- आनंद भाटेसंगीत व कला मग ते कोणतेही क्षेत्र असो, संगीतात रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रियाजाशिवाय संगीतामध्ये परिपूर्णता येत नाही. संगीताच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याची साधना म्हणजे रियाज. जेव्हा एखादा गायक व गायिका गायनाला सुरुवात करतात, तेव्हा रियाज हा महत्त्वपूर्ण घटक असतो. जस जसे गायक/गायिका शिकत जातात, परिपक्व होत जातात, तेव्हा ज्या प्रकारचा रियाज आवश्यक असतो, त्यातून गाणे विकसित होत जाते, त्याला अधिक प्रगल्भता येते. त्यामुळे रियाज सतत करत राहावा लागतो. सांगीतिक करिअरमध्ये रियाज खूप महत्त्वपूर्ण आहे. सुरुवातीला रियाजांमध्ये आवाजाची तयारी ही आवश्यक गोष्ट असते. यात सुरांची स्थिरता, आवाजाला भरीवपणा, माधुर्य आवश्यक आहे, यासाठी गळ्यावर मेहनत घेणे सुरू होते. यासाठी विशिष्ट प्रकारचा रियाज करावा लागतो. विशेषत: गायनाच्या रियाजात ओंकार साधनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. आकाराचा आणि ओंकाराचा रियाज हा प्रत्येकाला करावाच लागतो. जेव्हा आकारात रियाज करतो, तेव्हा तो शुद्ध येणे गरजेचे आहे. त्यात कर्कशपणा येऊ नये. खुला आकार आला पाहिजे. ओंकाराच्या रियाजात आवाजाची संपूर्ण सीस्टिम म्हणजे व्हॉइस प्रॉडक्शन आवश्यक ठरते. यात फुप्फुसापासून ते स्वरयंत्र व मेंदूपर्यंत ज्या अंतर्गत पोकळ्या आहेत, त्यांचे मिळून आवाजाचे प्रॉडक्शन तयार होत असते. आपल्याला वाटते की, आवाजासाठी फक्त गळा आवश्यक असतो, तो महत्त्वाचा आहेच, पण ही सर्व यंत्रणाही महत्त्वाची आहे. प्रामुख्याने श्वसनयंत्रणेवर अधिक भर द्यावा, तसेच या सगळ्या यंत्रणेच्या दृष्टीने ओंकाराला अधिक महत्त्व आहे. तो एक प्राणायामाचा प्रकार आहे. प्राणायामाचा आवाजालाही छान उपयोग होतो. पुरुषांच्या बाबतीत खर्ज्याचा रियाज सांगितला गेला आहे. आवाजाचा बेस तयार होण्यासाठी तो फायदेशीर ठरतो. त्याचेही एक तंत्र आहे, तो पहाटे किंवा उठल्या उठल्या केला, तर त्याचा फायदा अधिक होतो. हे थोडे-फार व्यायामासारखेच आहे. खर्ज्याचा रियाजाही हळुवार करावा लागतो. घसा खरवडून ताण देत रियाज केला, तर त्याचा त्रास होतो. जसजसा आवाज खाली जात जाईल, तसातसा कलाने करावा लागतो. रियाजातील हे सुरुवातीचे प्र्रकार मानले जातात. पण ओंकारातला रियाज अखंडपणे करावा. प्रारंभीला पलट्यांचाही रियाजही सांगितला जातो. ज्यात आवाज, तानेची तयारी, लवचिकता वाढविण्यासाठी शुद्ध स्वरांचे पलटे, अलंकार यातून गळा तयार केला जातो. गळ्यावर नियंत्रण मिळविणे, यासाठी या गोष्टी आवश्यक ठरतात. जसजशी आवाजाची तयारी होत जाते, तसा फोकस बदलला जातो. नवीन-नवीन राग गळ्यावर चढले पाहिजेत. म्हणून तो परत परत घोटणे, त्यातील आलापी असे प्रकार असतील, तर त्याची तयारी सुरू केली जाते. ते चांगल्या पद्धतीचे गाता आले पाहिजेत, असे रियाजाचे काहीसे प्रकार बदलत जातात. रियाज किती करावा? असा प्रश्नदेखील विचारला जातो, ते किती आवश्यक आहे, पण हे थोडे व्यक्तिसापेक्ष आहे. आवाजाचा प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा असतो. त्यामुळे एकाला कदाचित चार तास करून फायदा होऊ शकतो, तर दुसरा रियाज करून दमू शकतो. त्याने स्वत:च्या आवाजाचा गुणधर्म ओळखून रियाज करण्याची आवश्यकता आहे. अजून एक हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आवाजाची पट्टी कशी ठरवायची? याचे एकच उत्तर असे स्पेसिफिक सांगता येत नाही. प्रत्येकाने आवाजाकडे पाहून आपली पोत ठरवावी, आवाजाचा स्ट्रेथ कमी-जास्त कुठे होतो, ते ठरवून ओळखण्याची गरज आहे की, थोडीशी ट्रायल अँड एरर असते. ते पाहून पट्टी ठरवावी लागते. तेच रियाजाबाबत असते. ज्यांना शास्त्रीय संगीतात जायचेय, हे पक्के आहे, त्यांना रियाज करावाच लागतो. हल्ली बाकीची व्यवधान वाढल्यामुळे शिक्षण सांभाळून त्यांना रियाजासाठी वेळ द्यावा लागतो, पण रियाज ते सोडू शकत नाहीत. संगीतात रियाजाशिवाय पर्याय नाही, हेच खरे ! (लेखक प्रसिद्ध गायक आहेत.)रियाज कसा करावा, यावर पंडित भीमसेन जोशी यांनी खूप चांगले सांगितले होते. रियाज म्हणजे काय, तर ज्याच्यात आपल्याला प्रगती करायची आहे, त्यावर भर देणे व त्याचा जास्तीत जास्त सराव करीत राहणे हा रियाज. जे येते तेच परत परत गात राहिलो, तर नुसता रियाजासाठी रियाज होईल, पण त्याचा फायदा झाला पाहिजे तो होणार नाही, पण जे येत नाही, त्याचा सराव झाला, तर गाण्यात नक्कीच प्रगती होत राहील.
रियाजाचे महत्त्व
By admin | Updated: August 21, 2016 02:55 IST