कळंब शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्य करणारे सोमनाथ ज्ञानोबा ठाणांबीर हे येरमाळा रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आपल्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी त्यांची दुचाकी अचानक नादुरुस्त झाली.
यानंतर ६५ वर्षीय ठाणांबीर होळकर चौकात गॅरेज शोधण्यासाठी चालत निघाले; परंतु दुकान बंद असल्याने ते परतत होते. तेव्हा होळकर चौक ते उद्यान परिसरादरम्यान त्यांना एका दुचाकीवरून आलेल्या एका भामट्याने अडवले.
त्याने मी तुम्हाला कितीवेळ झाला आवाज देतोय, थांबला का नाहीत, असे दरडावून विचारणा केली.
यानंतर मी पोलीस आहे, अशी थाप मारत गांजाची तस्करी झालीय, तुम्ही त्यातील आरोपीसारखे दिसता. बोटात इतक्या अंगठ्या कशा घातल्या, अशी सरबत्ती केली. बोलण्यात गुंगवून अंगठ्या काढून देण्यास परावृत्त केले.
यानंतर प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन, सात ग्रॅमची एक अशा तीन अंगठ्या घेऊन तो भामटा पसार झाला. यासंदर्भात सोमनाथ ज्ञानोबा ठाणांबीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुनील कोळेकर करत आहेत.