अजिंठा-वेरूळमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील नसल्याने येथील परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होत आहे. अनास्था हीच याच्या मुळाशी आहे. वेरूळ महोत्सवाची नुसती घोषणा पुरेशी नाही, त्याला सरकारचे पाठबळ हवे. औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी आहे, हे कागदोपत्रीच दिसते. कारण तीन वर्षांच्या खंडानंतर परवा ‘वेरूळ महोत्सव’ची घोषणा झाली. तीन वर्षे महोत्सव झाला नाही याचे कारण दुष्काळ होते. या वर्षी पाऊस-पाणी बरे आहे म्हटल्यानंतर प्रशासनही जागे झाले आणि अमिताभ बच्चन, अदनान सामी, अजय-अतुल यांची वेरूळ महोत्सवात हजेरी लागणार अशी घोषणा झाली. परंतु या वेरूळ महोत्सवाला सरकार पैशाचे पाठबळ देत नाही. वेरूळ लेण्यांच्या काव्य-शिल्पांच्या पार्श्वभूमीवर उमटणारे सूर, पदन्यास हे दृश्यच मंत्रमुग्ध करणारे असते. पण खजुराहोप्रमाणे वेरूळ महोत्सवाची देशभर ओळख अद्याप निर्माण करता आलेली नाही. रसिक लोक खजुराहो, कोणार्क महोत्सवाची आतुरतेने वाट पाहातात. दिग्गज कलाकार तिथे हजेरी लावण्यासाठी उत्सुक असतात. ते भाग्य जगातील महान कलाकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरूळला अजून प्राप्त झालेले नाही. परवा बिमल रॉय यांच्या चित्रपटांचा महोत्सव औरंगाबादेत झाला. त्यासाठी त्यांच्या कन्या रिंकी रॉय चौधरी मुद्दाम आल्या होत्या. वेळ काढून त्या वेरूळ लेणी पाहायला गेल्या. पण जगप्रसिद्ध स्थळाला भेट दिल्यानंतर जो ‘फील’ येतो तो वेरूळमध्ये येत नाही, कारण या लेण्यांची नीट देखभालच होत नाही हे सांगताना आपल्याकडे मन लावून काम करण्याची वृत्ती दिसत नाही, असेही त्या म्हणाल्या. ‘वर्क कल्चर’ या गोष्टीचा आपल्याकडे मुळात अभावच आहे. पर्यटनस्थळांना ही गोष्ट लागू होते. मराठवाड्याचाच विचार केला, तर वेरूळ-अजिंठा-औरंगाबादसह ११ लेण्या आहेत; पण उरलेल्या ८/१० लेण्यांचे संवर्धन -संरक्षण काय हा प्रश्नच आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व विभागात त्यांचे विभाजन झालेले. त्यामुळे पितळखोरा, घटोत्कच वगळता इतर लेण्या तर पर्यटनस्थळांच्या यादीत नाहीत. हीच गोष्ट किल्ल्यांची. विभागात १५ किल्ले. यात देवगिरी, वेताळवाडी, अंतूर, जंजाळा सारे गड किल्ले, तसेच उदगीर, परंड्यासारखे भुईकोट किल्ले. त्यांच्या संवर्धनाविषयी ना सरकारमध्ये ना जनतेत जागृती. पूर्वजांचा हा ठेवा खूप मोठा आहे; पण आजच्या काळात त्याचे ‘मार्केटींग’ कोणालाही करता आले नाही.औरंगाबाद पर्यटन राजधानी असल्याने येथे सांस्कृतिक घडामोडींना उत्तेजन देण्यासाठी सरकार पाठबळ देत नाही. या शहरात कलासागर, सरस्वती भुवन, लायन्स, रोटरी, महागामी अशा संस्था आपापल्या परीने उपक्रम घेतात. अंबडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ‘अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सव’ होतो; पण त्याचे महत्त्व जालन्याबाहेर नाही.‘महागामी’ ही संस्था देश पातळीवरील नृत्य महोत्सव नेमाने घेते. आता या महोत्सवाची ओळख निर्माण होत आहे. सरस्वती भुवनसारखी शिक्षण संस्था चित्रपट महोत्सव, शास्त्रीय संगीत महोत्सव घेते. या संस्थांच्या उपक्रमांनी शहराचे, प्रदेशाचे वातावरण निकोप राहतेच, शिवाय सृजनाचे वातावरण तयार होते.सांस्कृतिक खात्याने पर्यटन राजधानीत ‘कलाग्राम’ उभे केले. या ठिकाणी वेगवेगळ्या कलांना व्यासपीठ मिळावे, हे अपेक्षित होते; पण इमारत बांधून कलागुणांचा विकास होत नाही. कलावंतांना प्रोत्साहन मिळत नाही. आज कलाग्रामची वास्तू ओस पडून आहे. कागदोपत्री नोंद करण्यासाठी वर्षातून थातुरमातुर एखादा उपक्रम होतो. अजिंठा-वेरूळमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील नसल्याने येथील परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट होत आहे. अनास्था हीच याच्या मुळाशी आहे. वेरूळ महोत्सवाची नुसती घोषणा पुरेशी नाही, त्याला सरकारचे पाठबळ मिळाले तरच त्याची ओळख निर्माण होईल; नाही तरी महाराष्ट्रात गावोगावी महोत्सव होतात तसाच हाही एक उत्सव ठरू नये.- सुधीर महाजन
महोत्सवाचा उत्सव
By admin | Updated: August 3, 2016 05:03 IST