शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

याकूबला फाशी दिल्यानंतर...

By admin | Updated: July 31, 2015 02:20 IST

अखेर काल याकूबच्या ५३व्या जन्मदिवशी सकाळी ७ वाजता त्याला फासावर चढविण्यात आले. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटांच्या मालिकेत मृत्यू पावलेल्या २५७ व जखमी झालेल्या ७००वर

अखेर काल याकूबच्या ५३व्या जन्मदिवशी सकाळी ७ वाजता त्याला फासावर चढविण्यात आले. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटांच्या मालिकेत मृत्यू पावलेल्या २५७ व जखमी झालेल्या ७००वर लोकांना त्यामुळे न्याय मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. काहीजणांनी या फाशीविषयीचा नको तसा उन्माद व्यक्त केला तर काहींच्या मनात याकूबने २२ वर्षे तुरुंगातल्या बंदिस्त अवस्थेत घालविल्यानंतर त्याला मृत्युदंड देणे उचित नव्हते अशी भावना व्यक्त केली. याकूबला फासावर चढविले जाणे याविषयीची जनभावना मोठी असली तरी मृत्युदंडाची शिक्षा रद्द व्हावी किंवा ती जन्मठेपेत रूपांतरित व्हावी अशी भावना असणाऱ्यांचा वर्गही मोठा व आदरणीय होता. भारतासारख्या लोकशाही देशात अशा प्रश्नावर एकमत होणे अशक्य असले तरी यात अडकलेल्या दोन बाबींविषयीची जाणती मते येथे नोंदविणे आवश्यक आहे. ३० जुलैला याकूबला फाशी देणार असल्याची गेले काही आठवडे जी जाहिरात प्रसिद्धीमाध्यमांत व सरकारी वक्तव्यांत सुरू होती ती टाळता येणे शक्य होते. त्यामुळे निर्माण होणारी विषाक्त व विषादाची भावनाही त्यातून टाळता आली असती. याआधी कसाब व अफजल गुरू या दोघांना फाशी दिल्यानंतरच त्याची बातमी जगाला समजली. परिणामी आजच्याएवढी त्याची चर्चा तेव्हा झाली नाही. दुसरी बाब मात्र अधिक मोठी व न्यायासनासकट साऱ्यांनी गंभीरपणे लक्षात घ्यावी अशी आहे. ‘याकूब मुसलमान असल्यामुळेच त्याला तातडीने फासावर लटकवले गेले’ या मजलिश ए इत्तेदाहूल मुसलमीनचे अध्यक्ष बॅ. असदुद्दीन औवेसी यांच्या आरोपाशी कोणताही नागरिक सहमत होणार नाही. मात्र अशा गुन्हेगारांना शिक्षा करताना व त्यांचा निकाल करताना न्यायासन व सरकार यांनीही यापुढे संपूर्णत: धर्मनिरपेक्ष वृत्ती बाळगली पाहिजे. ‘मालेगावच्या वा समझोता एक्स्प्रेसच्या गुन्हेगारांबाबत सरकार एवढी तातडी का दाखवीत नाही’ या एका कायदेपंडिताच्या प्रश्नाला यावेळी उत्तर देणे अवघड आहे. दिल्लीतील शीखविरोधी दंगली, बाबरी उद्ध्वस्त केल्यानंतर झालेला हिंसाचार किंवा गुजरातमधील मुसलमानांचे झालेले हत्त्याकांड याहीविषयी न्यायालये व सरकार यांना अशीच तटस्थ तातडी धारण करणे व कायद्यासमोर सगळे समान आहेत हे देशाला दाखवून देणे आता गरजेचे झाले आहे. राजीव गांधींच्या खुन्यांना जन्मठेप देऊन आता मोकळे सोडल्याबद्दलचा संताप सर्वोच्च न्यायालयाने कालच व्यक्त करणे या गोष्टीचे महत्त्व या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. एका गोष्टीबाबत मात्र साऱ्यांनीच नि:शंक व आश्वस्त होणे गरजेचे आहे. ‘आपल्याला न्याय मिळाला नाही’ असे याकूबने स्वत: म्हटले असले तरी त्याच्या भावांनी व इतर नातेवाइकांनी ‘आपली भारतीय न्यायव्यवस्थेवर श्रद्धा आहे’ असेच म्हटले आहे व ते पुरेसे आश्वासक आहे. याकूबला झालेली फाशी व कसाब आणि अफजल यांना झालेला मृत्युदंड यामुळे उद्याच्या संभाव्य दहशतखोरांना जरब बसणार आहे. यापुढे हा देश व त्यातील न्यायालये अशा अमानवी अपराधांना क्षमा करणार नाही याचा धाक त्या साऱ्यांच्या मनात नक्कीच निर्माण होणार आहे. या प्रकारालाही अपवाद ठरावा असा अपराध्यांचा एक वर्ग आता पुढे येत आहे आणि तो आत्मघातकी पथकातील गुन्हेगारांचा आहे. स्वत: मरून दुसऱ्यांना मारणाऱ्यांच्या या वर्गात असा भयगंड निर्माण होत नाही आणि तोच सर्वाधिक भयकारी लोकांचा वर्ग आहे. राजीव गांधींच्या हत्त्येला कारणीभूत झालेले किंवा मुंबईतील ताज हॉटेल व गुरुदासपूरवर हल्ला चढविणारे लोक असे होते. त्यांना व तशा प्रवृत्तींना संपविणे हाच त्यासाठी खरा व अखेरचा परिणामकारक उपाय आहे. याकूबच्या फाशीच्या निमित्ताने देशातून मृत्युदंडाला कायमची समाप्ती द्यावी अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे दिसले. परंतु मानवी जिवाचे मोल ज्यांना कळते त्यांनाच नैतिकतेची व अहिंसेची शिकवणही समजते. माणसांच्या कत्तली व त्यांची सामूहिक हत्त्याकांडे यांचे ज्यांना काहीएक वाटत नाही त्या निर्मम निष्ठुरांबाबत मग काय करायचे असते, हाही प्रश्न राहतोच. जोवर सांस्कृतिकता सार्वत्रिक होत नाही आणि माणुसकीचा धर्म साऱ्यांच्या गळी उतरत नाही तोवर अशा नैतिक शिकवणी सांगण्या-शिकवण्यापुरत्याच राहत असतात. काही का असेना याकूबच्या फाशीच्या निमित्ताने सारा देश अशा चर्चेने ढवळून निघाला. देशाचे सर्वोच्च न्यायालयही त्याला फाशी देण्याच्या दोन तास अगोदरपर्यंत म्हणजे पहाटे ५ वाजेपर्यंत त्याच्यावरील खटल्याच्या बऱ्यावाईटाची चर्चा करून आपल्या अखेरच्या निर्णयावर आले हे महत्त्वाचे. याकूबवरील प्रत्येकच आरोपाची शहानिशा अतिशय काळजीपूर्वक व गंभीरपणे केली गेली. त्याने पुढे केलेली प्रत्येकच याचिका संबंधित न्यायालयात अतिशय तपशीलवार विचारात घेतली गेली. त्याचे प्रत्येक म्हणणे सहानुभूतीने ऐकून घेतले गेले. त्यामुळे या खटल्यात कोणाकडूनही अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. यापुढचा प्रश्न अशा तऱ्हेची मोठी हत्त्याकांडे घडवून आणणाऱ्या व त्यांची आखणी करणाऱ्या सर्वच गुन्हेगारांबाबत असा न्याय होणे हा आहे.