‘ज्यानी कोणी आयुष्यात कधीच पाप केले नसेल, त्याने या स्त्रीला दगड मारावा’, असे येशू ख्रिस्ताने म्हटल्याचा उल्लेख ख्रिस्तपुराणातील एका गोष्टीत आहे. येशूच्या या उक्तीचा निकष लावला, तर आपल्या देशातील एकाही राजकारण्याला भ्रष्टाचारासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवता येणे अशक्यच आहे. तरीही भारतातील गोवा व केरळ या राज्यातील भ्रष्टाचाराचे जे प्रकरण अमेरिकेतील न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान उघडकीस आले आहे, त्याने काँगे्रसवर आरोपाच्या फैरी झाडण्यासाठी नवा दारूगोळा भाजपाच्या हाती पडला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जराही वेळ न घालवता लगेचच हा दारूगोळा वापरून काँगे्रसच्या हातात सत्ता असताना त्या सरकारातील दोन मंत्र्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवून ‘सीबीआय’ चौकशीची मागणी केली आहे. आता हे प्रकरण गाजत राहील. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातील. चौकशी करा, अशी मागणी भाजपा लावून धरेल. चौकशीला आम्ही तयार आहोत, पण सुषमा स्वराज, वसुंधरा राजे इत्यादींचीही चौकशी करा, असा पवित्रा काँगे्रस घेईल. प्रत्यक्षात चौकशी झाली, तरी काहीच हाती लागणार नाही; कारण चौकशीत पुरावे गोळा करावे लागतात. पण आपल्या देशात पुरावेच गायब व नष्ट करण्याचे कसब राजकारण्यांकडे आहे. अगदी छोट्या प्रकरणापासून मोठ्या घोटाळ्यांपर्यंत अडकलेल्यांना न्यायालयात शिक्षा होईल, इतके सबळ पुरावे कधीच हाती लागत नाहीत. या दृष्टीने महाराष्ट्रातील दोन, एक छोटे व एक मोठे, अशी प्रकरणे चांगली बोलकी उदाहरणे आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटप करण्याचे अधिकार असलेल्या कोट्यातून किती अपात्र व्यक्तींना घरे दिली गेली, या संबंधीचा एका खटला मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली, तेव्हा किती अपात्र व्यक्तींना अशी घरे दिली गेली, याची यादी व तो निर्णय कसा घेतला गेला, या संबंधीच्या फायली हजर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पण या फायलीच गायब झाल्या. दुसरे मोठे प्रकरण म्हणजे ‘एन्रॉन’चे. गेली २३ वर्षे हे प्रकरण गाजते आहे. हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू, अशी घोषणा त्यावेळचे भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केली होती. मग युतीचेच सरकार सत्तेत आले. मुंडे यांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. तिने ‘एन्रॉन’ प्रकल्पाच्या विरोधात अहवाल दिला. आता हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला जाणार, असे वाटत असतानाच, तो तुकारामाच्या गाथांप्रमाणे पाण्यावर तरंगू लागला. हे कसे घडले, ते अमेरिकी सिनेटच्या समितीपुढे कंपनीच्या त्यावेळच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी रिबेक्का मार्क्स यांनी दिलेल्या साक्षीत उघड झाले. या कंपनीने भारतीय राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात वीजप्रकल्पाबाबतची ‘जाणीव जागृती’ निर्माण करण्यासाठी किती कोटी रूपये खर्च केले, याचा तपशीलच रिबेक्का मार्क्स यांनी समितीपुढे ठेवला. याच रिबेक्का मार्क्स सेनाप्रमुख ठाकरे यांना भेटायला गेल्या, तेव्हा त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी वेळेवर हजर राहिले नाहीत, म्हणून सेनाप्रमुखांनी त्यांच्याविषयी काय उद्गार काढले, ते प्रसिद्ध झाले होतेच. नंतर हा प्रकल्प सुरू झाला. ‘एन्रॉन’ची सगळी वीज राज्य वीज मंडळाने घेण्याचा करार होता. त्यामुळं वीज मंडळाचे दिवाळे निघण्याची वेळ आली, तेव्हा नंतर आलेल्या लोकशाही आघाडीच्या सरकारने हा प्रकल्प बंद केला. वाद आंतरराष्ट्रीय लवादापुढे गेला. राज्य व केंद्र सरकारांना शेकडो कोटी रूपये देणे भाग पडले. हा प्रकल्प दुसरी कंपनी स्थापन करून चालवण्यात येत आहे. पण अजूनही त्याचे रडगाणे चालूच आहे. उलट ‘एन्रॉन’ कंपनी या दाभोळ प्रकल्पामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली. मुळची ही व्यापारी कंपनी. ती वीज निर्मितीत उतरली. या कंपनीला वीज निर्मितीचा कोणताच अनुभव नव्हता. या प्रकल्पाची आर्थिक आखणी कंपनीने केली होती, ती अवास्तव आहे, असे सांगून जागतिक बँकेने कर्ज नाकारले. तरीही भारत सरकार मागे हटले नाही. हा प्रकल्प मिळविण्यासाठी कंपनीच्या अर्थव्यवहारात जो घोळ घातला गेला आणि हिशेबात जी मखलाशी केली गेली, त्यामुळे कंपनी दिवाळखोरीत निघाली. अमेरिकी न्यायालयात खटला चालला. कंपनीच्या दोघा संचालकांना शिक्षा झाल्या. एकाने आत्महत्त्या केली. आणखी एकाला वेड लागले. आता जे प्रकरण अमेरिकी न्यायालयात उघड झाले आहे, त्यातही कंपनीला एक कोटी ७१ लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि कंपनीच्या दोघा अधिकाऱ्यांवर भारतीय राजकारण्यांना लाच दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. असा काही झटपट निकाल भारतात या प्रकरणात लागण्याची शक्यताच नाही. प्रसार माध्यमातील चर्चांना एक नवा विषय मिळेल. ‘तुम्ही काय केले होते, ते सांगा’, असा सवाल काँगे्रसला भाजपा विचारेल, आणि ‘तुम्ही वेगळे होता ना, मग आमच्यासारखेच काय वागता’, असा जबाब काँगे्रस देईल. पण नि:पक्षपाती चौकशी करून दोषींना शिक्षा होण्यात कोणालाच रस नाही; कारण येशूंच्या उक्तीप्रमाणे सारेच पापी आहेत.
सारेच पापी!
By admin | Updated: July 21, 2015 23:36 IST