माया मरी ना मन मरा, मर मर गये शरीरआशा त्रिरणा ना मरी, कह गये दास कबीरमाणसाचा मोह मेला नाही. माया मेली नाही आणि मनही. शरीर मरून जातं, पण जाईपर्यंत आशा, तृष्णा संपत नाही. मन मारून एखादी गोष्ट करणं म्हणजे काय तर मनातले विकार, भावना, लोभ, मोह, मद, मत्सर जाऊन तिथे असीम अथांगता निर्मळता प्रकट करणं हे महत्त्वाचं. आपलं पूर्ण आयुष्य हे मनोविकार सांभाळण्यात आणि जोपासण्यात, जोजविण्यात जाते. मन क्षुद्र जड वस्तूत अडकून पडतं. त्यातून मुक्ती नाही.माझा कोकणमधला एक मित्र म्हणाला, आमच्याकडे श्रीमंती दोन गोष्टींनी मोजतात. एक आंबे म्हणजे हापूस आंब्याची झाडं किती, आणि दुसरं म्हणजे कोर्ट केसेस किती? मी अचंबित झालो. तुझ्या आंब्याची एक फांदी माझ्या बांधाच्या आत आली, माझा आंबा तुझ्या अंगणात पडला इथपासून तुझ्यामुळे माझा वारा पाऊस अडतो म्हणणारे आहेत. मग आपण गुंततो कशात? माणसात, शरीरात की मनात? हे मन ऐहिक गोष्टीत फार पटकन गुंततं, गुंतून पडतं पण त्यातून पटकन बाहेर पडत नाही. म्हणून कबीर म्हणतो,चाह गयी चिंता मिटी, मनवा बेपरवाहजिनको कछु ना चाहिए, वो ही शहेनशाह!हे चाह जाणं आणि चिंता मिटणं महत्त्वाचं. त्याकरिता मनवा बेपरवाह हवं. म्हणजे बेछूट नाही तर अशा लौकिक गोष्टींची चिंता त्याने करू नये. कारण हे शाश्वत नाही म्हणून त्याबाबत बेपर्वा हवं आणि असं मन बेफिकीर झालं की माणूस शहेनशाह होतो. पण शहेनशाह होणं म्हणजे इच्छाहीन होणं, त्यांच्या पार जाणं. मला काहीही नको म्हणायला धैर्य लागतंं. नाही तर आपल्याकडे बहुतेक सगळे ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून येईल घरा’ अशा प्रवृत्तीचेच असतात. पूर्वी काशीला जाणारा माणूस आपलं तर्पण करूनच जायचा. परत येण्याची शाश्वती नाही. आला तर पुण्यकर्म. इतकी विरक्ती अंगी येण्याला साधूच बनण्याची गरज नाही.साधुत्व ही वृत्ती आहे. साधू होणं म्हणजे सर्वसंगपरित्याग करणं. पण हे करायचं कसं? तर केवळ भगवी वस्त्र परिधान करून नाही, तर मन भगवं करणं. म्हणजे वासनाहीन होणं. पदाचा, पैशाचा, सत्तेचा कुठलाच लोभ न ठेवणं, त्यापासून पूर्ण निरासक्त होणं म्हणजे साधू होणं. अशा साधूला मठ, संस्था, अखाडा नसतो. कुंभमेळ्यात कुणी प्रथम स्नान करायचे यावरून दंगा करणारे साधू हे संधिसाधू होत. त्यांनी कशापासूनच विरक्ती घेतलेली नाही. म्हणायला संसार नाही, बायकोपोरं नाहीत पण वांच्छा तर इतकी आहे की संसारी माणूस परवडला. अशा व्यक्ती कशा होतील शहेनशाह? त्याला सडा फटिंग कबीर हवा. कबीरा खडा बाजारमें लिये लुकाठी हाथजो घर फूंके अपना चले हमारे साथ!कबीर बोलवतोय खरा, पण घर फुंकण्याचं धाडस आहे आपल्यात? कबीर बाजारात उभा आहे, आपली वाट पाहात !-किशोर पाठक
मनवा बेपरवाह
By admin | Updated: August 1, 2016 05:17 IST