प्रभाग क्रमाक १७ बातमी/फोटो
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रशासनाने अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे केली आहेत. परंतु, मुख्य रस्त्यासह नाल्यांचा प्रश्न अद्याप कायम असून, तोही मार्गी लागावा, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमाक १७ मध्ये गणेशनगरमधील सुतार प्लॉटिंग, जट्टे प्लॉटिंग, वाघ प्लॉटिंगचा भाग येतो. यामध्ये उत्तरेस काशीनाथ कदम यांचे शेत ते कदम शेती, जेवळी रोड, पूर्वेस कदम शेती, जेवळी रोड ते एल.जी. कुलकर्णी पेट्रोलपंप, दक्षिणेस एल. जी. कुलकर्णी पेट्रोलपंप, पश्चिमेस सर्व्हे नंबर १४३ ते माटे शेत, मारुती वाघ घर, बापू जट्टे घर ते काशीनाथ कदम शेती अशी या प्रभागाची रचना आहे. हा प्रभाग १९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपानंतर शेतात वसलेला आहे. या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांचे वास्तव्य आहे; परंतु प्रशासनाकडून या भागात रस्ते, नाल्यांची कसलीही सोय नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात रहिवाशांना चिखलातून वाट काढत घर गाठावे लागत होते. पावसाळ्यात जर एखादा नातेवाईक आला तर रस्त्याची परिस्थिती बघून परत जावे लागत होते. अशी अवस्था होती. कालांतराने ग्रामपंचायत असताना मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण केले. परंतु, हा रस्ता उखडला गेल्यामुळे मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीला नगरपंचायता दर्जा मिळाला आणि नागरिकांच्या अशा वाढल्या आहेत.
दरम्यान, मागील पाच वर्षांत या भागात अंतर्गत सिमेंट रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये यासीन बागवान यांचे घर ते कदम शेती, कलिम शेख यांचे घर ते लालबहादूर घर, विजयाबाई कोरे घर ते माणिक बिराजदार घर, लक्ष्मी घोडके घर ते प्रकाश वाघ यांचे घर, रवि मुळे घर ते संजय पळसे यांचे घर आदी रस्त्याची कामे मार्गी लागली. परंतु, येथील जेवळी रोड ते जुने तहसील कार्यालय संरक्षक भिंतीपर्यंतचा मुख्य रस्ता व दोन्ही बाजूने नाल्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. विशेष म्हणजे, हा भाग या प्रभागाचे प्रवेशद्वार असल्याने येथून सतत वर्दळ असते. तसेच अंतर्गत सिमेंट रस्ते करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी नाल्यांची आवश्यकता आहे. जेवळी रस्त्यालगत प्रभागात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी पूल उभारण्यात आला. परंतु, त्यावरून वाहतूक सुरू होताच तो उखडला. यावरून सत्ताधारी व विरोधकांत सोशल मीडियावरून चांगलीच चर्चादेखील रंगली होती. यामुळे लगेच पुलाची दुरुस्ती करण्यात आली.
कोट....
प्रभाग क्रमाक १३ मध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी मुख्य जेवळी रोड ते जुने तहसील कार्यालय संरक्षक भिंतीपर्यंतचा सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूने नाल्या होणे गरजेचे आहे. तसेच अंतर्गत रस्त्याच्या बाजूला नाल्याही होणे गरजेचे आहे.
- बापू जट्टे, रहिवासी
प्रभागात सिमेंट रस्त्याची कामे झाली. परंतु, नाल्या नाहीत. त्यामुळे प्रभाग क्रमांक १३, १५ व १६ मधील पावसाचे, नाल्याचे पाणी हे या प्रभागात येते. हे पाणी रस्त्यावरून वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरते. यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून नाल्याची कामे करावी.
- भरत सुतार, रहिवासी
प्रभागातील बहुतांश ठिकाणी अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आता मुख्य रस्ता डांबरीकरण व नाल्याच्या कामांकडे तसेच या प्रभागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. उर्वरित विकासकामे आमदार व खासदारांच्या विकास निधीतून करण्यासोबतच एमआयडीसी, क्रीडा संकुल, सांस्कृतिक सभागृह व शहर हद्दवाढ यासाठीदेखील माझा प्रयत्न राहणार आहे.
- बाळासाहेब कोरे
नगरसेवक
फोटो
- लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील मुख्य जेवळी रोड ते जुने तहसील कार्यालय यादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, डांबरीकरण करण्याची गरज आहे.