सुनील बैसाणे
धुळे : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने चिंता वाढली आहे. परंतु दुसऱ्या लाटेतून तावून सुलाखून निघालेले जिल्हा प्रशासन तिसऱ्या लाटेचा सामाना करण्याची पूर्ण तयारी करीत आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तिसऱ्या लाटेपूर्वीच धुळे जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. लहान मुलांना धोका असल्याची शक्यता असल्याने हिरे रुग्णालयात स्वतंत्र वार्ड असणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स देखील तयार केली आहे.
तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे, धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डाॅ. विशाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले आणि महानगरपालिकेने दिली. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्याची गरज भागेल असा दैनंदिन ५० टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प धुळे एमआयडीसीत उभारण्याची प्रक्रिया प्रशासनाने उद्योजकांच्या मदतीने सुरु केली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प सुरु करावयाचा असल्याने लवकरच शासनाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
ऑक्सिजनचे १८ प्लांट
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडची कमतरता भासली होती. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागू नये यासाठी धुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचे लहान मोठ्या १८ प्रकल्पांचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यापैकी ६ प्रकल्प सुरु झाले आहेत तर १२ प्रकल्पांचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालयात देखील लहान मुलांसाठी कोरोनाचा स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात येईल. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १३ टन क्षमतेचा ऑक्सिजन टँक असून २० टन क्षमतेचा दुसरा टँक बसविला जाणार आहे. दररोज ६० जम्बो सिलिंडर भरतील इतक्या क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प जिल्हा रुग्णालयात सुरु झाला आहे. तर याच रुग्णालयात तेवढ्याच क्षमतेचा प्रकल्प महानगरपालिकेने प्रस्तावित केला आहे, अशी माहिती महापालिकेचे डाॅ. प्रशांत पाटील यांनी दिली. तसेच शिरपूर आणि साक्री येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारले जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांनी दिली.
लहान मुलांसाठी स्वतंत्र कोरोना आयसीयु
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना काेरोनाचा धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊन हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कोविड आणि नाॅन कोविड असे दोन स्वतंत्र वार्ड तयार केले जात आहेत. प्रत्येक बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहे. तसेच लहान मुलांच्या आयसीयुसाठी यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. लहान मुलांसाठी कोरोनाचा स्वतंत्र कक्ष तयार केला जात आहे. त्यात तज्ज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती असेल. तिसऱ्या लाटेआधीच सर्व तयारी पूर्ण होईल, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी दिली.
लहान मुलांसाठी पेडियाट्रिक टास्क फोर्स
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, जिल्हा टास्क फोर्सची नुकतीच बैठक झाली. तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने लहान मुलांमधील कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा पेडियाट्रिक टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. पेडियाट्रिक टास्क फोर्समध्ये डाॅ. पल्लवी सापळे, उप अधिष्ठाता डाॅ. अरुण मोरे, डाॅ. संजय राठोड, काेरोना नोडल अधिकारी डाॅ. दीपक शेजवळ, डाॅ. मुकर्रम खान, बालरोग चिकित्सा विभागप्रमुख डाॅ. नीता हटकर, डाॅ. संजय जोशी, इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. जयंत देवरे, जिल्हा रुग्णालयाचे बालरोग चिकित्सक डाॅ. हर्षवर्धन चित्तम, आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या डाॅ. वैशाली जायभाये, डाॅ. राजेश सुभेदार, डाॅ. अमिता रानडे, डाॅ. सारिका पाटील, डाॅ. ध्रुव वाघ, डाॅ. किशोर राठी, डाॅ. रुपेश बच्छाव, डाॅ. हेमंत नागरे, डाॅ. रुचिरा पवार, डाॅ. हितेंद्र पवार, डाॅ. मनिषा महाजन यांचा समावेश आहे. जिल्हा पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या मंजुरीचा प्रस्ताव अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
तिसरी लाट येऊ देणार नाही
तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली असली तरी तिसरी लाट येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. काेरोना चाचण्या आणि काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले आहे. प्रत्येक आठवड्याला पाॅझिटिव्हिटी रेटचा आढावा घेऊन त्यादृष्टीने आवश्यकता भासल्यास कठोर निर्बंध लागू केले जाणार आहेत.