कळंब : सोयाबीनचे कोठार असलेल्या कळंब तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे गावोगावी उभे फड पाण्यात तरंगत आहेत. यासाठी आपली पिके विमा संरक्षित करून घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी दहा हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीचा ऑनलाइन ‘क्लेम’ दाखल केला आहे.
तालुक्यात खरीप हंगामात एकट्या सोयाबीनचा ६० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रात याचा ऐंशी टक्के वाटा आहे. अशा प्रमुख पिकाचा सध्या काढणी हंगाम भरात आलेला आहे. मध्यंतरी २५ दिवसांचा पावसात खंड निर्माण झाला होता. यामुळे आधीच मोठे नुकसान झाले होते. या संकटातून वाचलेले पीक थोडेबहुत हाती पडेल अन् बाजारात वाढलेले दर घामाचे मोल करतील, अशी आशा लागली होती; परंतु फडातील सोयाबीनच्या शेंगा पक्वता अवस्थेत असताना काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करतानाच अचानक निसर्गाने घाला घातला. यामुळे गावोगावी सोयाबीन पिकांचे आतोनात नुकसान झाले. नदीकाठची पिके तर चक्क पाण्यात तरंगत असून, इतर ठिकाणी अति पाण्याने चिबड लागले आहे. यामुळे आता चिखलमय, दलदलयुक्त वावरात पाय ठेवायचा कसा अन् त्यामधून पीक काढायचे कसे? यापेक्षा कुजलेले, अंकुर फुटत असलेले निकृष्ट प्रतवारीचे पीक काढले तरी घेणार कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांची झोप उडवत आहे.
दरम्यान, तालुक्यात पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, अशाच नुकसानीचे आजवर तब्बल दहा हजारांच्या आसपास ऑनलाइन क्लेम शेतकऱ्यांनी सादर केले आहेत. यातील ३ हजार ९०० शेतकऱ्यांच्या शेतात विमा कंपनीच्या १७ प्रतिनिधींनी ‘स्पॉट व्हिजिट’ दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट...
सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र विमा संरक्षित...
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध पिकांचे तब्बल ९५ हजार १६८ प्रस्ताव दाखल करून पिके विमा संरक्षित करून घेतली आहेत. यात सर्वाधिक ७४ हजार ७३३ प्रस्ताव सोयाबीन पिकाचे आहेत.
७२ तासांत नुकसानीचे इन्टिमेशन हवी...
राष्ट्रीय पीक विमा योजनेत पेरणी ते काढणीपश्चात पिकांना विमा संरक्षण आहे. अवेळी पावसाने काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास याची वैयक्तिक माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर ऑनलाइन नोंदवणे गरजेचे आहे, असे तालुका कृषी अधिकारी बी.बी. जाधव यांनी सांगितले.