लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात कोसळले. भाज्यांचे भाव कमी असल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.
भाजीपाला व फळभाज्यांसाठी मुबलक पाणीसाठा व पोषक वातावरण असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, फळभाज्यांचे भाव कोसळू लागले आहेत. कांदा ४०, शिमला मिरची, दोडका, कारले ३० ते ४०, हिरवी मिरची, गवार ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. बटाटा १५ ते २०, वांगी, टाेमॅटो १० ते १५ रुपयांनी, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. शेवग्याचे दरही मागील आठड्यापासून उतरले असून, शेवगा ३० ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे, तर दुसरीकडे तेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे.
चौकटी
तूरडाळ ९५ रुपये
खाद्यतेलाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या सोयाबीन, पामतेल १२८ रुपये, सूर्यफूल तेल १७० रुपये प्रतिकिलो, मोहरी तेल १३० रुपये लीटर, हरभरा डाळ ६५, तूर डाळ ९६, उडीद डाळ ९०, मूगडाळ ९०, मसूर डाळ ६७ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
डाळिंब महागले
बाजारात डाळिंबाची आवक कमी असल्यामुळे डाळिंब १६० ते २०० रुपये किलोने विक्री हाेत आहेत. सफरचंद १२० ते १८०, संत्रा ६०, चिकू ३० रुपये, द्राक्षे ६० ते ७०, खरबूज ३० रुपये प्रतिकिलो दराने तर ३० ते ४० रुपये प्रतिनगाप्रमाणे विक्री होत आहे.
भाज्या स्वस्त
फळ भाज्याबरोबरच पालेभाज्याही दर कमीच आहेत. मेथी, कोथिंबीर १० रुपयास दोन जुडी, पालक, शेपू १० रुपयास २ जुडी तर चुका १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. लिंबाला मागणी वाढल्याने लिंबू ३ रुपये नगाप्रमाणे विक्रीस होते.
सध्या बाजारात भाज्यांची आवक चांगली आहे. त्यामुळे दर कमीच आहेत. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाज्यांचे दर वाढल्याची शक्यता आहे.
महादेव साठे, भाजीपाला विक्रेते
तेलाच्या दरात वाढ होत आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत खाद्यतेलाचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. मूग, तूर, मसूर, उडीद, हरभरा डाळीचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
अमित भराटे, किराणा व्यावसायिक,
फळांच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे भावही वाढत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. भाज्यांचे दर आवाक्यात असल्यााने दिलासा काही अंशी दिलासा मिळत आहे.
- कैलास काळे, ग्राहक