शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मशीन म्हणाले, आय ॲम सिडनी, आय ॲम इन लव्ह विथ यू, आता...?

By shrimant mane | Updated: March 18, 2023 08:00 IST

तुमची प्रत्येक हालचाल, राग-लोभ-प्रेम, कपाळावरच्या आठ्या वेबकॅम टिपणार असेल तर खासगी आयुष्य नावाचा काही प्रकार शिल्लक राहणार नाही!

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

तंत्रज्ञानाचे अभ्यासक केविन रूस यांनी न्यूयाॅर्क टाइम्समधील स्तंभात लिहिलेल्या अनुभवाने खळबळ उडाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या बिंग चॅटबॉटशी बोलताना अचानक त्यांना उद्देशून मशीन म्हणाले, आय ॲॅम सिडनी, ॲम आय एम इन लव्ह विथ यू! मशीनवर कोण प्रेम करील म्हणून रूस यांनी तिला आपण विवाहित असल्याचे शांतपणे सांगितले. त्यावर मशीन म्हणाले,  ‘हां, पण, व्हॅलेंटाइन डेला पत्नीसोबत केलेले डीनर बोरिंग होते ना.’ 

- हे आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. बायकोपासून विभक्त होण्याचा सल्ला देणारी, कौटुंबिक भावबंधने तोडायला लावणारी कृत्रिम बुद्धिमत्ता. अस्वस्थ करणारी. डिजिटल प्रेम अर्थहीन आहे खरे, पण त्यातून वाट्याला येणारी विचित्र कोंडी व घुसमटीचे काय?  तंत्रज्ञानाचे एक रूप लोभस, अद्भुत, वेड लावणारे आणि दुसरे भीतीदायक व बीभत्स. स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, अन्य गॅझेट्समुळे माणसे मशीन बनलीच आहेत. माणसांची दैनंदिनी यंत्रेच ठरवितात. आता त्यात आश्चर्य वगैरे काही नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेने मशिनीला मेंदू दिला गेला. आधी तो अलेक्सा, सिरीला दिला. पण, ते दोघे भलतेच ढ वाटावेत, असे चॅटबॉट आता आले आहेत. ओपन एआयचा चॅट जीपीटी, गुगलच्या ला-एमडीएने त्याची सुरुवात झाली. कोट्यवधी लोकांच्या वागण्या-बोलण्याचा अभ्यास करून, महाप्रचंड डेटा वापरून कुठल्याही प्रश्नाचे उत्तर, वाट्टेल ती माहिती क्षणार्धात दिली जाऊ लागली.  हे या तंत्रज्ञानाचे बालपण आहे. कारण, ही बुद्धिमत्ता सध्या टेक्स्ट बेस्ड आहे. 

जीपीटी-४ हे टेक्स्टसोबतच इमेजेसचा वापर करणारे व्हर्जन नुकतेच आले. त्याला आपण कुमारवय म्हणू. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या पुढच्या अवताराच्या कल्पना भीतीदायक आहेत. तुमची प्रत्येक हालचाल, राग-लोभ-प्रेमाच्या वेळी चेहऱ्यावर उमटणारे भाव, कपाळावरच्या आठ्या व डोळ्यात तरळणारे प्रतिबिंब संगणकाचा वेबकॅम टिपणार असेल तर खासगी आयुष्य नावाचा काही प्रकार शिल्लकच नसेल. त्याशिवाय भावनिक गुंतागुंत मेंदू बधिर करणारी असेल. 

या गुंतागुंतीची झलक पाहा - २००२ मधील ‘S1mOne’ अर्थात ‘सिम्युलेशन वन’ चित्रपटात सिमोन नावाची डिजिटल नायिका दिग्दर्शक पडद्यावर आणतो. ते डिजिटल क्रिएशन दर्शक, समीक्षक, पत्रकार, पापाराझी सर्वांपासून लपवतो. तिच्या रूपाने मानवनिर्मितीचे ईश्वरी कौशल्य साधल्याचा आनंद मिळतो खरा. पण, निर्मिकाला स्वत:चीच निर्मिती सांभाळता येत नाही. एक दिवस फुगा फुटतो. २०१३च्या ‘Her’ चित्रपटात आभासी जगातील माणसे व माहितीच्या प्रेमात आकंठ बुडालेला नायक थिओडोरला शेवटी उपरती होते आणि स्वत:चा पुन:शोध घेणे हेच जगण्याचे इप्सित असल्याची कबुली तो देतो. 

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन अल्गोरिदम आवडणे किंवा वापरणे यातून काही बिघडत नाही. मोठा धोका आहे तो हाडामांसाची माणसे प्रेमाच्या फॅन्टसीच्या प्रेमात पडण्यात आणि मशीनने ती फॅन्टसी प्रत्यक्षात आणण्यात. सारे काही आभासी आहे हे माहिती असूनही ते मान्य करण्याच्या पलीकडे हे वेडे प्रेम गेले की सगळे संपले. या विचित्र अवस्थेत जगण्यापेक्षा कुणी म्हणेल, की मशीन, अल्गोरिदम, एआय सारे काही सोडा, चला भूतकाळाकडे. पण, ते शक्य नाही. कारण माणसे बाजारपेठेच्या हातची बाहुली आहेत. 

एखादी वस्तू ऑनलाइन सर्च केली की तिच्या माहितीचे मेल इनबॉक्समध्ये पडणे, हे जुने झाले. कॉल सेंटरकडून खाद्यपदार्थ, डायबेटीस, इन्श्युरन्स, डेबिट कार्ड, बँक खाते वगैरेचे तपशील ऐकून भोवळ येण्याचा विनोदही जुना झाला. सिडनीसारखी लहरी, विचित्र पात्रे त्यापेक्षा गंभीर, गुंतागुंतीचे, भावनांशी खेळणारे तंत्रज्ञान घेऊन उंबरठ्यावर उभी आहेत. ती घरात येतील तेव्हा घर हे घर राहील का? हा प्रश्न आहे. 

- shrimant.mane@lokmat.com

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :technologyतंत्रज्ञान