धुळे : पावसाळ्यात विविध तलाव आणि प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा तयार झाला असून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात पर्यटकांची संख्या वाढते आहे़कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मार्च महिन्यापासुन सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरात राहून कंटाळले आहेत़ टीव्ही, मोबाईल, कौटूंबिक चर्चा असो अथवा कट्ट्यावरच्या गप्पा, सर्वत्र कोरोना हा एकमेव विषय चघळला जात आहे़ गेल्या चार महिन्यांपासून असलेली ही परिस्थिती आता साऱ्यांनाच नकोशी झाली आहे़दरम्यान, पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाचा मात्र दिलासा मिळाला आहे़ समाधानकारक पाऊस झाल्याने नकाने आणि डेडरगाव तलाव ओव्हरफ्लो झाला आहे़ सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने धबधब्याचे स्वरुप आले आहे़ शिवाय तलावांचा परिसर हिरवळीने नटल्याने निसर्ग सौंदर्य बहरले आहे़ अक्कलपाडा प्रकल्पातही मुबलक जलसाठा निर्माण झाला आहे़ प्रकल्पाच्या चौफेर डोंगररांगांचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडत आहे़शहर आणि परिसरात बहरलेल्या या पर्यटन स्थळांवरील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत़ कोरोनाचा संसर्ग असला तरी नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना करीत कुटूंबासह वन डे टूर करण्याचे नियोजन केले आहे़ शनिवार आणि रवीवार सुटीचे हे दोन दिवस पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते़ अबालवृध्दांसह बच्चे कंपनी देखील एन्जॉय करताना दिसत आहे़ गार वारा आणि अधूनमधून होणारा पावसाचा शिडकाव पर्यटकांना आकर्षित करु लागला आहे़ इंद्रधनुष्याचे मनमोहक दृष्यही नजरेस पडते तेव्हा लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो़शहर आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत असली तरी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर पर्यटक करीत आहेत़ सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे़ बाहेरचे पदार्थ टाळत आहेत़ लळींग किल्ल्यावरही पर्यटक धाव घेत आहेत़
तलाव परिसरात पर्यटकांची संख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:02 IST