गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाढत्या असहिष्णु वृत्तीच्या विरोधात आक्रोश होत असताना रविवारी बंगळुरु शहरात जे काही घडले त्यामुळे देशातील असहिष्णुतादेखील लज्जित झाली असेल, असे या प्रकरणी जे काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे त्यावरुन म्हणता येते. टांझानिया येथून शिक्षणासाठी आलेल्या एका एकवीस वर्षीय कन्येवर त्या सुसंस्कृत शहरात काही अज्ञातांनी अत्त्याचार केला व ती ज्या मोटारीत बसून प्रवास करीत होती ती मोटारदेखील जाळून टाकली. तिने नेमका कोणता गुन्हा केला होता? गुन्हा तिचा स्वत:चा असा कोणताच नव्हता. त्याच दिवशी सकाळच्या वेळी वैद्यकीय शिक्षणासाठी याच शहरात आलेल्या सुदानमधील एका विद्यार्थ्याच्या मोटारीखाली सबीन ताज ही स्थानिक मध्यमवयीन महिला ठार झाली तर तिचा पती जखमी झाला. त्याच रात्री तो सुदानी विद्यार्थी मोहम्मद अहाद आणि वरील युवती वेगवेगळ्या मोटारींमधून शहराच्या उत्तरेकडील गणपतीनगर परिसरातून जात असताना एका जमावाने त्यांना हटकले आणि दोन्ही मोटारी जाळून टाकल्या. या घटनेची रीतसर फिर्याद त्या युवतीने पोलिसांकडे नोंदविली. पण त्यानंतर मात्र तिने त्याच शहरातील आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या संघटनेकडेही एक तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार जमावाने तिची मोटार अडवल्यानंतर तिला मोटारीतून बाहेर काढले, विवस्त्र केले आणि तिला भर रस्त्यातून चालायला लावले. विद्यार्थी संघटनेचा कायदेशीर सल्लागार बॉस्को कावेसी याने नंतर माध्यमांशी बोलताना अधिकच गंभीर प्रकार कथन केला. त्याच्या कथनानुसार लज्जित झालेल्या त्या युवतीने शहर बसचा आश्रय घेण्याचा आणि रिक्षात बसण्याचा प्रयत्न केला तर त्यांनीही तिला तसे करण्यास मज्जाव केला. ज्या दोन विद्यार्थ्यांचा या घटनेशी संबंध आहे ते परदेशी असल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घटनेची तत्काळ दखल घेऊन संबंधित देशांशी संपर्क साधला व झाल्या प्रकाराची समग्र चौकशी करण्याचे आश्वासन दिले. एकप्रकारे त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासारखा जो काही प्रकार घडला तो गंभीर आहे यात वाद नाही. तथापि आपल्याला विवस्त्र करुन भर रस्त्यावर आपली धिंड काढल्याचा जो आरोप सदर युवतीने केला तो मात्र काहीसा शंकास्पद वाटतो. कारण तिने प्रारंभी पोलिसात जी तक्रार दाखल केली तिच्यात असा कोणताही उल्लेख नव्हता. तो उल्लेख आधी आफ्रिकन विद्यार्थी संघटनेने आणि नंतर संघटनेच्या कायदेशीर सल्लागाराने केला. याचा अर्थ ती पश्चातबुद्धीही असू शकते. कर्नाटकाचे एक मंत्री जी.परमेश्वर यांनी सदर युवतीने पोलिसांकडे अगदी सुरुवातीला जी फिर्याद दाखल केली, तिचाच हवाला देऊन तिला विवस्त्र केले गेले वगैरे तपशील अप्रत्यक्षरीत्या नाकारला आहे. पण म्हणून एकूणच जे काही घडले त्याचे गांभीर्य कमी होते असे नाही. उलट यात परदेशी विद्यार्थ्यांचा संबंध असल्याने ते अधिकच वाढते.