धुळे : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे़ जिल्ह्यात समप्रमाणात विकासाची कामे सुरु असताना धुळे तालुक्यात १६ कोटी ४४ लाखांची कामे मंजूर करुन प्रत्यक्षात सुरु करण्यात आली असल्याची माहिती खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़डॉ़ भामरे यांनी त्यांच्या राम पॅलेस येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे, प्रा़ अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे सभापती रामकृष्ण खलाणे, धरती देवरे, पंचायत समिती सभापती विजय पाटील, उपसभापती भैय्या पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते़डॉ़ भामरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ३ कोटी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले़ लघुसिंचन विभागाकडून पाणी आडवा, पाणी जिरवा योजनेतंर्गत नवीन पध्दतीचे रिचार्ज बंधारे तसेच नादुरुस्त असलेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी २० लाख मंजूर झाले़ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्धी करण्यात आली असून त्यात लळींग, अजंग, चिंचवार आणि कुळथे या ४ गावातील आरोग्य उपकेंद्राचा सुसज्ज इमारतीसह आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे़ महिला बालकल्याण विभागासाठी ७७ लाख, समाजकल्याण विभागासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे़ ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे पाहण्यात येते़ जानेवारी २०२० पासून भारतीय जनता पार्टीकडे जिल्हा परिषदेची सत्ता आल्यानंतर विकास कामाला सुरुवात करण्यात आली़ लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे़ असेही खासदार डॉ़ भामरे यांनी सांगितले़आम्हाला कोरोनाच्या संकटाची चिंता तर त्यांना मंदिर बांधायचे आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रसरकारवर केली होती़ त्याबाबत पत्रकार परिषदेत डॉ़ भामरे यांना छेडले असता ते म्हणाले, पवार हे मोठे नेते आहेत़ त्यांच्या विषयी काय बोलायचे़ राम मंदिराचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केले जात आहे़ यामध्ये जनभावना देखील महत्वाची आहे़ राम मंदिराची उभारणी करताना कोरोना संकटाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामध्ये केलेल्या कामांची केवळ देशात नाही तर विदेशात देखील वाहवा होते आहे़ आपला देश १५० देशांना कोरोना संदर्भातील औषधांचा पुरवठा करीत आहे़ कोरोनावर लस देखील आपणच देवू असा दावा डॉ़ भामरे यांनी यावेळी केला़ कोरोना रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केला़ मात्र लॉकडाऊन देखील किती करणार, हा प्रश्नच आहे़ जनतेच्या जगण्याचा प्रश्न देखील निर्माण होतो़ त्यामुळे कोरोनाबरोबर जगायला आपल्याला शिकावे लागेल, असेही ते म्हणाले़
धुळे तालुक्यात साडेसोळा कोटींच्या विकास कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:20 IST