अमेरिकेच्या डेमोक्रॅॅटिक पक्षाचे अधिवेशन नुकतेच फिलाडेल्फिया शहरात पार पडले आणि अपेक्षेप्रमाणे हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर गौरेतर ओबामांना दोनदा निवडून आणणाऱ्या या पक्षाने यावेळी एका महिलेला उमेदवार म्हणून निवडून पुन्हा एक नवा इतिहास निर्माण केला आहे. अमेरिकेतल्या मुख्य पक्षांची अधिवेशने बरीचशी उत्सवी व नाट्यपूर्ण असतात. व त्यांची दखल जगभरातली प्रसारमाध्यमे नेहमीच घेत असतात. हे अधिवेशनही असेच महत्वाचे ठरले. मुख्यत: अधिवेशनातील हिलरी यांच्या भाषणाची तर अपेक्षेप्रमाणे ेजगभरातल्या प्रसारमाध्यमांनी दखल घेतलीच पण त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅन्डर्र्स, बिल क्लिंटन आणि राष्ट्रपती ओबामा यांच्या भाषणांचीेदेखील दखल घेतली गेली. मिशेल ओबामा आणि अमेरिकेचा शहीद झालेला एक मुस्लीम सैनिक हुमायु खान याचे वडील खिर्झ खान यांची भाषणेदेखील लक्षवेधी ठरली. ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये हिलरी क्लिंटन यांच्या भाषणावर आॅर्थर ब्रूक्स आणि गेल कोलिन्स यांच्यातली चर्चा प्रकाशित झाली आहे. ब्रूक्स हे हिलरींचे समर्थक नाहीत. हिलरींच्या भाषणाचा उल्लेखही ते ‘बरेचसे ठीक ’ अशा काहीशा थंडपणानेच करतात. पण त्याच वेळी ‘मी डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन तसेच अपक्ष अशा सर्वच अमेरिकनांची राष्ट्राध्यक्ष होईन’ या हिलरींच्या वाक्याचा ते आवर्जून उल्लेख करतात व त्यातल्या व्यापकतेचे स्वागत करतात. विशेषत: ट्रम्प यांच्या विभाजनवादी भाषणांच्या पार्श्वभूमीवर हा उल्लेख महत्वाचा आहे. न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या संपादकीयात अमेरिकेच्या इतिहासात एका महिलेला निवडणुकीची उमेदवारी मिळण्याच्या घटनेच्या ऐतिहासिकतेचा संदर्भ देत या उमेदवारीमुळे महिलांना जी संधी सुरुवातीला कायद्याने आणि नंतरच्या काळात अमेरिकन राजकारणातल्या मान्यतांमुळे नाकारली, ती आता मिळाली असून त्यामुळे तरुण अमेरिकी महिलांना प्रोत्साहन मिळेल व त्यांना आजवर नाकारलेल्या संधीचे दरवाजे उघडले जातील आणि त्यामुळे देश अधिक बलवान व्हायला मदत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. हिलरी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलेली एकोप्याची आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भावना आणि विशेषत: भावी पिढ्यांसाठी करायच्या कामांची दखल न्यूयॉर्क टाईम्सने घेतलेली दिसते. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या स्तंभलेखिका कॅथेरिन रॅम्पेल यांनी केलेल्या विश्लेषणात डेमोक्रॅटिक पक्षाने आश्चर्यकारकपणे रिपब्लिकन पार्टी आणि ट्रम्प यांच्यात फरक केला असल्याचे सांगून त्यामुळे ज्या रिपब्लिकन्सना ट्रम्प यांची धोरणे मान्य नाहीत त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला असल्याची मुद्दाम दखल घेतली आहे. या संदर्भात उपाध्यक्षपदाचे उमेदवार टीम केन यांच्या भाषणातल्या लिंकन यांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाचा तुम्ही शोध घेत असाल तर तो तुम्हाला डेमोक्र ॅटिक पक्षातच सापडेल या टिपणीचादेखील उल्लेख केला आहे. ‘पोस्ट’च्या संपादकीयात ज्या गुंतागुंतीच्या वातावरणात यावेळच्या निवडणुका होत आहेत त्याचा संदर्भ देत सामान्य परिस्थितीत खिर्झ खान यांच्या भाषणानेच निवडणुकीचा निर्णय नक्की केला असता पण सध्याच्या स्थितीत तसे