- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)
उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षात गृहकलहाचे जे विचित्र नाट्य गेल्या काही दिवसांपासून घडते आहे, ते सर्वांसमोर आहे. राज्यात पाच वर्षांपूर्वी हा पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तेव्हा बदलत्या काळाची हाक ऐकून अखिलेश यादवांसारख्या तरूण नेत्याकडे उत्साहाने मुख्यमंत्रिपद सोपवले गेले. त्यावेळी पक्षाचे घोषवाक्य होते ‘युवा सोच और युवा जोश.’ सध्या विधानसभा निवडणुकीच्या उंबरठयावर उत्तर प्रदेश उभा आहे. अशा वेळी अखिलेशनी आपल्या कारकिर्दीत काय केले, राज्याचा विकास नेमका कुठपर्यंत पोहोचवला, याचा लेखाजोखा लोकांसमोर सादर करण्याऐवजी, यादवांच्या कुटुंब कबिल्यात अचानक गृहकलह उसळला आहे. मुलगा, भाऊ, काका, पुतण्यांमधे प्रथम पत्रलेखनाची स्पर्धा रंगली. मग परस्परांना आणि समर्थकांना मंत्रिमंडळातून अथवा पक्षाच्या पदावरून हुसकण्याचे खेळ सुरू झाले. या कलहात मुख्यमंत्री पुत्र काकाच्या साथीने पित्याला आव्हान देत एकीकडे उभा राहिला तर मोठया भावाच्या छायेखाली प्रदेशाध्यक्ष काका थेट मुख्यमंत्र्याच्या विरोधातच दंड थोपटू लागला. विकासाच्या साऱ्या घोषणा त्यात थिजून गेल्या. समाजवादी पक्षाचा डोलारा ज्यांच्या खांद्यावर उभा आहे, त्या मुलायमसिंहांना मुलाच्या आधी भावांना आणि पक्षाच्या आधी कुटुंबाला वाचवावेसे वाटले. कॉर्पोरेट घराण्यांचे निकटवर्ती अमरसिंहांसारख्या मित्राची मर्जी राखावीशी वाटली. बंद खोलीतले भांडण त्यामुळे हातघाईवर आले. सत्तेच्या स्वप्नपूर्तीसाठी काळया जादूचे प्रयोगही घरात सुरू झाले. सत्ताकांक्षींच्या तांडवात सारी अब्रू चव्हाट्यावर आली. सुरूंग पेरलेल्या चिरेबंदी वाड्याची भगदाडे कशीबशी झाकीत, युध्दविरामाचे पांढरे निशाण हातात घेऊन अखेर मुलायमसिंह पत्रकारांसमोर आले अन् म्हणाले, ‘पक्ष असो की कुटुंब, सारे वाद मी संपवले आहेत. पक्षात लोकशाही आहे. निवडून आलेले आमदारच यापुढे भावी मुख्यमंत्र्याची निवड करतील’. भांडण खरोखर मिटलंय का, याचे उत्तर आज कोणाकडेही नाही. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत बहुदा प्रथमच सर्वात मोठया राजकीय आव्हानाला मुलायमसिंह सामोरे जात आहेत. फरक इतकाच आहे की त्यांचा समाजवादी पक्ष या खेळात आज जात्यात आहे तर देशात एकेकट्या नेत्याभोवती फेर धरणारे इतर बरेच पक्ष सुपात आहेत.उत्तर प्रदेशात मायावतींचा बसप, तामिळनाडूत जयललितांचा अद्रमुक, करूणानिधींचा द्रमुक, ओडिशात नवीन पटनायकांचा बिजू जनता दल, बंगालमधे ममता दीदींचा तृणमूल, महाराष्ट्रात शरद पवारांचा राष्ट्रवादी, उध्दव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे, बिहारमधे लालूप्रसादांचा राजद, नितीशकुमारांचा जद (यु) कर्नाटकात देवेगौडांचा जद (से), काश्मीरमधे अब्दुलांची नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्तींची पीडीपी, हे सारे पक्ष आज एकेकट्या नेत्याभोवती फेर धरीत आपले अस्तित्व सांभाळून आहेत. या पक्षांना समाजवादी पक्षासारख्या गृहकलहाला अद्याप तोंड द्यावे लागलेले नाही. प्रत्येक पक्ष एकखांबी तंबूसारखा आहे. त्याचे नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, त्यातले निम्म्याहून अधिक नेते आपल्या राजकीय आयुष्यात अखेरची इनिंग खेळत पीचवर उभे आहेत. तंबूचा मधला खांब जरासा जरी कलला तरी हे सारे पक्ष पाचोळयासारखे कुठल्या कुठे उडून जातील. राजकीय समरांगणात दीर्घकाळ टिकायचे असेल तर स्वत:च्या व्यक्तिगत प्रभावाचा विस्तार सतत वाढवत न्यावा लागतो. जनतेचा विश्वास संपादन करण्याचे कौशल्य सिध्द करावे लागते. जो नेता ही हिंमत दाखवतो, लोक त्यालाच मनापासून स्वीकारतात. सत्तेची संधीही देतात. आपल्या स्वतंत्र नेतृत्वाच्या स्वायत्ततेचा आलेख त्यासाठी सतत चढता ठेवावा लागतो. नेता लोकप्रिय असला, लोकांना त्याचे नेतृत्व भावले तरी त्याच्या कुटुंबाचे परप्रकाशित तारांगण लोक स्वीकारतीलच, याची खात्री नाही. म्हणूनच अशा नेत्याने स्वत:सह आपल्या पक्षाला, लोकसंपर्काच्या व्यवहाराला, सत्तेच्या दलालांपासून आणि गृहकलहापासून कटाक्षाने दूर ठेवायचे असते. त्यात जराशीही चूक झाली तर राजकारणाच्या समरांगणात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. समाजवादी पक्षात जे सत्तानाट्य सध्या सुरू आहे, त्याचा बाज यापेक्षा वेगळा नाही. