मराठवाड्यातील अभूतपूर्व पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत. त्यात लातूरच्या तीव्र पाणी टंचाईचा समावेश आहे. मिरज ते कुर्डूवाडी मार्गे लातूर हा जुना रेल्वेमार्ग त्यासाठी धावून आला. याची सर्वप्रथम कल्पना मिरजेचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मकरंद देशपांडे यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांपासून रेल्वेमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करून या जुन्या रेल्वेमार्गाचा वापर पाणी वाहण्यासाठी करता येऊ शकतो हे स्पष्ट केले. अलीकडच्या वर्षात हा मार्ग ब्रॉडगेज झाला आहे. मिरज हे कृष्णा नदीजवळचे सर्वांत मोठे जंक्शन आहे. येथून पुणे, बंगलोर, लातूर, कोल्हापूर आदी चारही बाजूला रेल्वे धावते. तिची सुरुवात १८८७ मध्ये झाली. आज या रेल्वे जंक्शनवरून दररोज ५७ गाड्यांची ये-जा आहे. या सर्व गाड्यांना पाणी देण्याचे महत्त्वाचे काम मिरज जंक्शनवरच होते. त्यासाठी कृष्णा नदीवरून रेल्वेने खास पाणी योजनाही राबविली आहे.लातूरला मिरजेहून पाणी देण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी प्रत्येकी ५० हजार लिटर्स क्षमतेच्या ५० वॅगन्स आल्या. त्याद्वारे एका वेळेस २५ लाख लिटर्स पाणी वाहून नेण्याची सोय झाली. मात्र रेल्वेची पाणी योजना दररोज इतक्या क्षमतेने पाणीपुरवठा करण्याइतकी सक्षम नव्हती, त्यामुळे रेल्वेस्थानकापासून अडीच किलोमीटरवर असलेल्या कृष्णा नदीतून स्वतंत्र नवी नळयोजना राबविण्याचे ठरले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने एकत्र येऊन काम करायचे होते. इतकी मोठी नळयोजना, त्यासाठी विजेची गरज, नदीत पाण्याची उपलब्धता आणि आणलेले पाणी साठविण्याची सोय आदी व्यवस्था करायची होती. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सर्वच शासकीय कार्यालयांना एकत्र करून रेल्वे प्रशासनाची मदत घेत केवळ एका सप्ताहात ही संपूर्ण योजना राबविली. यासाठी सात दिवसात तीन पाळ््यात कामगार आणि अधिकारी वर्गाने काम केले. शेखर गायकवाड यांनी तर ध्यास घेऊन वर्षाचे काम केवळ सात दिवसात पूर्ण केले. त्यासाठी दररोज दोन-तीन वेळा ते स्वत: कामाच्या ठिकाणी भेट देत होते. प्रत्यक्षात काम चालू आहे, त्या जागेवर जाऊ न उभे राहत होते. सर्व शासकीय यंत्रणा हाती घेऊन शेखर गायकवाड यांनी या नळयोजनेसाठी जणू युद्धच पुकारले होते.दरम्यान, जुन्या पाणी योजनेवर दररोज दहा वॅगन्सची किमान एक रेल्वे सोडण्यात येत होती. नवी नळयोजना पूर्ण होताच गेल्या मंगळवारी पूर्ण क्षमतेने ५० वॅगन्सची २५ लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे लातूरकडे धावू लागली आणि जिल्हाधिकारी गायकवाड यांनी एक युद्ध जिंकले. याचवेळी त्यांनी एका ऐतिहासिक विहिरीचे पुनर्जीवन केले. सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा रेल्वे मिरजेत आली तेव्हा स्थानकाला लागूनच असलेल्या हैदरखान विहिरीच्या पाण्याचा वापर रेल्वे करू लागली. ही ३३ लाख लिटर क्षमतेची ३५०० चौरस फूट असलेली विहीर १५८३ मध्ये आदिलशहाचा सरदार हैदरखान याने शेतीच्या पाण्यासाठी काढली. ४३३ वर्षांच्या वयाच्या या बांधीव विहिरीचे काम आजही मजबूत आहे. नव्या योजनेतून आणलेले पाणी याच विहिरीत साठविण्यात येत आहे. तेथून रेल्वे वॅगन्समध्ये भरले जात आहे. शंभराहून अधिक वर्षे रेल्वेच्या प्रवाशांसाठी याच विहिरीचे पाणी दिले जायचे. प्रशासनाने युद्धपातळीवर केलेल्या कामामुळे मिरज परिसराच्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला. कृष्णा नदीच्या पाण्याने मराठवाड्यातील लातूरकरांची तृष्णा भागविली तर जाईलच, पण निर्धार पक्का असेल तर उत्तम काम करता येऊ शकते, याची ही प्रचिती आहे. तसेच संकटाची वाट न पाहता अशाच पद्धतीने प्रशासनाने काम केले आणि लोकांनी सहभाग वाढविला तर सर्व संकटांवर मात करता येईल. यासाठी शेखर गायकवाड आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन!- वसंत भोसले
लातूरकरांसाठी गायकवाडांचे युद्ध
By admin | Updated: April 22, 2016 02:41 IST