धुळे : शहरातील प्रमुख रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि अनधिकृत रिक्षा थांब्यावर थांबणाऱ्या २५ रिक्षाचालकांना शहर वाहतूक शाखेच्या पथकाने पकडले. चालकांना त्यांच्या रिक्षांसह वाहतूक शाखेत आणण्यात आले. परिणामी रिक्षांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी व पोलीस मुख्यालयातील क्युआरटी पथकाने शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक, गोल पोलीस चौकी, बसस्थानक, पोलीस मुख्यालयाचे प्रवेशद्वार, बारापत्थर चौक, जुना आग्रा रोड, पाचकंदिल चौक, यासह विविध ठिकाणी अडथळा निर्माण करणारे तसेच अधिकृत थांबा नसताना प्रवासी बसविणारे २५ रिक्षांना पकडण्यात आले. काहींची धडपकड करण्यात आली.बऱ्याच रिक्षा या कुठेही उभ्या असतात. त्यांच्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा आणला जात असतो. काही ठिकाणी तर लहान स्वरुपाचे अपघात देखील होत असतात. यासंदर्भात वेळोवेळी वाहतूक शाखेकडे तक्रारी आलेल्या होत्या. त्यानुसार, शहर वाहतूक शाखेकडून अचानक सकाळी मोहीम राबविण्यात आल्याने रिक्षाचालकांची चांगलीच भंबेरी उडाली. काहींनी तर पोलिसांना पाहून पळ देखील काढणे पसंत केले.विशेष मोहीम राबविणारजुन्या आग्रा रोडवरील रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे जे हॉकर्स, भाजीपाला विक्री करणारे, अन्य साहित्य विक्री करणारे त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेची मदत घेतली जाईल. ३० जानेवारी पर्यंत या मोहिमेचे नियोजन असेल अशी माहिती वाहतूक शाखेच्या सुत्रांनी दिली.दरम्यान, अशा प्रकारची मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़
धुळ्यात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या २५ रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:13 IST