लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : खासगी साखर कारखानदारीत उल्लेखनीय असा ठसा उमटवलेल्या कळंब तालुक्यात यंदाच्या हंगामात ऊसाचे विक्रमी गाळप झाले आहे. प्रमुख तीन कारखान्यांनी १२ लाख मेट्रिक टन गाळपाचा पल्ला पार केला असून, यात एकट्या नॅचरल शुगरने सात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.
मांजरा प्रकल्पाचे लाभक्षेत्र व बॅकवॉटरचा भाग, मांजरा, तेरणा, वाशीरा नदीचा पट्टा यासह नायगाव, खामसवाडी, मोहा आदी भाग ऊसाचा ‘बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. हा भाग मागील दोन दशकात तालुक्यात उभारी घेतलेल्या खासगी साखर उद्योगामुळे चांगलाच सुखावला आहे.
रांजणी येथे नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज हा तालुक्यातील पहिला खासगी साखर कारखाना उभा राहिला. यानंतर हावरगाव येथे शंभू महादेव, चोराखळी येथे धाराशीव हे खासगी साखर कारखाने उभे राहिले. यानंतर वाठवडा येथे डीडीएन व मोहा येथे मोहेकर ॲग्रो हे गूळ कारखाने सुरू झाल्याने तालुक्यात ऊस गाळप करणाऱ्या उद्योगांची संख्या पाच झाली.
अनिश्चित पर्जन्य, बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा अभाव, खालावलेली पाणीपातळी, वारंवार घोंघावणारे दुष्काळाचे सावट अशा प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना तोंड देत व्यवस्थापनाने कारखान्यांचा हा डोलारा टिकवून ठेवला आहे. यातूनच कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या व्यवस्थापनामुळे ‘नॅचरल’ संपूर्ण राज्यातील साखर उद्योगाची पंढरी ठरला आहे.
‘डीडीएन’कडे नव्याने व्यवस्थापन आल्यानंतर हावरगावच्या ‘शंभू महादेव’चा नवा प्रवास सुरू झाला तर चोराखळी येथील धाराशीव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मोठ्या सचोटीने शेतकरी, कामगार यांचा विश्वास संपादन केला आहे. यातच मागील दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे येथील साखर कारखानदारीला पुन्हा एकदा नवी उभारी मिळाली आहे.
चालूू गाळप हंगाम कार्यक्षेत्रात ऊसाची मोठी उपलब्धता होती. यामुळे पाचही कारखाने यंदा बॉयलर पेटवत मोठ्या जोमाने फडात उतरले होते. लगतच्या येडेश्वरी, एसपी, मांजरा, विकास, शिवशक्ती कारखान्यांशी असलेली स्पर्धा, तोड यंत्रणेचा विषय समोर असतानाही आजवर जोरदार गाळप केले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास जपत तोड व वाहतूक यंत्रणा, कामगार यांच्यात योग्य समन्वय राखत या कारखान्यांनी १२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचा विक्रम केला आहे.
दहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
रांजणी येथील नॅचरल शुगरने ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, यातून ६ लाख ४६ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हावरगाव येथील ‘डीडीेएन’ने २ लाख १४ हजार ९०० मेट्रिक टन गाळप करत एक लाख ७७ हजार ५७० क्विंटल तर चोराखळी येथील ‘धाराशीव’ने २ लाख ६९ हजार ९८० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करत २ लाख ५६ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. मोह्याच्या मोहेकर ॲग्रोने ६५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यात नॅचरलला ९.२४, हावरगावला ८.२६ तर धाराशीवला ९.६१ टक्के असा सरासरी साखर उतारा मिळाला आहे.
दररोज ११ हजार मेट्रिक टन गाळप
रांजणीच्या नॅचरलची ५ हजार, हावरगावची १ हजार २५०, धाराशीवची २ हजार तर वाठवडा व मोहा येथील कारखान्यांची प्रतिदिन पाचशे मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता आहे. प्रत्यक्ष गाळपात नॅचरलने सहा हजार, हावरगावने दोन हजार तर धाराशीवने दीड हजार मेट्रिक टन गाळपाचा पल्ला पार केला आहे. एकूणच तालुक्यात सध्या दररोज अकरा हजार मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप होत आहे.
‘नॅचरल’चा वरचष्मा कायम
रांजणी येथील नॅचरल शुगरने यंदाच्या हंगामातही गाळपात आपली आघाडी कायम ठेवली आहे. ४ नोव्हेंबर २०२० रोजी गाळपाचा श्रीगणेशा केलेल्या या कारखान्याने सात लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. चोराखळी येथील धाराशीव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनीही गाळपाचे चांगले नियोजन केले असून, उशिरा गाळप सरू केले असतानाही दमदार कामगिरी केली आहे.
तक्ता.
गाळप स्थिती (५ मार्चअखेर)
कारखाना गाळप (मे/ट) - साखर (क्विंटल)
नॅचरल शुगर - ७,००,१६० ६,४६,८५०
डीडीेएन २ - २,१४,९०० १,७७,५७०
धाराशीव - २,६९,९८० २,५६,५३०