शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

स्वतंत्रता दिवस : तीन प्रश्न आणि त्यांची उत्तरे

By admin | Updated: August 13, 2015 21:57 IST

आपल्या देशाचा ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना तीन प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. पहिला- स्वातंत्र्य कुणी मिळवून दिले? दुसरा-फाळणी अटळ होती का? तिसरा-स्वातंत्र्यानंतर आपली कामगिरी कशी होती

आपल्या देशाचा ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना तीन प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. पहिला- स्वातंत्र्य कुणी मिळवून दिले? दुसरा-फाळणी अटळ होती का? तिसरा-स्वातंत्र्यानंतर आपली कामगिरी कशी होती? काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व पं. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी या दोघांनीच केले. बाकीच्यांचा जाता जाता उल्लेख करण्यात येतो किंवा त्यांची कामगिरी पूर्णत: दडपून टाकण्यात येते. म. गांधीजींनी वेळोवेळी केलेले अन्न सत्याग्रह आणि स्वातंत्र्य लढ्याचे केलेले नेतृत्वच स्वातंत्र्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोचविण्यात यशस्वी झाले असेही म्हटले जाते. पण देशाच्या राजकीय वातावरणात महात्मा गांधी व पं. नेहरू यांचा प्रवेश होण्यापूर्वी १९१४-१५ या काळात देशात क्रांतिकारकांचे लहान सहान गट कार्यरत होते आणि ते ब्रिटिश साम्राज्यशाहीला काट्याप्रमाणे बोचत होते. ज्यामुळे ब्रिटिश सत्तेला भारत सोडून जावे लागले. क्रांतिकारकांची धाडसी कृत्ये भारतीय समाजमनाला निश्चित प्रेरक ठरली होती.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिक युद्धकैद्यांना एकत्र करून आय.एन.ए. (इंडियन नॅशनल आर्मी)ची स्थापना केली. या सैन्याचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केल्यामुळेच ते ‘नेताजी’ सुभाषचंद्र बोस म्हणून ओळखले गेले. त्यामुळे ब्रिटिशांच्या सत्तेला निश्चितच हादरे बसले होते. ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ असलेल्या लोकांसह भारताची सत्ता सांभाळणे अशक्य आहे हे ब्रिटिशांच्या ध्यानात आले. मुंबईत १९४६ ला झालेल्या नौदलाच्या बंडामुळे ब्रिटिशांना भारतात असुरक्षित वाटू लागले.भारत स्वतंत्र झाला पण देशाची फाळणी करावी लागली. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत २० लाख निरपराध नागरिकांना मारण्यात आले आणि एक कोटी लोकाना स्वत:चे घर सोडावे लागले. फाळणीचे हे संकट पं. जवाहरलाल नेहरू व महंमद अली जिना यांच्यातील अहंभावातून ओढवले होते का? या दोघांना काँग्रेसने निराश केले होते का? की भारताची फाळणी ही ब्रिटिशांच्या कटकारस्थानातून आकारास आली होती? निश्चितच, ब्रिटिशांनी जाता जाता ही घाणेरडी राजनीती खेळली. १८५७ चा उठाव दडपून टाकल्यानंतर इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ हीच नीती अवलंबिली होती. भारतातील हिंदू-मुस्लिम, हिंदू-शीख, अन्य जातीय समीकरणे, आर्य आणि अनार्य हे भेद, उत्तर-दक्षिण वाद, संस्थानिक विरुद्ध प्रजा हे वाद इंग्रजांनी वापरून घेतले. त्यात त्यांना यशही मिळाले. इंग्रजांचा हा डाव केवळ महात्मा गांधींनाच ओळखता आला. त्यांनीच त्याविरुद्ध कणखरपणे लढा दिला. या सर्व वादांपैकी हिंदू-मुस्लिम वाद हा ७०० वर्षांइतका जुना होता. इस्लामने या देशावर आक्रमण तर केलेच पण अनेक वर्षे या देशावर सत्ताही गाजवली. मोगलांचे आक्रमण हे रक्तरंजितच होते. त्यानंतर मात्र इंग्रजी सत्तेने पाहता पाहता सारा देश व्यापून टाकला.