होणार नाही असे सांगत ट्रम्प यांनी मुस्लीम, मेक्सिकन्स आणि अशा इतर अनेकांना दुखावून वातावरणात एक प्रकारचा तणाव निर्माण केला असल्याचे म्हटले आहे. पण त्याला उत्तर देताना हिलरी क्लिंटन यांनी संथ पण वाढत्या प्रमाणावर होणाऱ्या विकासात सर्व प्रकारच्या अमेरिकनांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचा जो इरादा व्यक्त केला आहे, त्याची नोंद घेतली आहे. समाजामधली असमानता तसेच सुरक्षिततेला निर्माण झालेला गंभीर धोका यांची जाणीव क्लिंटन यांना आहे, हे सांगतानाच ट्रम्प आणि सॅन्डर्स या दोघांचेही मार्ग नाकारत त्यांनी आपला वेगळा रस्ता धरलेला आहे असे पोस्टने म्हटले आहे. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय विषयावर सहमती होण्याची आजवरची परंपरा मोडली असल्याचेही पोस्ट नमूद करते. ‘गार्डियन’च्या झेनी जार्डीन यांनी क्लिंटन यांचे भाषण बाळबोध पण प्रभावी होते असे म्हटले आहे. त्या लिहितात, हिलरी क्लिंटन यांच्याशी अनेक बाबतीत आपले एकमत होणारे नाही पण तरीही एका महिलेने उमेदवारी स्वीकारल्याच्या घटनेचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आणि माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या घटनेची तुलना त्यांनी नील आर्मस्ट््रॉन्ग चंद्रावर उतरले त्या घटनेशी केली आहे. अधिवेशनात हुमायु खानचे वडील खिर्झ खान यांनी केलेल्या भाषणावर आणि त्यापेक्षाही त्यावरच्या ट्रम्प यांच्या मल्लिनाथीवर अनेक वृत्तपत्रांनी टीका केली आहे. ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेचा गाभाच समजलेला नाही व त्यांनी घटना वाचलेलीच नाही अशी खान यांनी टीका केली होती. त्यावर खान यांनी त्यांच्या तथाकथित त्यागाच्या गप्पा सांगू नयेत, असे सांगत ट्रम्प यांनी जी शेरेबाजी केली होती त्याचा समाचार गुंतवणूकतज्ज्ञ वॉरन बफे आणि सिनेटर जॉन मेकेन यांनी घेतला आहे. त्याचा वृत्तांत ‘फायनान्शियल टाईम्स’मध्ये वाचायला मिळतो. अधिवेशनातील बराक ओबामांच्या भाषणाची दखल बहुतेक सर्वच प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. पण खरी छाप पाडली ती अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी केलेल्या भाषणाने. ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक ख्रिस सिल्लीझा यांनी अधिवेशनातील सर्वोत्तम भाषण म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. या भाषणात दोन आफ्रिकन-अमेरिकन मुलींची आई म्हणून त्यांच्या वैयक्तिक भावना आणि त्यामुळे त्यांनी हिलरींचा मोकळेपणाने केलेला पुरस्कार लक्षणीय ठरला. ‘गार्डियन’च्या डेव्हिड स्मिथ यांनी ट्रम्प यांच्या (बेताल) भाषणावरचा उत्कृष्ट उतारा म्हणून मिशेल यांच्या भाषणाचा उल्लेख केला आहे. महिला राष्ट्रपती होऊ शकते हा विश्वास हिलरींच्या मुळे माझ्या मुलींना वाटायला लागला असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाला भावनात्मक स्तरावर नेले आणि त्यामुळे उपस्थित प्रतिनिधींच्यापैकी अनेकजण गहिवरले याची दखल त्यांनी घेतली आहे. माझ्या मुली आणि अमेरिकेची भावी पिढी विश्वासाने ज्याच्या हाती सोपवता येईल अशा विश्वासू नेत्या म्हणून हिलरींचा त्यांनी केलेला उल्लेख ट्रम्प यांच्या प्रतिमेच्या विरोधात खूप प्रभावी ठरला हे नक्की.-प्रा.दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)
हिलरी-मिशेल या महिलांनी गाजवलेले अधिवेशन
By admin | Updated: August 3, 2016 05:00 IST