धुळे : येथील एका प्रख्यात वकीलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ कुटूंबातील काही संदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे़ मुलगा देखील प्रसिध्द वकील असला तरी त्यांना अंत्यसंस्कार करण्यास मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही़ अशा बिकट प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी धावून आले़धुळे कोर्टातील एका वकीलाच्या वडीलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ गोपाळनगर परिसरातील कुटूंबियांना प्रशासनाने याबाबत माहिती दिली़ परंतु मृत व्यक्तीच्या कुटूंबातील काही सदस्यही कोरोना बाधित आढळून आले़ शिवाय अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक देखील काही कारणास्तव येवू शकले नाहीत़ त्यामुळे अंत्यसंस्कार करण्याची बिकट समस्या सदर कुटूंबासमोर निर्माण झाली़दरम्यान, सदर कुटूंबाने याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन शेवतकर यांना फोन करुन याबाबत माहिती दिली़ त्यानंतर सचिन शेवतकर, प्रशांत मोराणकर, विजय पवार, दीपक डोंगरे, किशोर कंड्रे, सूरज अहिरराव, गोकूळ देवरे, परदेशी आणि राणा आदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धावून आले़ सोमवारी दुपारी हिरे रुग्णालयाच्या मागील परिसरात धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले़महानगरपालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यासह पथकाने रुग्णवाहिकेतून मृतदेह आणल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अंत्यविधीसाठी सहकार्य केले़अंत्यसंस्काराच्या वेळी सदर वकीलाच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि अश्रूंचा बांध फुटला होता़ कोरोनाच्या आपत्तीमुळे समाज माणुसकी विसरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली़ कोरोनाच्या या संकटात माणुसकी जपण्याची आणि एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे़ कुणाला कोरोना झाला म्हणून त्याला आणि त्याच्या कुटूंबाला तुच्छ लेखू नका, कोरोना रुग्णांना आणि त्याच्या कुटूंबियांना वाळीत टाकू नका, असे भावनिक आवाहन या वकीलांनी केले आहे़कोरोनाबाधित व्यक्तींपासून अंतर ठेवून काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ परंतु यामुळे माणुसकी नाहीशी होता कामा नये अशा प्रतिक्रिया उमटत आहेत़कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून आणि मृतांचा आकडा वाढू लागल्यापासून मृतदेहांवर अंत्यसंस्काराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ दोन महिन्यांपूर्वी धुळे शहरातील एका वृध्द महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काराची समस्या निर्माण झाली होती़ त्यावेळी मुस्लीम तरुण मदतीसाठी धावून आले होते़ देवपूरातील चंदननगर परिसरातही एक ग्रुप या कार्यासाठी सक्रिय असल्याने दिलासा आहे़
अंत्यविधीसाठी धावून आले आरएसएसचे कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:20 IST