जनरल जेरार्ड लेक यांच्या अधिपत्याखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने १८०३ साली दिल्लीच्या बाहेर नोयडा येथे झालेल्या लढाईत मराठ्यांच्या फौजेचा पराभव केला. १८५७ चे बंड इंग्रजांनी मोडून काढले. त्यानंतर त्यांनी मोगलांच्या पराभवाबद्दल मुस्लिमांच्या अहंकाराला डिवचणे सुरू करुन हिंदूंकडून मुस्लिम समाज कसा असुरक्षित झाला आहे हे मुस्लिम समाजाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. इस्लामी तत्त्वांना त्यांनी प्रोत्साहन दिले व त्यातूनच द्विराष्ट्राचे तत्त्वज्ञान मुस्लिम समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी १६ मार्च १८८८ रोजी मीरत येथे दिलेल्या व्याख्यानात त्याचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. त्यातील काही उतारे येथे देत आहे. ‘या देशात हिंदू आणि मुस्लिम हे एकाच सिंहासनावर बसून सत्तेचा समान उपभोग घेऊ शकतील का? नक्कीच नाही. तो उपभोग घेण्यासाठी एकाने दुसऱ्यावर विजय संपादन करायला हवा. दोघांनी समान भूमिका स्वीकारणे हे केवळ अशक्य आहे. एकाने दुसऱ्यावर आक्रमण करून विजय संपादन केल्याशिवाय कुणालाही एकहाती सत्ता उपभोगता येणार नाही’.सर सय्यद यांच्या कल्पनेतूनच अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची निर्मिती झाली आणि त्यातूनच पाकिस्तानच्या कल्पनेचा जन्म झाला. सर सय्यद यांचे विचार मुस्लिम राजकारणाला वळण देते झाले. त्यातूनच मुस्लिम समाजाला आजपर्यंत प्रेरणा मिळत गेली. या विषारी प्रचारापासून मुस्लिमांना दूर करण्यासाठी महात्मा गांधींनी लवचिक धोरण स्वीकारले. त्यांनी १९२० साली खिलाफत चळवळीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले. त्यातूनच महंमद अली जिना हे भारतीय मुस्लिमांचा आवाज म्हणून जन्माला आले. हा असा नेता होता ज्याला कुणीही अनुयायी नव्हते. पण त्यांनी देशाची फाळणी करण्याची भाषा पहिल्यांदा केली. हिंदूंच्या विरोधाचे बीज त्यांनी मुस्लिमांच्या मनात रूजविले. फाळणीचा विचार मुस्लिम समाजाच्या मनात पक्केपणी रुजविण्यात त्यांना यश मिळाले. ब्रिटिशांनी त्याचा वापर करून घेतला. कम्युनिस्टांनी त्यासाठी आवश्यक ते विचार मुस्लिम समाजाला पुरविले. त्यातूनच त्यांना वेगळ्या राष्ट्राची मागणी करण्यासाठी योग्य विचार पुरविले. यावेळी जिना यांनी वेगळ्या पाकिस्तानची कल्पना सोडून दिली असती तर मुस्लिम समाजाने ती मागणी करण्यासाठी वेगळ्या जिनांचा शोध घेतला असता!अशा परिस्थितीत भारताची फाळणी टाळणे शक्य होते का? शक्य होते. पण त्यासाठी त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाला यादवी युद्धासाठी सिद्ध व्हावे लागले असते. त्या स्थितीत मानवी जीविताला कमी प्रमाणात हानी होण्याची शक्यता होती. फाळणीमुळे मात्र अपरंपार जीवित हानी सोसावी लागली आहे.स्वातंत्र्यानंतर आपण स्वत:साठी चांगली कामगिरी बजावू शकलो. अर्थात याहूनही चांगले करता आले असते, तरीही आपली लोकशाही, जगातील स्थिर लोकशाहीपैकी एक आहे. कोणाही नागरिकाला विचारा की त्याची कोणत्याही शेजारी राष्ट्रात राहण्याची तयारी आहे का? त्याचे उत्तर नकारार्थीच मिळेल. तेव्हा ज्याविषयी अभिमान बाळगावा आणि ज्याचा आनंद साजरा करावा असे बरेच काही आपण साध्य केलेले असले तरीही त्यात सुधारणा करायला वावही आहे, हेही तितकेच खरे आहे.