‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, राज्यातला शिवसेना-भाजपचा हा खेळ काही अंशी केंद्रातही सुरू आहे. मुंबईत सुरू असलेले पोस्टरवॉर आणि दिल्लीत सुरू असलेले प्राणिप्रेमाचे ‘वॉर’ असेच काहीसे आहे. बिहारमध्ये २०० नीलगायींना गोळ्या घालून मारण्यात आले. आतापर्यंत उद्योजकांच्या भल्यासाठी जंगले साफ होत असताना शांत असलेल्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी अचानक पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर संतापल्या. हे सर्वात मोठे हत्त्याकांड असल्याचा आरोप त्यांनी केला. पिकांचे रक्षण करण्यासाठी राज्यांच्या विनंतीवरून प्राण्यांची कत्तल करण्याची अनुमती देण्यात आली असून, ती विशिष्ट परिसरापुरती आणि कालावधीपुरती मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिले. पश्चिम महाराष्ट्रात डुकरांचा, तळ कोकणात हत्तींचा, सोलापुरात काळविटांचा, चंद्रपुरात डुकरांचा आणि अमरावतीत काळवीट-नीलगायींचा किती त्रास होतो, हे तेथील शेतकरीच जाणोत. या प्राण्यांचे कळप एकदा का शेतात घुसले की, रातोरात शिवार साफ. आधीच दुष्काळ, त्यात प्राण्यांचा हा त्रास. २०१४ साली राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान चारपट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जावडेकरांनी पिकांचे नुकसान करणाऱ्या त्या त्या राज्यांतील प्राण्यांना गोळ्या घालण्याची परवानगी वन विभागाला दिली आहे. त्याची अंमलबजावणी करताना गेल्याच महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात १०० डुकरांचा खातमा करण्यात आला. अलीकडेच बिहारमध्ये २०० नीलगायींना गोळ्या घालण्यात आल्या. प्रश्न प्राणी हवे की माणूस असा नाहीच कारण प्राथमिकता माणसालाच द्यावी लागेल. पण मग अख्खे आयुष्य प्राणिप्रेमावर राजकारण करणाऱ्यांचे काय? त्यांनी खरे तर या प्रश्नावरून मंत्रिपदाचा राजीनामाच द्यायला हवा. मेनका गांधी यांनी ते धैर्य दाखविले नाही. आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारपेक्षा हे सरकार पर्यावरणासाठी अधिक घातक असूनही मेनका गांधी शांत का, हे न उलगडणारे कोडे आहे. नीलगायींच्या निमित्ताने मात्र त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींची साथ कायम राहील, असे त्यांना वाटू शकते. म्हणजे ‘चीत भी मेरी आणि पट भी मेरी’. शेतकऱ्यांसाठी जावडेकरांनी मारल्यासारखे करायचे आणि पर्यावरणप्रेमींसाठी मेनकांनी रडल्यासारखे करायचे. कुठलाच मतदार आपल्यापासून दूर जाता कामा नये यासाठीचा हा खेळ आहे.
बेगडी प्राणिप्रेम!
By admin | Updated: June 14, 2016 04:13 IST