अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि लक्षावधींचे आराध्यदैवत असलेल्या सावळ्या विठुरायाचा आषाढी वारी सोहळा अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या पंधरवड्यात भूवैकुंठ पंढरीत वारीच्या आयोजनाची सरकारी कामे सुरू होतील. ज्ञानोबा माउली आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या काळापासून सुरू असलेली ही वारी आता इव्हेंट झाली असली तरी कोणताही इव्हेंट उत्तम, नीटनेटकेपणाने पार पडावा, अशी साऱ्यांचीच अपेक्षा असते. आषाढी वारीच्यानिमित्ताने उत्पादन, मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या, स्थानिक व्यापारी, मोबाइल कंपन्या आपले टार्गेट्स सेट करून कामाला लागतात. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानेही यंदा वारी अधिक निर्मल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एप्रिलच्या तिसऱ्या सप्ताहात यासंदर्भात एक बैठक घेऊन नमामि चंद्रभागा अभियानाचा तपशील सांगितला. ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर आखलेल्या या प्रकल्पात फडणवीस सरकारला सन २०२२ पर्यंत चंद्रभागा प्रदूषणमुक्त करायची आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ‘नमामि चंद्रभागा’मध्ये जी विविध कामे करायची आहेत, त्यामध्ये नदीच्या प्रवाहात येणाऱ्या प्रदूषण वाढविणाऱ्या प्रवाहांना रोखायचे आहे. ‘नमामि चंद्रभागा’मध्ये मूळ आणि अवघड समस्या हीच आहे. त्याचे कारण लोकांच्या भावनेशी निगडित आहे. पंढरपूर हे देशातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्री जाऊन विविध प्रकारचे विधी करण्याला आपल्या धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या अस्थींचे विसर्जन पवित्र चंद्रभागेत करण्याचा रिवाज आहे. शिवाय पंढरपुरातील कुणी स्वर्गवासी झाले तर मयताच्या अग्निसंस्कारापूर्वी त्याला नदीपात्रात स्नान घातले जाते, असे तेथील लोक सांगतात. चंद्रभागा निर्मल करण्यासाठी मात्र या प्रथा थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून जनजागरण केले गेले पाहिजे. ‘नमामि चंद्रभागा’मध्ये अस्थिविसर्जन आणि अन्य काही अंतिम कार्यासाठी वेगळे कुंड बांधणे आवश्यक वाटते. याशिवाय चंद्रभागेत ड्रेनेजचे पाणी मिसळले जात असल्याचे गतवर्षी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर दाखविण्यात आले. अर्थात मुद्रित माध्यमांनी यासंदर्भात पूर्वीच लक्ष वेधले होते. हे रोखण्याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे... वारी निर्मल करण्यासाठी किमान इतकं तरी सर्वप्रथम होणं, गरजेचे आहे.
निर्मल वारीसाठी
By admin | Updated: May 2, 2016 02:13 IST