शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

झारीतील शुक्राचार्य हटवा, आॅलिम्पिक पदके मिळतील

By admin | Updated: August 22, 2016 06:10 IST

पूर्वीची कामगिरी पाहता, यंदाच्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी चांगले यश मिळविले याचा आपल्याला आनंद व्हायला हवा

पूर्वीची कामगिरी पाहता, यंदाच्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी चांगले यश मिळविले याचा आपल्याला आनंद व्हायला हवा. यावेळी काहींनी भले पदके मिळविली नसतील, पण त्यांचा खेळ आॅलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच उच्च दर्जाचा झाला. पदकांच्या बाबतीत बोलायचे तर बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावणे हीसुद्धा खरे तर तिची स्वर्णिम कामगिरीच होती. सिंधूचा स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी झालेला महिलांच्या एकेरीचा अंतिम सामना एवढा रोमहर्षक झाला की संपूर्ण देश तिच्या पाठीशी एकवटला होता. तिचे सुवर्णपदक हुकले, पण करारी जिद्द आणि उच्च कोटीची खिलाडूवृत्ती दाखवून हैदराबादच्या या उंच, सडपातळ मुलीने सर्वांची मने जिंकली.सिंधूवर बक्षिसे आणि पुरस्कारांचा वर्षाव होतोय. एका चाहत्याने सिंधूला बीएमडब्ल्यू मोटार देण्याचेही जाहीर केले आहे. पण आपण स्वत:लाच एक साधा प्रश्न विचारू या. सिंधूचा अंतिम सामना डोळ्यात प्राण आणून किती जणांनी पाहिला होता? रिओला जाण्यापूर्वी ती अगदीच गेलाबाजार खेळाडू नव्हती. सन २०१३ व २०१४ च्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये तिने ब्रॉँझपदके मिळविली होती. पण रिओच्या आधी तिच्याकडे कोणी फारसे लक्षही दिले नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आॅलिम्पिक पदक मिळविण्याच्या आधीपासूनच आपण आपल्या खेळाडूंकडे लक्ष द्यायला हवे, त्यांचा सन्मान करायला हवा. तसे झाले असते तर आपली आॅलिम्पिक पदकांची संख्या कदाचित एवढी दयनीय दिसलीही नसती. दीपा कर्माकरचेही तेच झाले. आॅलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची ती एकमेव खेळाडू. ब्रॉँझपदक थोडक्यात हुकले व दीपा चौथी आली. तरी तिच्या जिगरबाज तयारीने प्रत्येकाचे मन जिंकले. त्रिपुराच्या या जिद्दी मुलीने ‘प्रोदोनोव्हा व्हॉल्ट’ म्हणून ओळखली जाणारी तिहेरी कोलांटउडी अगदी लीलया मारली. ‘डेथ व्हॉल्ट’ म्हणून ओळखली जाणारी ही कसरत एवढी धोक्याची आहे की अंतिमत: अजिंक्यपद मिळविलेल्या अमेरिकेच्या सिमोन बाईल्सलाही या व्हॉल्टचे धाडस झाले नाही. तेव्हा दीपाने ही कठीण कोलांटउडीही सहजपणे साध्य केली. पण या गुणवान खेळाडूला क्रीडा व्यवस्थापनाकडून कशी वागणूक मिळाली? रिओला जाताना तिच्या फिजिओथेरपिस्टला तिच्यासोबत जाऊ दिले गेले नाही. दीपा अंतिम फेरीत पोहोचली तेव्हा या फिजिओथेरपिस्टला तेथे पाठविण्यात आले. जिम्नॅस्टिक्सची ‘पॉवर हाउस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांच्या तुलनेत दीपासाठी त्रिपुरामध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधा खालच्या दर्जाच्या आहेत, हे वेगळे सांगायला नको. तिला कोणीही कोणताही रोख पुरस्कार जाहीर केला नाही. तरी २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची जिद्द तिने सोडलेली नाही. पण तोपर्यंत तिला अशाच प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागेल, असे दिसते. बॉक्सिंग, तिरंदाजी, कुस्ती, रोविंग, नेमबाजी आणि जिम्नॅस्टिक्स यांसह इतरही काही क्रीडा प्रकारांमध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत व पुढील आॅलिम्पिकमध्ये त्यांच्याकडून पदके मिळविण्याच्या आशा आहेत. पण कोणकोणत्या खेळात पदक जिंकू शकतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याची त्यासाठी तयारी करून घेण्याची सर्वंकष व्यवस्था करावी लागेल. साक्षी मलिक किंवा पी. व्ही. सिंधूने आॅलिम्पिक पदक मिळविले म्हणून भारताच्या या लेकींनी कमावलेल्या यशाने केवळ हर्षभरित होऊन जमणार नाही.