धुळे : तालुक्यातील कापडणे येथील पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ताब्यात घेतलेली ग्रामपंचायत आणि अपक्ष पं.स.सदस्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश, त्यामुळे जि.प.गटात भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंचायत समितीच्या निवडणुकीत धुळे पंचायत समितीवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, भाजपच्या पं.स.वरील मनमानी कारभाराला शह देण्यासाठी कापडणेचे पं.स.गणाचे अपक्ष उमेदवार राजेंद्र बाबुराव पाटील यांनी आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. धुळे तालुक्यात आणि कापडणे जि.प., पं.स. गणात आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे गतीने सुरू आहेत. गटनेते काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कापडणे पं.स.गणातील विकासासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांचा आमदार कुणाल पाटील यांनी स्वागत व सत्कार केला. दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते कापडणे ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या वंदनाबाई नवल पाटील, लताबाई आसाराम पाटील, हरिश पाटील, अंकिता अंजन पाटील, नीलेश जैन, उज्ज्वला बटू माळी, हिंमत चौधरी, सोनाबाई भिल, अक्काबाई भिल, जितू भिल, नाना भामरे, प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अश्विनी कुणाल पाटील, उद्योगपती शेखर पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, अशोक पाटील, सागर पाटील, सतीश बोरसे, दिलीप पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.