ज्ञानसाधू वा. गो. चोरघडे
रामरायाचे परमभक्त तुलसीदास यांच्याकडे अनेकजण आपली सांसारिक दु:खे घेऊन दर्शनाला येत असत. ती दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत, आपल्या व्यथांवर उपाय विचारीत. उतारवयात तुलसीदासांना स्वत:च दोन्ही हाताची असह्य पीडा सुरू झाली. हातांवर फोड उठले. असह्य वेदनांनी सारे शरीर ठणकू लागले. सर्व तऱ्हेच्या औषधींचे उपचार निष्फळ ठरले. ते थोर रामभक्त म्हणून आपल्या व्याधींवर काहीतरी उपाय सांगतील अशी लोकांची भावना होती. इकडे मात्र स्वत:चे दु:ख त्यांना असह्य ठरले होते.अशा स्थितीत रामरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या तुलसीदासांची दृष्टी हनुमंताच्या मूर्तीवर खिळली. मनात विचार आले की, पहिले रामभक्त तर हनुमंतच आहे आणि त्यांचे बाहू तर असे बलदंड आहेत. एका हातात पर्वत तर दुसऱ्या हातात गदा. रामभक्ताचे बाहू जर असे कणखर असतील तर याचा अर्थ एकच. आपल्या रामभक्तीतच काही त्रुटी असली पाहिजे. म्हणून त्यांनी हनुमंताची स्तुती आरंभली. एकूण ४४ गेय पद्यात ही स्तुती आली आहे. त्यालाच हनुमान बाहुक म्हणतात. एक सिद्ध कवच म्हणून ही पद्ये भक्तिभावाने गायिली जातात.त्यातील हनुमंताचे ध्यानही मनोरम आहे. उदयकालीन सूर्याचा वर्ण असलेले हनुमंताचे पर्वतप्राय शरीर आहे. त्यांच्यासारखा बुद्धिमान आणि युद्धकुशल दुसरा कोणीही नाही. त्यांनी ज्याला स्थैर्य दिले त्याला भगवान शंकरसुद्धा अस्थिर करू शकत नाही आणि हनुमंतांनी नष्ट केले त्याला कोणीही वाचवू शकले नाही. एखादा कंडुक उचलावा त्याप्रमाणे द्रोणागिरी उचलला आणि काही क्षणात लंकेत आणून ठेवला.रचना कार्यात ब्रह्मा, पालनात विष्णू, संहारात रुद्र, जीवनदान देण्यात साक्षात अमृत, सुकविण्यात अग्नी आणि पोषणात चंद्र असे आपले स्वरूप असताना आपला भक्त म्हणविणाऱ्या मला का बरे वेदनांचा सामना करावा लागतो! आपल्या स्मरणाने सारी संकटे कोळीष्टकांप्रमाणे दूर होतात. आपल्या एका प्रहाराने लंकेची रक्षण करणारी राक्षसीण गतप्राण झाली. मग ही व्याधीरूपी राक्षसी मला कां छळते आहे? प्रत्येकालाच कर्मफळ भोगावे लागते. प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते हे सगळे जरी खरे असले तरी आपल्याला अशक्य असलेली एखादी तरी गोष्ट आहे काय? देवांनादेखील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने सिद्ध केल्या. तेव्हा या विद्यमान व्याधीतून मला मुक्त करा अशी हनुमान बाहुक ही आर्त प्रार्थना आहे. या स्तुतींनी तुलसीदासांची व्यथा निघून गेली.