आपल्याकडे गुणी खेळाडू जरूर आहेत, पण आपण त्यांच्यातून ‘चॅम्पियन’ निर्माण करण्यासाठी नेमके काय करतो? रिओ आॅलिम्पिकमधीलच दोन उदाहरणे याचे निराशाजनक उत्तर द्यायला पुरेशी आहेत. भारतीय खेळाडूंसोबत पवनदीप टोनी सिंग हे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रिओला गेले. ते रेडिओलॉजिस्ट आहेत व ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा त्यांना गंधही नाही. खेळाडू काहीही तक्रार घेऊन गेला की त्यांचा त्यावर ‘कॉम्बीफ्लाम’ हा एकच रामबाण उपाय असतो. टोनी सिंग हे निष्णात डॉक्टर आहेत म्हणून त्यांची रिओला जाण्यासाठी वर्णी लागली नाही. भारतीय आॅलिम्प्कि संघटनेचे उपाध्यक्ष त्रिलोचन सिंग यांचे चिरंजीव असणे एवढीच गुणवत्ता त्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे हे टोनी सिंग रिओमध्ये जणू पर्यटक म्हणून गेल्यासारखे मजा करत फिरत होते. याशिवाय आॅलिम्पिक संघटनेच्या कारभाराचे काय वर्णन करावे? आगामी निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे एक भलेमोठे शिष्टमंडळच रिओला गेले आहे. खेळांडूना विमानातून इकॉनॉमी क्लासने नेले व हे सर्व पदाधिकारी आरामदायी बिझिनेस क्लासने गेले. आॅलिम्पिकची अ‍ॅक्रिडिशन मर्यादित होती. ती खेळाडूंशी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याऐवजी या पदाधिकाऱ्यांनीच वाटून घेतली. आपले केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल एरवी तसे तारतम्य बाळगणारे. पण हे गोयल रिओला गेले आणि ‘सेल्फी’ वादात गुरफटले. यावरून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेस त्यांना समज द्यावी लागली आणि भारतीय पथकाच्या प्रमुखांना सारवासारव करणारा खुलासा करावा लागला. खेळाडूंना ‘चिअर-अप’ करायला गेलेले हरियाणाचे क्रीडामंत्री अनिल विज हेही बीचवर मजा मारताना पाहायला मिळाले. अशा प्रकारे पैशाचा अपव्यय होणार असेल तर मुळात क्रीडा मंत्रालयाची गरज आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. करदात्यांच्या पैशावर मौजमजा करणाऱ्या गोयल आणि विज यांचा भारताच्या झोळीत पडणाऱ्या पदकांसाठी काडीचाही उपयोग नाही. भारतीय आॅलिम्पिक संघटना व अन्य क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या खुर्च्या टिकविण्याची फिकीर आहे व खेळ आणि खेळाडूंचे हित हे त्यांच्या लेखी दुय्यम आहे. हे सर्व बदलावे लागेल व जोपर्यंत तसे होत नाही तोपर्यंत आपली आॅलिम्पिक पदकांसाठीची धाव ही अडथळ्यांची शर्यतच राहणार आहे. हे लिखाण संपविण्यापूर्वी...पाकिस्तानने काश्मीरमध्ये आक्रमकतेने हस्तक्षेप सरू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणाचा रोख व भाषा बदलून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात बलुचिस्तान व पाकव्याप्त काश्मीरचा थेट उल्लेख केला. तपशिलाचा थोडाफार फरक सोडला तर ही नेहमीच सर्वसहमतीची बाब राहिली आहे. त्यामुळे काश्मीरच्या बाबतीत मोदींना सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला. परंतु खरी गरज आहे काश्मीर खोऱ्यातील अशांत जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्याची आणि तेथील आपल्याच लोकांशी सुसंवाद साधण्याची.-विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)