धुळे : जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समिती सभेत आयत्यावेळी केलेले आर्थिक ठराव रद्द करण्यात यावे असा आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांना देत, अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा करावी अशी ताकीद दिली अशी माहिती जिल्हा परिेषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या गैरप्रकाराविषयी पोपटराव सोनवणे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली होती.या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे चौकशी झाली. तसेच अहवाल शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात या विषयावर बैठक होत ग्रामविकास मंत्र्यांनी वरील आदेश दिले.जिल्हा परिषदेत एप्रिल ते जूनपर्यंत वेळोवेळी स्थायी तसेच सर्वसाधारण सभा झाल्या. या सभांमध्ये आयत्यावेळी आर्थिक व व धोरणात्मक निर्णय घेतले जात नाही, अशी तरतूद असतांनाही सत्ताधाऱ्यांनी आयत्यावेळच्या विषयात आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेत कोट्यावधी रूपयांची कामे बेकायदेशीर मंजूर करून घेतले. तसेच त्याचे बोगस इतिवृत्त तयार करून घेतले. यात लळींग (ता.धुळे), राजबाई शेवाळी (ता. साक्री)धावडे (ता.शिंदखेडा) येथील आरोग्य उपकेंद्र परिसरात मुख्य इमारत, निवासस्थान, संरक्षक भिंतीचे बांधकाम आदींची निविदा काढण्यापूर्वी वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची टिपण्णी नव्हती. तसेच स्थायी समिती सभेत टाकरखेडा तेआर्वी, जेबापूर-दापुरा रस्ता यासह विविध कामांचे ठराव बेकायदेशीर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.यासंदर्भात सोनवणे यांनी ग्रामविकास मंत्र्याकडे तक्रारीसह पिटीशनदाखल केले. त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षासह १३सदस्यांना अपात्र करण्याचीही मागणी केली. दरम्यान या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेने केलेले आयत्यावेळचे आथिर्क व धोरणात्मक ठराव रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशामुळे सुमारे १५० कोटी रूपयांचे कामे रद्द होणार आहेत.दरम्यान खोटे प्रोसिडींग लिहून घेण्याचे काम जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केल्याचे सोनवणे यांनी मुश्रीफ यांना सांगितले असता, प्रोसिडींग कोणी लिहीले याचा अहवाल एक महिन्याच्या आत देण्याच्या सूचना देण्यात आल्या. धुळे, शिंदखेडा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या तक्रारी होत्या त्यावरही चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करावी असे कानही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे टोचले.बैठकीला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी, उपायुक्त अरविंद मोरे, भरत राजपूत आदी उपस्थित हाेते.
आयत्यावेळी केलेले आर्थिक ठराव रद्द करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:59 IST