- डॉ. शुभांगी पारकर आपल्या आयुष्यातल्या घटनांना एक अर्थ द्यायचा प्रयत्न आपण नेहमीच करतो. आपण अशा भूमिकेत शिरतो की जिथे आपल्या मनावर एक गिलावा घालतो. चेहऱ्यावर एक मुखवटा घालतो. याच्यामागे दडलेले आपले खरेखुरे अस्तित्व मात्र आपण विसरतो. यामुळे होते काय की इतर लोकांनी आपल्याशी कसे वागावे याचे गणितसुद्धा बदलते. शेवटी आयुष्याच्या प्लॅटफॉर्मवर काय उरते? शेवटी उरते ते जीवनाचे अर्धसत्य.अनेक वेळा आपल्या सभोवती असलेल्या माणसांच्या कॉमेंट्स ऐकताना आपल्याला बरेच प्रश्न पडतात. साधीच वाक्य असतील जसे की खरंच तुझ्या बुद्धीची स्तुती करावी तितकी कमीच! तू किती सुंदर दिसतेस? आपल्या मनात लगेच प्रश्न उद्भवतात की खरंच या व्यक्तीला आपली मनापासून स्तुती करायची आहे का? का आपलं उगाचंच चेष्टा करतो आहे. या व्यक्तीला वाटते तितके आपण खरेच सुंदर आहोत का? अशा प्रकारे झालेले संभाषण तेवढ्या वेळेपुरतीच झालेली प्रक्रिया आहे किंवा ती व्यक्ती जे काही बोलली ते मनापासून खरेही बोलली असेल असे मानायला आपले मन सहजासहजी तयार होत नाही. माणसाचेच मन आहे ते असेच आपले भटकत राहते. पण हे भटकणे मात्र सुरळीत नक्कीच नाही. अनेकदा काही घटनांमुळे आयुष्यातल्या साध्या गोष्टींचा अनुभव आपल्याला तितक्याच साधेपणाने घेता येत नाही. खरंच कुठलीही गुंतागुंत न घडविता साधंसरळ आयुष्य जगणं म्हणजे काय? आपण आयुष्य जसं घडत जातं तसंच अनुभवायला शिकलो तर आनंद घेणं किती सोपं जाईल. ते सहजी अनुभवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर, सारेकाही अमाप आहे पण आनंदाची मात्र वानवा आहे. वानवा का आहे त्याचं कारण शोधता शोधता नकळत आपल्याला शोध लागतो की त्याचे मूळ कारण आपणच आहोत. आपण वस्तुस्थितीकडे पाहतो पण ती वस्तुस्थिती जशी आहे तशी आपल्याला पाहता येत नाही. आपण तिची प्रतिमा पाहतो. असं प्रतिमा बनविणारं मन एखाद्या गोष्टीचं सौंदर्य त्यात थोडीशी कुरुपतेची भेसळ केल्याशिवाय पाहू शकत नाही. कारण एखादी गोष्ट इतकी सुंदर असू शकेल, एखादी व्यक्ती इतक्या चांगल्या मनाची असू शकेल या वास्तवावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. गोष्ट जशी आहे तशी अनुभवली तर आयुष्य किती सहज जगता येईल. दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे, त्याच्या भावना नक्की कशा आहेत, त्यांचे विचार कुठे चालले आहेत, यात सत्य नक्की काय आहे, याची कल्पना तरी असते का, या प्रश्नांमुळे आपण आपल्या आनंदावर विरजण घालतो हे मात्र निश्चित. हातात आलेले क्षण शंकेच्या अनेक विचारांनी निसटून जातात. जेव्हा जाग येते तेव्हा ते क्षण आपल्या अस्तित्वाच्या परिघापलीकडे गेलेले असतात. ते पुन्हा त्या परिघात येतील याची शाश्वती नाही. जीवनात घडणाऱ्या गोष्टीकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीसाठी ती खूप मोठी प्रशंसनीय बाब आहे. गांभीर्य हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक प्रामाणिक आणि सच्चा असा कंगोरा आहे. आपण करत असलेल्या गोष्टीतून कुठेही चूक होणार नाही, त्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण खात्री आहे. केवळ भारावून जाऊन चंचलपणे वा बेपर्वाईने निर्णय घेतला जाणार नाही अशा अनेक गोष्टींची खबरदारी आयुष्य गांभीर्याने घेणारी व्यक्ती घेते. पण बऱ्याच वेळा आपली गंभीर विचारसरणी आपल्याला धड जगूही देत नाही. फक्त आयुष्यात घडणारी एक घटना म्हणून तिच्याकडे पाहिले तर आयुष्य किती हलकेफुलके व साधेसरळ होईल.प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असणार किंवा प्रत्येक घटितानंतर जीवनावर काहीतरी प्रभाव पडणार ही प्रश्नार्थक उत्सुकता माणसाच्या ठायी आहे. पण अनेक कठीण गोष्टी वा अप्राप्य गोष्टी सोडवायच्या प्रयत्नात आपण आपली सुखशांती गमावतो. आपल्याला जे दिसते, आपण जे ऐकू शकतो किंवा जो स्पर्श आपल्याला जाणवतो त्या जाणिवेपलीकडे आपली उत्सुकता पोहोचते तेव्हा बऱ्याच वेळा मन दु:खीकष्टी होते. आपली उत्सुकता जेव्हा ऐहिक जगात असते तेव्हा ठीक आहे. कारण तेव्हा नवे प्रयोग होतात. संशोधन होते. आधुनिक सोयीसुविधा मिळतात. कदाचित वरकरणीच गोष्टींचा अनुभव घेतल्यास माणसाचा बौद्धिक विकास थांबेल; पण समाधानाने जगू न देणारी बौद्धिक क्षमता आपले जीवन कितपत समृद्ध करते हा प्रश्न उरतोच. म्हणून तर मानवी भावविश्वात रमायचे म्हटले तर समोर येणारी अनुभूती आनंदानी अनुभवता यायला हवी.
जीवनाचा आनंद घेताना
By admin | Updated: August 21, 2016 02:57 IST