफोडे, हर्षल लोहार हे विशेष परिश्रम घेत आहेत. राज्यात काही व्यावसायिक संस्थांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलने होताना दिसतात; मात्र केवळ तळमळ आणि बांधिलकी म्हणून होणारे हे पहिलेच संमेलन ठरणार आहे़ जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची मोठी परंपरा आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, मिलिंद म्हैसकर, नगर विकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता कार्यालयाचे अधिकारी अविनाश सोलवट ही विद्यमान सरकारमधील अधिकारी मंडळी सोलापूरचीच ! या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिल्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचे यजमानपद सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावाला मिळते आहे, हे विशेष ! ग्रामीण भागातील नव्या पिढीला प्रेरणा देणारी आणि स्पर्धा परीक्षांकडे आकर्षित होण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणारी जिल्ह्यातील किमान दोनशे अधिकाऱ्यांची मोठी फळी राज्यात विविध ठिकाणी आणि विविध खात्यात कार्यरत आहे. वानगीदाखल काही अधिकाऱ्यांची नावे सांगता येतील- अतुलचंद्र कुलकर्णी (आयपीएस-टेंभुर्णी-माढा), अभिजित बांगर (जिल्हाधिकारी पालघर- बार्शी), संदीप भाजीभाकरे (आयपीएस- उपळाई, माढा), रोहिणी भाजीभाकरे (आएएस-केरळ, उपळाई, माढा), अजित जोशी (आयएएस-हरियाणा, वीट-करमाळा), अरुण उन्हाळे (आयएएस-महाबीज, बार्शी), डी.टी. तथा दत्तात्रय शिंदे (जिल्हा पोलीस प्रमुख-सिंधुदुर्ग, चिंचोली-बार्शी) याशिवाय विपुल वाघमारे, शिवप्रसाद नखाते, अभिजीत गुरव, अभयसिंह मोहिते, सागर गवसाने, संजय जाधव (ढेकळे), प्रशांत पाटील, वैशाली शिंदे ही काही नावे घेता येतील. अशा नामावलीमुळेच स्पर्धा परीक्षेविषयी जागरुकता निर्माण झाली.- राजा माने
स्पर्धा परीक्षा संमेलनाचा जनक
By admin | Updated: February 5, 2016 03:25 IST