कापडणे : तालुक्यातील कापडणे गावात मुख्य रस्त्यावर खड्ड्यामध्ये बेशरमची झाडे लावून ग्रामस्थांनी रसत्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले़ या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील यांनी दिला आहे़धुळे तालुक्यातील कापडणे हे तीस हजार लोकवस्तीचे गाव आहे़ गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य भाग आहे़ महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या स्मारकाजवळच रस्त्यावरील खड्ड्यात डबके साचले आहे़ रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे़ तब्बल दोन-तीन वर्षांपासून या रोडावर मोठे खड्डे पडले आहेत़ याठिकाणी रोडाच्या दोन्ही बाजूला गटारी नाहीत़ पावसाचे पाणी तसेच गावातील सांडपाणी निचरा होण्याची सोय नसल्याने रस्त्याला गटारीचे स्वरुप आले आहे़ गावातील वाटसरूंना मोठी कसरत करून दररोज ये-जा करावी लागत असते सदर रोड धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने अखेर या विभागाचे लक्ष वेधण्यासाठी कापडणे येथील पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात घाण पाण्यात बेशरमच्या झाडांची लागवड करून शासनाचा निषेध करण्यात आला. गावकऱ्यांनी सोमवारी हे आंदोलन केले़राज्य महामार्ग क्रमांक ४७ या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे .येथील रोडवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने रोड पूर्ण खराब झालेला आहे़ साचलेल्या पाण्यातून कापडण्यातील दुचाकी, चारचाकी वाहनधारक, पायी चालणारे गावकरी, आबालवृद्ध मोठी कसरत करून दररोज मार्गस्थ होत असतात़ बºयाचदा मोटारसायकल घसरून अपघातही झालेआहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्याकडे कापडणे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच जया प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल नामदेव पाटील आदींनी निवेदन देवून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे़ मात्र गेल्या काही वर्षांपासून अद्यापही या रोडाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले नाही़पावसाचे पाणी तसेच सांडपाणी साचत असल्याने गावात दुर्गंधी पसरली आहे़ डासांचा आणि किटकांचा प्रादुर्भावा वाढून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कोरोना संसर्गाच्या काळात शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले असताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावात अस्वच्छता पसरली आहे़या अनोख्या आंदोलनात माजी ग्रामपंचायत सदस्य भटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र माळी, माजी सदस्य अनिल माळी, काशिनाथ भिल, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर हरिओम पाटील, प्रभाकर पाटील, गुलाब माळी, चंदू पाटील, भागवत पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाली होती़
रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमी झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:29 IST