जनकापूर येथील पवार वस्तीवरील भागूबाई शिवाजी पवार (वय ४५) यांच्या शेतात ऊस खुरपणीचे काम सुरू होते. यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिण्याचे पाणी आणण्यासाठी म्हणून त्या त्यांच्याच शेतातील सर्व्हे नं. ४४ मधील विहिरीवर गेल्या. बराच वेळ झाला तरी त्या परत आल्या नसल्याने कामावरील इतर मजूर महिला त्यांना पाहण्यासाठी गेला. यावेळी भागूबाई पवार या पाण्यात पडल्याचे दिसून आले. त्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी धाव घेऊन त्या महिलेला पाण्याबाहेर काढून पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर काही कर्मचारीही कोरोना बाधित असल्यामुळे या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पारगावचे पोलीस कॉन्स्टेबल राजू लाटे यांनी शवविच्छेदन पूर्वी पंचनामा केला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.