तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडलगत असलेल्या नगरपालिका कचरा डेपोत दोन अर्भकांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोन मृत अर्भके अर्धवट खोदलेल्या एक फूट खोलीच्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळून आली. यातील एका अर्भकाचे शीरच शरीरावर नसल्याचे दिसून आले. साधारणत: तीन महिने या अर्भकांचे वय असल्याचा अंदाज आहे. शिवाय, अर्भकांचे लिंगनिदानही होऊ शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून दोन्ही अर्भकांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. येथे मृतदेहाचे नमुने घेऊन ते सोलापूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी नगरपालिका कर्मचारी दत्तात्रय साळुंके यांच्या फिर्यादीवरून दोन अर्भक मृतदेहांची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी कलम ३१८ प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मृतावस्थेत आढळून आलेली अर्भके नेमकी कोणाची, कचरा डेपोत ती कोणी पुरली, या प्रश्नांची उत्तरे पोलीस आता शोधत आहेत.
010421\01osm_1_01042021_41.jpg
तुळजापूर पालिकेच्या कचरा डेपोत दोन मृतावस्थेतील अर्भके आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, पालिका व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी धाव घेऊन पाहणी केली.