पाथरूड : विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमात भूम तालुक्यात पाथरूड येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाने अव्वल क्रमांक पटकाविला.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सर्व कार्यालयाकडून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम राबविण्यात आला. यात पशुवैद्यकीय कार्यालय व पशुवैद्यकीय दवाखाना यांना रंगरंगोटी, पशुवैद्यकीय दवाखान्यातील नोंदवह्या अद्ययावत करणे, नादुरुस्त फर्निचर दुरुस्त करून उपयोगात आणणे, शेतकऱ्यांसाठी लसीकरण वेळापत्रक, लोकसेवा हमी कायदा, नागरिकांची सनद, वैरण विकास कार्यक्रम, शासनाचे व जिल्हा परिषद सेस योजना माहिती व जनजागृतीसाठी भिंतीपत्रक, माहितीदर्शक तक्ते तयार करणे, आजारी पशुपालकांच्या जनावरांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था करणे, पक्षिथांबे करणे, पशुपालकांच्या प्रबोधनासाठी पशुसंवर्धनाची घोषवाक्य भिंतीवर लिहिणे आदी उपक्रम राबविण्यात आले. यात भूम तालुक्यातील पाथरूड येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची जिल्हास्तरावरून निवड करण्यात आली असून, १७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पशुधन पर्यवेक्षक डाॅ. मारकड विनायक व परिचर जी. एम. कुंरद यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सभापती टेकाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, परमेश्वर राऊत तसेच जिल्हा पशुधन अधिकारी यतिन पुजारी आदी उपस्थित होते.
190921\0451img-20210919-wa0014.jpg
□ सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत पाथरुड पशुवैद्यकीय दवाखाना भूम तालुक्यात प्रथम