‘तुमचं काम चित्रपटांना प्रमाणित करण्याचं आहे, सेन्सॉर करण्याचं नाही’, अशा अत्यंत नि:संदिग्ध शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सप्ताहात केन्द्रीय चित्रपट प्रमाण मंडळाला खडसावले तेव्हांच ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार हे दिसून आले होेते. तसा तो आता झाला आहे. न्यायालयाने चित्रपटातील केवळ एका प्रसंगाला कातरी लावली असून दोन दिवसात हा चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणित करा असा आदेशही मंडळाला दिला आहे. संपूर्ण पंजाब राज्य आज अंमली पदार्थाच्या घातक विळख्यात अडकले असून या भयाण वास्तवाचेच यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आल्याचे सांगितले जाते. तथापि अनुराग कश्यप या संवेदनशील निर्माता-दिग्दर्शकाचा हा चित्रपट पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाच्या कचाट्यात सापडला आणि प्रदर्शनापूर्वीच ‘उडता पंजाब’ला मन:पूत प्रसिद्धी मिळून गेली. निहलानी यांनी चित्रपटाच्या शीर्षकापासून आक्षेप घेतले व चित्रपटातील असंख्य दृष्यांना कातरी लावण्याचे तर काही शब्दप्रयोग गाळून टाकण्याचे फर्मान काढले. ते इतके अतार्किक होते की निर्मात्यानी निहलानी यांच्या आज्ञेचे पालन केले असते तर प्रेक्षकांना दाखवायला हाती काहीच शिल्लक राहिले नसते. परिणामी निर्मात्याला न्यायालयाचा दरवाजा खटखटविण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. सोमवारी आपला निवाडा जाहीक करताना न्यायालयाने हे स्पष्ट केले की त्याने चित्रपटाच्या पटकथेचा संपूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतरच या चित्रपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचते हा निहलानी आणि त्यांच्या गणगोताचा आक्षेप धुडकावून लावणारा निवाडा जाहीर केला. चित्रपटांच्या निर्मितीसंबंधीच्या सिनेमाटोग्राफ अॅक्टमध्ये ‘सेन्सॉर’ असा शब्दच आलेला नाही असे सांगून न्यायालयाने पुढे म्हटले की, तरीही कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन मंडळाला एखाद्या चित्रपटातील त्यांच्या मते आक्षेपार्ह भाग काढावासा वाटला तर तसा निर्णय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या आधीन राहूनच घेतला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचे आणि एकप्रकारे मंडळाच्या दृष्टीने दिशादर्शक आहे. न्यायालयाच्या सदर निवाड्यामुळे व्यक्तिश: निहलानी यांचा मुखभंग झाला असला तरी न्यायालयाने ओढलेल्या कोरड्याचे वळ निहलानी यांची निवड करणाऱ्यांच्या व पाठराखण करणाऱ्यांच्याही अंगावर उठणारे आहेत. केवळ ‘आपला माणूस’ या एकाच निकषावर भलत्या जागी भलत्या लोकांची योजना केली की सरकारलाही कसे खाली पाहावे लागते हेही यातून दिसून आले. मात्र त्याचा परिणाम दिसेलच याची खात्री देता येत नाही.
अपेक्षित निवाडा
By admin | Updated: June 14, 2016 04:14 IST