भारतीय अंतराळवीरांना स्वदेशी बनावटीच्या अवकाशयानातून आणि मायभूमीतूनच अवकाश प्रवासास धाडण्याच्या, भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांच्या मार्गावरील आणखी एक मैलाचा दगड, ‘इस्रो’ने सोमवारी रात्री गाठला. राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर १९८४ मध्ये तत्कालीन सोव्हिएट रशियातून, रशियन अंतराळयानातून अवकाश प्रवासास निघाला, तेव्हापासूनच भारतीयांनी हे स्वप्न उराशी बाळगले होते. सोमवारी रात्री स्वदेशी बनावटीच्या ‘हाय थ्रस्ट क्रायोजेनिक रॉकेट इंजिन’ची ८०० सेकंद यशस्वी चाचणी पार पडल्यामुळे, आता ते स्वप्न आवाक्यात आल्यात जमा आहे. सोमवारी चाचणी घेण्यात आलेले इंजिन, ‘जीएसएलव्ही मार्क-३’ असे नामाभिधान करण्यात आलेल्या उपग्रह प्रक्षेपक वाहनात वापरण्यात येणार आहे. क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाचा वापर उपग्रह प्रक्षेपणासोबतच क्षेपणास्त्रांमध्येही करता येत असल्यामुळे, अमेरिकेने भारताला हे तंत्रज्ञान मिळू देण्यास आडकाठी आणली. त्यामुळे भारतीय संशोधकांना हे तंत्रज्ञान स्वबळावरच विकसित करावे लागले. त्यामध्ये बराच कालापव्यय झाल्यामुळे भारताचा अवकाश कार्यक्रम बराचसा मागे पडला आहे. अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ‘इस्रो’ने ‘पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हिकल’ (पीएसएलव्ही) आणि ‘जिओ-सिंक्रोनस लॉन्च व्हिकल’ (जीएसएलव्ही) हे दोन उपग्रह प्रक्षेपक विकसित केले आहेत. त्यापैकी ‘पीएसएलव्ही’ला अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे, तर ‘जीएसएलव्ही’च्या नशिबी यशापेक्षा अपयशच अधिक आले. ‘पीएसएलव्ही’च्या जवळपास १०० टक्के (३० पैकी २९ यशस्वी उड्डाणे) यशाच्या तुलनेत, ‘जीएसएलव्ही’च्या वाट्याला आतापर्यंत केवळ ३७.५ टक्केच यश आले. ‘जीएसएलव्ही’च्या अपयशांमध्ये सर्वात मोठा वाटा क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाचाच होता. सोमवारच्या यशस्वी चाचणीमुळे आता अपयशाचा हा शिक्का पुसून टाकता येईल. ‘जीएसएलव्ही मार्क-३’ प्रक्षेपकामुळे स्वदेशी वाहनातून अवकाश प्रवासाचे स्वप्न तर पूर्ण होणार आहेच; पण त्यासोबतच अवजड भूस्थिर उपग्रहांच्या प्रक्षेपणांमधील परावलंबित्वही संपुष्टात येणार आहे. शिवाय इतर देशांचे अवजड भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित करून बहुमोल विदेशी चलन कमविण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे, असे यश जागतिक पटलांवर ताठ मानेने वावरण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास प्रदान करीत असते. लागोपाठ शेकडो वर्षांची गुलामगिरी अनुभवलेल्या आपल्या देशासाठी, ती विदेशी चलनापेक्षाही बहुमोल बाब आहे.
स्वप्न आवाक्यात
By admin | Updated: July 23, 2015 23:19 IST