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत, प्रत्येक पक्षात तरूण नेतृत्वाचा शोध सुरू आहे. समाजवादी पक्षात अखिलेश यादवांनी आपल्या नेतृत्वाच्या स्वायत्ततेचा विस्तार करण्याचा थोडाफार प्रयत्न जरूर केला मात्र अचानक उद्भवलेल्या गृहकलहामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या भृणहत्येची पाळी आली. राजकीय प्रवासात वयाच्या ४८ व्या वर्षी मुलायमसिंहांनी आपल्या पित्यासमान चरणसिंहांना सोडले आणि वेगळी वाट धरली. कालांतराने त्यातूनच त्यांचा समाजवादी पक्ष उभा राहिला. अखिलेश यादवांनी गृहकलहात गुंतण्याऐवजी आपल्या पित्याचे अनुकरण करीत नवा पक्ष उभा करण्याची हिंमत दाखल्यिास त्यांना लगेच यश मिळाले नाही तरी उत्तर प्रदेशच्या राजकारणात स्वतंत्र प्रतिभेचा नेता म्हणून आज ना उद्या ते नक्कीच स्थिरावतील. लोकसभेच्या निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना, राहुल गांधींना अशी संधी मिळाली, मात्र काँग्रेसच्या सुस्त आणि क्लिष्ट कार्यपध्दतीत, तथाकथित नेत्यांच्या चक्रव्युहात, गांधी कुटुंबाच्या भोवती सतत फेर धरणाऱ्या जागोजागच्या काँग्रेसजनांमुळे दिल्लीत आणि दिल्लीबाहेर राहुल असे काही अडकले की मैदानात भरपूर मेहनत करूनही स्वत:च्या नेतृत्वाचा अथवा पक्षाच्या प्रतिभेचा जनमानसात ते विस्तार घडवू शकले नाहीत. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदानंतर राष्ट्रीय राजकारणात झेप घेताना नरेंद्र मोदींसमोरही बरेच अडथळे होते. अडवाणी मोदींच्या पित्यासमान होते. देशाच्या राजकारणाचा अधिक अनुभव सुषमा स्वराजांकडे होता. मोदींचे नेतृत्व स्वीकारतांना सरसंघचालक भागवतांची नजर संशयाने पछाडलेली होती. अरूण जेटलींसह अन्य स्पर्धक सूचक मौन पाळून होते. तरीही गुजरातसारख्या छोट्या राज्यात एक तप गुंतलेल्या मोदींनी प्रयत्नपूर्वक आपल्या राजकीय प्रतिभेचा विस्तार घडवला व एके दिवशी थेट राष्ट्रीय राजकारणात विराजमान झाले. सर्वांना त्यांनी अशी मात दिली की भाजपा आणि संघातले नेते तर निमूटपणे त्यांच्या भोवती फेर धरू लागले. अर्थात या दिग्विजयानंतर स्वत:च विणलेल्या कोशात, मोदींचा अहंकार अशा टीपेला पोहोचला की स्वत:चे स्थान सतत असुरक्षित असल्याची जाणीव त्यांना भेडसावू लागली. आजमितीला अमित शाह वगळता नाव घेण्याजोगा एकही विश्वासू सहकारी मोदींपाशी नाही. भाजपामधले बरेच नेते खाजगीत मोदींच्या नावाने बोटे मोडत मनोमनी धुमसत असतात. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सर्वत्र दारूण पराभव पत्करल्यानंतरही मोदींच्या नेतृत्वाला थेट आव्हान देण्याचे धाडस, दिल्लीत अरविंद केजरीवालांनी तर बिहारमधे नीतिशकुमारांनी दाखवले. त्यांच्याही पदरात जनतेने भरभरून यशाचे माप टाकले. जनतेचा विश्वास संपादन करतांना, नेतृत्वातले सातत्य आणि व्यक्तिगत प्रभावाचा विस्तार वाढवण्याचे गुण दोघांच्या ठायी होते. तेच त्यांच्या कामी आले. देशातल्या विविध पक्षात तरूण नेतृत्वामधे अशी जिद्द आजमितीला दिसत नाही. विपरीत स्थितीशी झुंज देण्याचे किलर इंस्टिंक्ट आणि जनमानसात स्वत:चे स्थान निर्माण करण्यात प्रत्येक पक्षातले तरूण नेते कमजोर ठरत आहेत. थोडक्यात सांगायचे तर दिपावलीचे प्रकाशपर्व सुरू होत असतांना, देशाच्या आश्वासक भविष्यासाठी सारा भारत तरूण नेतृत्वाच्या शोधात सध्या अंधारात चाचपडतो आहे.